कोवीडच्या पार्श्वभूमीवर टोंगा देशातील राष्ट्रकुल विद्यापीठातर्फे दिल्लीत सन्मान
गोरमाळे (ता. बार्शी) येथील सीताफळ किंग, एनएमके-1 गोल्डन या सीताफळ वाणाचे निर्माते व अखिल भारतीय सीताफळ महासंघाचे अध्यक्ष डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे यांना टोंगा या ओशनिय खंडातील देशातील माकंगा येथील राष्ट्रकुल व्यवसायिक विद्यापीठाच्या वतीने कोवीडच्या पार्श्वभूमीवर आज रविवार, दि. 11 जुलै रोजी दिल्ली येथे एका कार्याक्रमात डॉक्टरेट पदवी सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली.
या सन्मानामुळे डॉ. नवनाथ कसपटे यांच्या शिरपेचात आनखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, चक्क परदेशातील एका विद्यापीठाने डॉ. कसपटे यांनी विकसित केलेल्या आणि जगभर प्रसिद्ध होत असलेल्या एनएमके-1 गोल्डन या सीताफळ वाणाची दखील घेवून त्यांना कृषी क्षेत्रातील ‘डॉक्टरेट’ही पदवी बहाल केली आहे. डॉ. कसपटे यांना या संदर्भात मिळणारी ही दुसरी डॉक्टरेट असून, यापूर्वी त्यांना बेंगलोर विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी बहाल करून सन्मानीत केले होते.

आज टोंगा या ओशनिय खंडातील देशातील माकंगा येथील राष्ट्रकुल व्यवसायिक विद्यापीठाच्या विशेष निवड समितीच्या वतीने कोवीडच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे रॅडीसन या पंचतारांकीत हॉटेलमध्ये एका खास समारंभात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रिपू रंजन सिंन्हा यांच्या हस्ते कसपटे यांनी ही डॉक्टरेट बहाल केली. यावेळी विद्यापीठाचे संस्थापक सदस्य प्रोफेसर राकेश मित्तल, डॉ. प्रियदर्शनी नायर, केंद्रीय मंत्रालय प्रतिनिधी सैफी अख्तर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. कसपटे यांच्या समवेत बार्शीचे प्रा. अशोक सावळे, ऑड. लक्ष्मण मस्के, जिल्हा शिल्प निदेशक किरण झारकर आदी उपस्थित होते. या सन्मानामुळे आता डॉ. नवनाथ कसपटे डबल डॉक्टरेट झाले आहेत.
टोंगा हा देश ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्विपसमूह देश असून, तो दक्षिण प्रशांत महासागरातील 176 लहान बेटांवर वसला आहे. या देशाने डॉ. कसपटे यांच्या एनएमके1 गोल्डन या सीताफळ वाणासाठी केलेल्या संशोधनाची दखल घेवून हा गौरव केला आहे. टोंगा येथील कृषी विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. श्री. कौसा यांनी केलेल्या सुचनेवरून डॉ. कसपटे यांना ही डॉक्टरेट बहाल करण्यात आली असून, विशेष म्हणजे, डॉ. कसपटे यांना या सन्मानाबरोबरच टोंगा देशाचे सर्व अधिकार आणि विशेषाधिकार देण्यात आले आहेत.
डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे हे गेल्या 45 वर्षापासून सीताफळ शेतीमध्ये काम करत असून, त्यांनी विकसित केलेल्या आणि जगप्रसिद्ध होत असलेल्या एनएमके1 गोल्डन या सीताफळ वाणाला पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा कलम 2001 अन्वये स्वामीत्व हक्क प्राप्त झाला आहे. या वाणाची लागवड केल्यामुळे अनेक सर्वसामान्य शेतकर्यांना करोडपती केले असून संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशातूही या वाणाला मागणी वाढत आहे. असा हा महत्त्वपूर्ण वाण विकसित केल्याबद्दल डॉ. नवनाथ कसपटे यांना ही डॉक्टरेट बहाल करण्यात आली आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा