द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा दुग्ध व्यावसायिकांसाठी सतत भेडसावणारा ज्वलंत प्रश्न असतो. या समस्येवर रामबाण उपाय म्हणजे बरसीम घास लागवड होय. बरसीम घास हे रब्बी हंगाम चार ते पाच कापण्या देणारे, अगदी कमी खर्चात अधिक चारा उत्पादन देणारे मेथी वर्गीय चारा पीक आहे. या चारा रुचकर, पालेदार तसेच लुसलुशीत, सकस व चविष्ट असतो व यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे दुभत्या जनावरांच्या प्रकृतीला चांगला मानवतो. विशेषतः याच्या लागवडी पासून भरघोस चारा मिळतो.
जमीन व हवामान : या पिकास थंड व कोरडे हवामान आवश्यक आहे. उष्ण व दमट हवामान या पिकास अनुकूल नाही. पाण्याचा चांगला निचरा असणारी, मध्यम ते भारी तसेच चुना व स्फुरद भरपूर प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या जमिनीत बरसीम चांगल्या प्रकारे वाढते. काहीशा प्रमाणात विम्लयुक्त जमिनीमध्येसुद्धा हे पीक वाढते; परंतु आम्लयुक्त आणि पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत बरसीम वाढत नाही. एक खोल नांगरट करून एकदा डिस्क हॅरोने ढेकळे फोडून घ्यावीत.
नक्की वाचा : समजून घ्या, संकरित नेपिअर गवत उत्पादनाचे तंत्रज्ञान
मशागत : शेणखत पसरवून झाल्यानंतर काकरपाळी करून पिकासाठी योग्य अशी मऊ व भुसभुशीत जमीन तयार करता येते. ढेकळाचे प्रमाण जास्त असल्यास व गरजेप्रमाणे आणखी एक काकरणी करावी. जमीन तयार केल्यानंतर तिची बांधणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी दोन मीटर रुंदीचे व जमिनीच्या उतारानुसार लांबी ठेवून वाफे बनवावेत. परंतु दोन मीटर रुंद व दहा मीटर लांब अशा आकाराचे वाफे तयार केल्यास पेरणीसाठी सुलभ व पाण्याच्या पाटामध्ये कमी क्षेत्र वाया जाते. पेरणीपूर्वी मशागत करताना उपलब्धतेनुसार हेक्टरी 20 ते 30 बैलगाड्या (10 ते 15 टन) कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. या पिकाला हेक्टरी 20 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश इतकी मात्रा द्यावी. ही सर्व खते पेरणीच्या वेळेसच द्यावयाची आहेत.
फायद्याची गोष्ट : एका दिवसाला 16 ते 18 लिटर दूध देते या जातीची म्हैस
बियाणे व बिजप्रक्रिया : लागवडीसाठी वरदान, बुंदेल बरसीम 2 व मेस्काव्ही या जातींची निवड करावी. हेक्टरी 25 ते 30 किलो इतके बियाणे लागते. बियाण्याची पेरणी करण्याअगोदर बियाणे दहा टक्के मिठाच्या पाण्यामध्ये बुडवावे. असे केल्याने चिकोरी या गवताचे बी पाण्यात तरंगून येते. ते आपणाला सहजरीत्या वेगळे करता येते. बियाणे पाण्यातून बाजूला काढून पोत्यावर घ्यावे. बियाण्यास रायझोबियम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू याची प्रक्रिया करण्यासाठी दर दहा किलो बियाण्यासाठी 250 ग्रॅम जिवाणू संवर्धक पुरेसे आहे.
हलक्या हाताने बियाण्याला पावडर चोळल्यानंतर बियाणे पूर्णतः सावलीमध्ये सुकवून घ्यावे. बियाण्याच्या संवर्धकामुळे गोळ्या झाल्या असतील तर त्या सुकल्यानंतर फोडून घ्याव्यात.
पेरणीची वेळ : ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणी करावी. म्हणजे पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी थंडी तीन ते चार महिन्यांपर्यंत मिळते. त्यापासून जास्तीत जास्त म्हणजेच चार कापण्या मिळतात. पेरणी लवकर केली तर थंडी कमी असल्याने उगवण व्यवस्थित होत नाही. सुरवातीची वाढ जोमदार होत नाही. पेरणी उशिरा केली तर शेवटच्या कापणे मार्च-एप्रिल महिन्यात येतात. थंडीचे प्रमाण कमी झाल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
फायद्याची गोष्ट : या आहेत भारतातील टॉप 5 गायी
पाच बाय तीन मीटर आकाराचे वाफे तयार करावेत व यामध्ये बियाणे फोकून द्यावे. पेरणी करण्यासाठी हेक्टरी 30 किलो बियाणे लागते. बीज प्रक्रिया केलेले बियाणे वाफ्यामध्ये 25 सें. मी. अंतरावर ओळीमध्ये पेरावे. बियाणे साधारणतः दोन ते 2.5 सें.मी. खोलीवर पेरावे. त्यापेक्षा जास्त खोलवर पेरणी केल्यास बियाणे उगवणीवर परिणाम होतो.
आंतर मशागत : हे पीक तणांच्या चढाओढीस संवेदनशील असते. त्यामुळे योग्य वेळी आवश्यकतेनुसार एक किंवा दोन निंदण्या कराव्यात. पेरणी बियाणे फोकूनकेल्यास तन खुरपणी त्रासदायक व खर्चिक ठरते. म्हणून पेरणी शक्य तो 30 सेंटिमीटर अंतरावर मार्कर च्या साह्याने करावे. म्हणजे हात कोळपे द्वारे जवळ जवळ 75 टक्के तण नियंत्रण शक्य होते.
महत्त्वाची माहिती : जागतीक स्थरावर का चर्चेत आहे, भारतीय गीर गाय ?
पाणीपुरवठा : रब्बी हंगामातील या पिकास जमिनीचा पोतनुसार दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. कापणी पूर्वी चार ते पाच दिवस अगोदर पाण्याची पाळी येईल याप्रमाणे पाण्याचे नियोजन करावे. त्यामुळे हिरव्या चाऱ्याचे उत्पादन अधिक मिळते.
कापणी : पेरणीनंतर बरसीमची पहिली कापणी 50 ते 55 दिवसांनी करावी. गवताची कापणी जमिनीच्या वर चार ते पाच सें. मी. वर करावी. पहिली कापणी करताना विळे धारदार असावेत जेणेकरून गवत कापताना ठोंब उपटून येऊ नयेत. पिकाच्या नंतरच्या कापण्या 22 ते 25 दिवसांनी कराव्यात. आपल्याकडे नोव्हेंबरमध्ये पेरणी केलेले गवत मार्च अखेरपर्यंत टिकते. या काळामध्ये एकूण चार कापण्या मिळतात. बरसीमच्या तीन ते चार कापण्यांमध्ये एक हेक्टर क्षेत्रामधून सरासरी 60 ते 65 टन एवढा हिरवा चारा मिळतो. भारी जमिनीत चांगली मशागत केल्यानंतर हेच उत्पादन 70 ते 75 टनांपर्यंत पोचू शकते.
डॉ. विठ्ठल कौठाळे (020 – 26926248) बाएफ मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे
हे नक्की वाचा : खिल्लार या गोवंशाला का म्हणतात पांढरे सोने ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1