मसाला पिकांमध्ये लसूण या पिकाचा प्रामुख्याने उल्लेख होतो. उत्पादकांच्या दृष्टीने लसूण हे कमी कालावधीत येणारे महत्त्वाचे आर्थिक पीक आहे. जागतिक बाजारात लसणाची मागणी सातत्याने वाढत आहे. अधिक गुणवत्ता व उत्पादन वाढीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नियोजितपणे लसूण लागवड केल्यास अधिक उत्पादन व चांगल्या प्रतिचे उत्पादन मिळू शकते. ज्यामुळे उत्पादकांना अधिक फायदा होवू शकतो.
लसूण हे तापमानाबाबत अत्यंत संवेदनक्षम पीक आहे. दिवसरात्रीच्या तापमानात बराच चढ उतार असेल तर गड्ड्यांची वाढ चांगली होत नाही. हलक्या ते मध्यम जमिनीत लसणाचे पीक चांगले येते. खरवट किंवा काळ्या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होत नाही.अशा जमिनीत लसणाची लागवड करू नये. रब्बी हंगामात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात लसणाची लागवड करतात. यासाठी हेक्टरी 400 ते 500 किलो पाकळ्याल लागतात.

पूर्वमशागत : जमिनीची खोल नांगरट करून दोन-तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.काडी कचरा गोळा करून शेत स्वच्छ करावे व शेतात हेक्टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेेणखत मिसळावे.
लागवडीची वेळ व बियांण्याचे प्रमाण : महाराष्ट्रात लसूण लागवडीची योग्य वेळ मध्य ऑक्टोंबर ते मध्ये नोव्हेंबर ही आहे. वेळेवर लागवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उशीरा लागवड केल्यासही गाठे लहान रहातात व उत्पादनात घट येते. लागवडीसाठी हेक्टरी 700 ते 800 किलो लसूण लागतो. लागवडीसाठी निरोगी मोठ्या आकाराच्या कळ्या निवड करून वापराव्या. मोठ्या कळव्यांच्या वाणासाठी 900ते 1000 किलो कळ्या लागतात. पेरणीपूर्वी कळ्या 0.1 टक्के बावीस्टीनचय द्रावणात बुडवून लावाव्या.
प्रत्यक्ष लागवड : लागवड नेहमी सपाट वाफ्यावर करतात.त्यासाठी जमिनीचा उतार पाहून 3 बाय 1 किंवा 2 बाय 1 मी चे वाफे करावे. दोन ओळीतील अंतर 10 सें.मी.व दोन कुड्यातील अंतर 7.5 सें.मी. ठेवावे. कुड्या कोरड्या जमिनीत टोचून मातीने बुजून घ्याव्यात आणि लगेच पाणी द्यावे.
खते आणि पाणी व्यवस्थापन : लसणासाठी 50 किलो नत्र ,50 किलो स्फू रद, 50 किलो पालाश लागवडीच्या वेळेस द्यावे. उरलेले 50 किलो नत्र लागवडीनंतर 30ते 35 दिवसाने द्यावे.आंबवणीचे पाने लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनी द्यावे नंतर 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
सुधारित जाती : लसणाच्या गोदावरी आणि श्वेता हे दोन चांगल्या जाती आहेत. गोदावरी ही जात लागवडीपासून 140 ते 145 दिवसांत तयार होतो. गड्डा मध्यम आकाराचा असून रंग जांभळट पांढरा व स्वाद तिखट असतो.हेक्टरी 100 ते 105 क्विंटल उत्पादन मिळते.
श्वेता ही जात लागवडीपासून 130 ते 135 दिवसांत तयार होते. या जातीचा गड्डा मोठा व पांढरा शुभ्र असून स्वाद तिखट असतो. या जातीचे हेक्टरी उत्पादन 100 ते 105 क्विंटल मिळते. या शिवाय अॅग्रीफावूंड व्हाईट, यमुना, सफेद,जे-41, जी-1 तसेच स्थानिक वाण लागवडी योग्य आहेत.

शेताची मशागत, पेरणी व खते : लसूण लागवडीसाठी मध्यम प्रतिची, पाणी निचरा होणारी, सेंद्रीय पदार्थ मुबलक असणारी जमिन निवडावी. मध्यम खोल नांगरणी व दोन आडव्या उभ्या कुळवणी करून शेत सपाट, भुसभुशीत तयार करावे. शेतात हेक्टरी 50 टन शेणखत किंवा कंपोष्ट खत मिसळावे. वाफे किंवा सरी पद्धतीने लागवड करता येते. वाफे पद्धतीने लागवड केल्यास गाठे चांगले तयार होवून उत्पादनही जास्त येते. लागवड 10 सें.मी. 7.5 सें. मी. अंतरावर टोकण पद्धतीने करावी कळ्या दोन ते तीन सें.मी. पेक्षा जास्त खोल लावू नयेत. लसूण लागवडीसाठी हेक्टरी 100 किलो नत्र 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश शिफारशीत आहे. त्यापैकी अर्धे नत्र व संम्पुर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या अगोदर जमिनीत मिसळावे. उरलेले 50 टक्के नत्र दोन भागामध्ये विभागून लागवडीनंतर पाच ते आठ आठवड्यांनी द्यावा. पाणी नियमीत द्यावे. पाणी शेतात साचणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतात वरील सहा इंचापर्यंत ओलावा टिकवावा. ठिबक सिंचनावर गादी वाफे करून लसणाचे चांगले पिक घेता येते.
आंतर मशागत : लसणाचे पिक तणांपासून मुक्त ठेवावे म्हणजे उत्पादनात फार भर पडते. लसणाची मुळे फार खोल जात नसल्यामुळे तणाचा परिणाम उत्पादनावर होतो. लसणांची लागवड केल्यावर तीन दिवसांनी जमिनीत ओलावा असतांना स्टॉम्प हेक्टरी 3.5 लिटर किंवा गोल 1 लीटर प्रति. हे प्रमाणे तणनाशकाचा वापर करावा. पाणी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने जमिनीच्या गरजेनुसार द्यावे. तापमान वाढेल तसे पाण्याच्या पाळ्यांमधील अंतर कमी करावे. गाठे भरत असतांना पाण्याचा ताण दिल्यास कळ्या फुडण्याचे प्रमाण वाढते. लागवड केल्यापासून 75 दिवसांनी म्हणजे गाठे भरायला सुरूवात होण्याच्या वेळी मातीची भर द्यावी, म्हणजे गाठे चांगले वाढतात. त्यानंतर खुरपणी शक्यतो टाळावी म्हणजे गाठींना इजा होणार नाही व मोठे आणि घट्ट गाठे तयार होतील.
पीक सरंक्षण : लसूण पीक कांद्याच्या मानाने रोग व किडींना कमी प्रमाणात बळी पडत असल तरी पिकावर अनेक प्रकारचे रोग व किडीची प्रादुर्भाव हतो. रोगांमध्ये करपा, भुरी व पांढरी सड ह्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. ह्यासाठी लागवड करताना निरोगी कळ्या लावाव्या व पाण्याचा अतिरेक टाळावा. मॅन्कोझेब 0.25 टक्के व कॅराथेन 0.2 टक्के याप्रमाणे फवारणी करावी म्हणजे रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. किडीमध्ये थ्रिप्स(टाक्या मुरडा) चा प्रादर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. थ्रीप्स बंदोबस्तासाठी मेटॅसिस्टॉक्स 0.1 टक्के प्रमाणे किंवा मॅलथिऑन 0.1 टक्के प्रमाणे किंवा मॅलेथिऑन 0.1 टक्के प्रमाणे फवारणी करावी. किंवा फॉलीडॉल डस्टने हेक्टरी 15 ते 20 किलो प्रमाणे संध्याकाळचे वेळी धुरळणी करावी.
लसणावर माईट (कोळी) चा प्रादुर्भाव प्रामुख्याने होतो. त्यामुळे पानांना घड्या पडतात व पानावर पिवळसर हिरव्या धार्या दिसतात. गाठे नरम पडतात. जमिनीलगात पाने फाटण्यास सुरूवात होते व कळ्या फुटण्याचे प्रमाण वाढते. मेंटॅसिस्टॉक्स 0.1 टक्के प्रमाणे किंवा वेटेबल सल्फरची 0.2 टक्के प्रमाणे फवारणी केल्यास माईटचा बंदोबस्त होतो. फवारणी आवश्यकतेनुसार 10 ते 15 दिवसांनी पुन्हा फवारणी करावी.
काढणी व सुकवणी : कंद तयार झाल्यानंतर माना पडतात व पात पिवळी पडायला सुरूवात होते. माना पडायला सुरूवात झाल्यानंतर पाणी देणे बंद करावे व पात पिवळी झाल्यावर काढणी करावी. काढणी करतांना जमिनीत थोडा ओलावा असल्यास गाठे उपटून काढायला सोपे जाते. पण ओलावा कमी असेल व पात तुटून येत असेल तर कुदळीने जमीन मोकळी करून घ्यावी व गाठे वेचून काढावेत. इजा झालेले गाठे वेगळे करावे. काढणी उशिरा केल्यास कळ्यांना मोड होण्याची शक्यता वाढते व कळ्या फुटण्याचे प्रमाण वाढते. साठवणीत असा लसूण जास्त टिकू शकत नाही. लसणाची सुकवणी शेतात एक आठवड्यापर्यंत करावी. कडक उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून गाठे पातींनी झाकल्या जातील अशा प्रकारे ठेवावे. नंतर लसणाच्या जुड्या बांधून पातीसह सावलीत व हवेशीर जागेत टांगून ठेवावा. असा लसूण 6 ते 8 महिन्यापर्यंत चांगला टिकतो. काही ठिकाणी धुराची प्रक्रिया देवून लसणाची प्रत व साठवण क्षमता वाढविली जाते.
प्रतवारी करणे : लसणाची गाठ्यांच्या आकारानुसार प्रतवारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रतवारी करतांना 30 मि. मी. पेक्षा जास्त व्यासाचे गाठे मोठे 25-30 मि. मी. चे मध्यम व 10 -25 मि. मी. पर्यंत लहान अशी प्रतवारी करावी. व्यवस्थित प्रतवारी केल्यामुळे लसणाला बाजारात अधिक भाव मिळतो. लसूण पॅकिंग व वाहतुकीसाठी जाळीदार जुटच्या किंवा नायलॉनच्या पिशव्या वापरतात. निर्यातीसाठी 10 प्लाय पृष्ठाची खोकी वापरतात. लसणाची पात कापतांना 1-2 इंच देठ व 1-2 इंच मुळे राखतात. त्यामुळे लसूण जास्त दिवस चांगला राहू शकतो. मध्यम आकाराचा लसूण जास्त टिकतो.
डॉ. भगवान किशनराव आरबाड कृषि महाविद्यालय, सेलू, (परभणी)