राज्यात लवकरच विषमुक्त शेतीविषयीचे धोरण ठरवण्यात येणार असून, सेंद्रीय शेतीचे प्रमाणिकरण करण्यासाठी शासनाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. पुण्यात झालेल्या ‘नैसर्गिक शेती‘ राज्यस्तरीय परिषद 2022 च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत होते तर प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
राज्यात राबविण्यात येणाऱ्या विषमुक्त शेती धोरणाची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत करण्यात येणार असल्याचे सांगून कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, नैसर्गिक शेतीच्या सहाय्याने भरड धान्याचे उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रयत्न करण्यात येईल. असे सांगून ते म्हणाले, जमिनीचे आरोग्य बिघडल्यास अन्नसुरक्षा धोक्यात येईल. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी मूल्यसाखळीच्या विकासावर भर द्यावा लागेल, अशी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करावा लागेल असेही सत्तार यावेळी म्हणाले.
शेतकऱ्याला आर्थिक लाभाची हमी देणे गरजेचे असल्याचे सांगून सत्तर म्हणले, ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी समजवून घेण्यात आल्या आहेत. त्यांना नैसर्गिक शेतीसाठी मदत करता येण्याविषयी विचार करण्यात येईल. भविष्यात शेतकरी सक्षम व्हावा आणि त्याचे उत्पन्न वाढावे यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य फळे आणि भाजीपाला उत्पादनासह निर्यातीमध्ये देखील देशात अग्रेसर असल्याची माहिती फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. राज्याचे स्वंतत्र कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र प्रथम राज्य आहे. देशाच्या निर्यातीमध्ये 65 टक्के फळे, 50 टक्के भाजीपाल्याचा वाटा असून, यामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठे योगदान असल्याचे सांगितले.