गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो आणि खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीरिला आवश्यक असा भाग सोडून उर्वरीत भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो त्यालाच गांडूळखत म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये व्हर्मीकंपोस्ट म्हणतात.
गांडूळखतामध्ये सरासरी नत्र 1 ते 1.5 टक्के, स्फुरद 0.9 टक्के व पालाश 0.4 टक्के, कॅल्शिअम 0.44 टक्के तर मॅग्नेशिअमचे 0.15 टक्के प्रमाण असते. तसेच लोह 175.20 पीपीएम, मॅग्नीज 96.51 पीपीएम जस्त 24.45 पीपीएम, तांबे 4.89 पीपीएम आणि कर्बे: नत्राचे प्रमाण 15.50 एवढे आहे.
जगामध्ये गांडूळाच्या 3000 जाती आहेत तर भारतामध्ये 300 जातींची गांडूळे आढळून येतात. जमिनीच्या वेगवेगळ्या थरात निरनिराळ्या लांबी जाडीची गांडूळे आढळून येतात. आकाराने लहान असलेल्या जातीची गांडूळे साधारणत: जमिनीच्या 10 ते 20 सें. मी.वरील थरात सापडतात. त्यांना सेंद्रीय पदार्थांचे खाद्य आवश्यक असते. गांडूळखत निर्मितीसाठी इसिनिया फेटीडा ही परदेशी जात सर्वप्रकारे सर्वोत्तम अशी आढळून आली आहे. तर पेरीओनिक्स एक्सकॅव्हेटस ही गांडूळाची स्थानिक जातसुद्धा गांडूळखत तयार करण्यास चांगली असल्याचे सिद्ध झाले आहे.
गांडूळ खत तयार करण्यापूर्वी खालील मुद्दे विचारात घ्यावेत
1) गांडूळपैदास करण्याच्या जागेची निवड करताना ती जागा पाण्याचा निचरा होणारी असावी.
2) खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत कारण या झाडांची मुळे गांडूळ खतामधील पोषक घटक शोषून घेतात.
3) गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी छप्पर तयार करून घ्यावे. ते तयार करताना रूंदी साडेपाच मीटर, मधील उंची तीन मीटर, बाजूची उंची एक मीटर आणि लांबी गरजेनुसार ठेवावी छप्परामध्ये एक मीटर रूंद व 20 सें. मी. खोलीचे दोन समांतर चर खोदावेत.
गांडूळखत निर्मितीसाठी धसकटे, तूस, कोंडा, काडीकचरा, गवत, पालापाचोळा इत्यादी तसेच जनावरांपासून मिळणारी उत्पादने शेण, मूत्र, कोंबड्याची विष्ठा, हाडांचा चुरा, कातडी इत्यादी सेंद्रिय पदार्थ वापरतात तर ताग, धैंचा, गिरीपुष्प ही हिरवळीच्या खतांची पिके व साग, सुबाभूळ या वनझाडांचा पालापाचोळा ही वापरतात. याशिवाय घरातील केरकचरा, भाज्यांचे अवशेष, फळांच्या साली, शिळे अन्न व घरातील सांडपाण्याचा मैला इत्यादींचा वापर गांडूळखत निर्मितीसाठी केला जातो. प्रथम चराच्या तळाशी आठ ते नऊ सें.मी. जाडीचा/उंचीचा थर काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, उसाचे पाचट यांनी भरावा व त्यावर पाणी मारावे.
या थरावर आठ ते नऊ सें.मी. जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडीखत, सेंद्रियखत यांचा द्यावा. त्यावर पाणी शिंपडून पूर्ण थर ओला करावा. त्यानंतर या थरावर गांडूळे सोडावीत. यावर पाच ते सहा सें. मी. जाडीचा थर कुजलेले सेंद्रियखत व शेणखत यांचा द्यावा. या थरावर 20 ते 30 सें. मी. उंचीपर्यंत शेणखत, लेंडीखत, सेंद्रियखत टाकावे यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे हा गादीवाफा गोणपाटाने झाकावा दररोज या गादीवाफ्यावर पाणी शिंपडावे म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडूळाची चांगली वाढ होवून गांडूळखत तयार होईल. आवश्यकतेपेक्षा जादा पाणी वापरून नये या पद्धतीने 15 ते 20 दिवसात गांडूळखत तयार होईल.
गांडूळखत व गांडूळ वेगळे करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरूण त्यावर या गांडूळखताचे ढिग करावेत म्हणजे उन्हामुळे गांडूळे ढिगाच्या तळाशी जातील व गांडूळखत वेगळे करता येईल.
घरात व परसबागेत गांडूळखत निर्मिती करता येते. त्यासाठी घरातील दररोज निघणारे भाजीपाल्याचे अवशेष एका कुंडीत किंवा खोक्यात टाकून त्यात गांडूळे सोडावीत. त्याचप्रमाणे परसबागेत लहान खड्डा घेवून त्या बागेतील पालापाचोळा, गवत टाकून गांडूळे सोडावीत. त्यावर रोज पाणी शिंपडावे अशाप्रकारे तयार झालेले गांडूळखत कुंड्यातील फुलझाडांना तसेच परसबागेतील झाडांना टाकता येते. त्यामुळे झाडांची वाढ उत्तम होते.