दुधी भोपळा ही आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशी भाजी असून, कोणत्याही हंगामात सहज उपलब्ध होणारी भाजी आहे. यामध्ये पौष्टिक तत्त्व फारशी नसली तरी ‘क’ जीवनसत्त्व, कार्बोदके आणि खनिज द्रव्ये पुरेशा प्रमाणात असतात. यात सारक गुणधर्म असल्यामुळे हे पचनास हलके असते.
जमीन : दुधी भोपळ्याच्या लागवडीसाठी मध्यम पोयट्याची, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी. उन्हाळी हंगामात भारी कसदार जमिनीत हे पीक घ्यावे. खरीपात हलक्या, रेताड जमिनीत लागवड फायद्याची असते. सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असलेल्या मध्यम खोलीच्या कसदार सुपीक जमिनीत भोपळा उत्तम पोसतो.
मशागत व रानबांधणी : जनिनीची खोल नांगरट करून काही काळ जमीन तापू द्यावी. त्यानंतर ढेकळे फोडून कुळवणी करावी. जमीन भुसभुशीत करून साधारणत: एकरी पाच ते सहा टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. हलक्या जमिनीत 2.5 मीटर आणि भारी जमिनीत तीन मीटर अंतरावर सर्या पाडाव्यात. सरीच्या एका बाजूस एक मीटर अंतरावर आळे तयार करून प्रत्येक आळ्यात पाच ते सहा किलो शेणखत किंवा कंपोष्ट खत त्यात 10 टक्के 10 ग्रॅम कार्बारिल पावडर मातीत मिसळून घ्यावी. लागवडीपूर्वी 34 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश प्रती हेक्टरी या प्रमाणात प्रत्येक आळ्यात विभागून द्यावे. गांडूख खत, सेंद्रिय व नौसर्गिक खतांचा वापर केल्यास उत्पादन टिकावू व दर्जेदार मिळते.
लागवड पद्धत : प्रत्येक आळ्यात ‘बी’ टोकून लागवड करावी. टोकण पद्धतीत हेक्टरी तीन ते पाच किलो बियाणे पुरेसे होते. संकरित जातीचे बी एका आळ्यात एकच लावावे. बी लावण्यापूर्वी ते एक लिटर पाण्यात 50 मि. इी. गोमुत्राचे द्रावण तयार करून त्यामध्ये ओले करून गोणपाटात रात्रभर गुंडाळून ठेवून सकाळी टोकण केल्यास बी लवकर व व्यवस्थित उगवते. बियांना लावण्यापूर्वी जिवाणू संवर्धन खतांची बीजप्रक्रिया करावी.
लागवड कालावधी : खरीप हंगामात मे-जून मध्ये तर उन्हाळी हंगामात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लागवड करावी. दुधी भोपळा विशेषत: मांडवावर लावावा. त्यामुळे भरपूर व दर्जेदार फळे मिळतात.
रासायनिक खते : हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे. नत्र 34 किलो आणि संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. उरलेली नत्राची मात्र दोन हप्त्यात लागवड केल्यापासून 30 दिवसांनी आणि फुले येण्याच्या वेळी द्यावी.
आंतरमशागत : ‘बी’ उगवून वेलीला तीन ते चार पाने आल्यावर विरळणी करावी. नांगे भरून घ्यावे. एका आळ्यात एकच किंवा दोन निरोगी रोपे ठेवावीत. पेरणीनंतर तीन ते चार आठवड्यांनी आळी खुरपून घ्यावी. दुधी भोपळ्याचे पीक मांडवावर घेतले तर चार ते पाच महिने तोडे चालतात. त्यासाठी मांडव तयार करावा. वाढीच्या काळात 100 लिटर पाण्यात दोन किलो युरिया मिसळून 15 दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या केल्यास वेलीची वाढ चांगली होते.
पाणी व्यवस्थापन : दुधी भोपळ्यास खरीप हंगामात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. खरिपात साधारणत: 10 ते 12 दिवसांनी तर उन्हाळी पिकांस सहा ते सात दिवसांनी पाणी द्यावे. फळे पोसताना पाणी कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी.
संजीवकांचा वापर : दुधी भोपळ्याच्या प्रत्येक वेलीवर नर व मादी अशी वेगवेगळी फुले येतात. यापैकी मादी फुलांनाच फळधारणा होते. त्यामुळे नर फुलांची संख्या नियंत्रित करून मादी फुलांची संख्या वाढवून उत्पन्न वाढविणे शक्य होते. त्यासाठी वेलीवर तीन ते चार पाने आली असता 50 पीपीएम. मॅलीक हायड्रोक्झाईड (एम.एच.) या संजीवकाची फवारणी करावी किंवा इथ्रेल 250 पी.पी.एम. अथवा बोरॉन तीन पी.पी.एम. फवारावे. पाच ते सहा पाने आल्यावर दुसरी फवारणी करावी. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये घटकांची एखद-दुसरी फवारणी करावी. त्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते.
दुधी भोपळ्याचे कीड नियंत्रण
लाल भुंगे : बियांची उगवण झाल्याबरोबर किडीचा उपद्रव सुरू होतो. पीक हलान असताना भुंगे पाने कुरतडून खातात. कीड पानांचा कोवळा भाग कुरतडून खाते. त्याच्या नियंत्रणासाठी मॅलेथिऑन 10 मि. ली. 10 लिटर पाण्यातून फवारावे किंवा चार टक्के निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी.
फळमाशी : ही महत्त्वाची कीड असून, काकडीवर्गीय पिकांचे फार नुकसान करणारी आहे. माशी फळे लहान असताना फळांच्या सालीखाली अंडी घालते. या अंड्यातून आळ्या बाहेर आल्यावर फळातील गर खातात. त्यामुळे फळे बाहेरून चांगली दिसत असली तर आतून सडतात. याच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात मॅलेथिऑन 20 मि. ली. किंवा 30 मि. ली. एंडोसल्फान मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.
दुधी भोपळ्याचे रोग नियंत्रण
भुरी : या रोगामुळे पानावर आणि फळावर पांढरे डाग पडतात. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते. फळे वाढत नाहीत, यासाठी कॅलिक्झीन पाच मि. ली. किंवा कॅराथेन सात मि. ली. किंवा बाविस्टीन 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेलवर्गीय पिकांवर गंधकाची फवारणी करू नये.
केवडा : या रोगाचा प्रादुर्भाव आर्द्रतायुक्त दमट हवामानात मोठ्या प्रमाणात वाढतो. पानांच्या खालच्या बाजूस पिवळसर डाग पडतात. नंतर रोग संपूर्ण पानांवर पसरून पाने गळून पडतात. यासाठी 25 ग्रॅम डायथेन एम-45 किं;) ब्लायटॉक्स हे बुरशीनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
काढणी : दुधी भोपळा साधारणत: 40 ते 150 दिवसांचे पीक आहे. फळे कोवळी परंतु चांगली वाढ झालेली असताना त्या फळास हळूच दाबल्यास नखाचे व्रण उमटतात. अशा वेळी फळे काढावीत. फळे मध्यम आकाराची परंतु जास्त मोठी नसावीत. मध्यम लहान कोवळ्या फळांना ग्राहक आकर्षित होतात. अशा आकाराची फळे निर्यातीसाठीही योग्य असतात.
पॅकिंग : फार मोठी, पक्व, वेडीवाकडी, खुरटी, किडकी फळे निवडून वेगळी करावीत. समान आकाराची, एकसारखी फळे वेगळी करून वर्तमान पत्रात व्यवस्थित गुंडाळून पॅकिंग करावी. फळांना काढणीत व हातळणीत खरचटणार नाही, इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी. जाती टवटवीत फळे बाजारात पोहचतील याची दक्षता घेतल्यास ती निश्चितच ग्राहकांच्या पसंतीस उतरतात.
उत्पादन : वरील प्रमाणे लागवडीपासून काढणीपर्यंत नियोजन केल्यास दुधी भोपळ्याचे हेक्टरी 450 ते 550 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्यास हरकत नाही.
श्याम शिंदे उद्यानविद्या विभाग, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा