देशातील साखर कारखान्यांनी फेब्रुवारीअखेर २३३ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० लाख टनांनी साखरेच्या उत्पादनात वाढ झाली असून, यामध्ये महाराष्ट्राचा वाटा चक्क ३५ लाख टनांचा आहे.
देशात साखर गाळप करणार्या कारखान्यांची संख्या यंदा ४९ ने वाढली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ४५३ साखर कारखाने सुरू होते, यंदा मात्र ५०२ साखर कारखाने सुरू आहेत.
देशाच्या उत्पादनात यंदाही महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक असून, यंदा महाराष्ट्रात या कालावधीत ८५ लाख टनांचे साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत महाराष्ट्र राज्याचे साखर उत्पादन ५० लाख टनांचे होते. तर यंदा देशाचे साखर उत्पादन ४० लाख टनांनी वाढले आहे. देशाच्या साखर उत्पादनाता महाराष्ट्राचा वाटा ३५ लाख टनांचा आहे. फेब्रुवारीअखेरच्या आकडेवारीनुसार देशातील साखर वाढ ही महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील साखर उत्पादनामुळेच दिसून येत आहे. गेल्या वर्षी या कालावधीत साखर उत्पादन १९४ लाख टन होते, आता ते २३३ लाख टनांवर गेले आहे. गेल्या वर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत यंदा २० टक्के साखर उत्पादन जास्त झाले आहे. यंदा मात्र उत्तर प्रदेशात गेल्यावर्षीच्या तुलनेत २.६६ लाख टन तर तमिळनाडू राज्यात ०.२१ लाख टन साखर उत्पादन कमी झाले आहे.
सध्या सुरू असलेल्या देशांतर्गत बाजारानुसार साखरेच्या मागणीत अजूनही वाढ झालेली नाही. केंद्राने गेल्या वर्षीच्या मार्च इतकाच कोटा यंदाच्या मार्चलाही दिला आहे. उन्हाळ्यामुळे शीतपेय, मिठाई उद्योगाकडून साखरेला मागणी अपेक्षित धरून केंद्राने २१ लाख टनांचा कोटा दिला आहे. असे असले तरी ज्या प्रमाणात मागणीत वाढ अपेक्षित होती तितकी वाढ झाली नसल्याचे कारखानदारांकडून सांगितले जाते आहे. कमी किमतीत साखर मागणीचे प्रकार व्यापाऱ्यांकडून सुरुच असल्याने ‘एमएसपी’ दरात साखर विक्री करणे अद्यापही आव्हानात्मक ठरत असल्याचे कारखानदारांकडून सांगितले जाते
साखरेबाबत निर्यात धोरण जाहीर झाल्यापासून देशातून केवळ ३२ लाख टनांचे साखरनिर्यात करार झाले आहेत. शिवाय कंटेनर अडचणीमुळे साखरनिर्यातही अत्यंत धीम्या गतीने होत आहे. दरम्यान, विशाखापट्टणम बंदर व्यवस्थापनाने साखरनिर्यातीला प्राधान्य देत साखरेसाठी जहाजे उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक हालचाली सुरू केल्या आहेत. असेच प्रयत्न देशातील अन्य बंदरांकडून झाल्यास याचा फायदा साखर गतीने निर्यात होण्यासाठी होऊ शकतो, असा विश्वास कारखानदार प्रतिनिधींनीकडून व्यक्त होत आहे.
देशातील साखर उद्योगात प्रथम कर्नाटकातील हंगाम संपण्याची शक्यता आहे. कर्नाटकात फेब्रुवारीअखेर ६६ पैकी तब्बल ५२ कारखान्यांनी गाळप थांबविले आहे. या खालोखाल महाराष्ट्रात १२, तर उत्तर प्रदेशात ११ कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात साखर कारखाने बंद होण्याची शक्यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली.
साखर उत्पादनाचा गेल्या व या वर्षीच्या आकडेवारीचा तुलनात्मक अभ्यास करता; महाराष्ट्र राज्यात गेल्यावर्षी ५०.७० लाख टन तर यंदा ८४.८५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशात गेल्यावर्षी ७६.८६ लाख टन तर यंदा ७४.२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. कर्नाटक राज्यात गेल्यावर्षी ३२.६० लाख टन तर यंदा ४०.५३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गुजरात राज्यात गेल्यावर्षी ६.८३ लाख टन तर यंदा ७.४९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर तमिळनाडू राज्यात गेल्यावर्षी ३.३७ लाख टन तर यंदा ३.१६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.