हरभरा पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन काढावयाचे असेल तर प्रामुख्याने अधिक उत्पादन देणारे वाण, रोपांची योग्य संख्या पाण्याचे व रासायनिक खतांचे योग्य नियोजन आणि पीक संरक्षण या बाबींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तम हरभरा वाणाची लागवड केल्यास अतिशय भरघोस उत्पादन मिळते असे दिसून आले आहे.
लक्षात ठेवण्याजोगे : हरभरा लागवड केलीय ? मग; असे करा व्यवस्थापन
दिग्विजय : फुले जी 91028 आणि भीमा या संकरातून हा वाण निवड पद्धतीने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे विकसित करण्यात आला असून सन 2006 मध्ये महाराष्टात लागवडीकरीता प्रसारीत करण्यात आला आहे. हा वाण पिवळसर तांबूस रंगाचा, टपोऱ्या दाण्यांचा असून 100 दाण्यांचे वजन 24 ग्राम भरते. हा वाण मर रोग प्रतिकारक्षम आहे. वाढीचा कल निम पसरट, मध्यम उंच असून पाने व घाटे आकाराने मोठे व गर्द हिरवे असतात. या वाणाची पक्वता 110 ते 115 दिवसांत येते. या वाणापासून जिरायतात 14 ते 15 क्विंटल बागायतात 35 ते 40 क्विंटल तर उशीरा पेर केल्यास 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.
विजय : हा वाण महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे पी 1270 व अन्निगोरी या संकरातून निवड पद्धतीने विकसीत करण्यात आला असून सन 1993 मध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांसाठी राष्ट्रीय वाण म्हणून लागवडीसाठी प्रसारीत करण्यात आला. हा वाण मर रोग प्रतिकारक्षम असून याची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता ईतर वाणांपेक्षा अधिक आहे. हा वाण बुटका, पसरट असून, पाने, घाटे व दाणे आकाराने मध्यम आहेत. 100 दाण्यांचे वजन 19 ते 20 ग्राम भरते. जिरायतात 85 ते 90 दिवसांत तर बागायतात 105 ते 110 दिवसांत या वाणाची पक्वता येते. या वाणापासून जिरायतात 14 ते 15 क्विंटल तर बागायतात 35 ते 40 क्विंटल आणि उशीरा पेर केल्यास 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते. तसेच इतर विकसित वाणांच्या तुलनेत या वाणांची पक्वता जिरायतात लवकर येते.
विशाल : के 850 व आय. सी. सी. एल. 80074 या संकरातून हा वाण निवड पद्धतीने राहुरी येथे विकसित करुन सन 1995 मध्ये पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारीत करण्यात आला. हा वाण आकर्षक पिवळ्या टपोर्या दाण्यांचा असून 100 दाण्यांचे वजन 28 ग्राम भरते. यामुळे अधिक बाजारभाव मिळतो. का वाण मर रोग प्रतिकारक्षम असून प्रथिनांचे प्रमाणही अधिक आहे. वाढीचा कल निम पसरट मध्यम उंच असून पाने व घाटे आकाराने मोठे गर्द हिरवे असतात. या वाणाची पक्वता 110 ते 115 दिवसांत येते. या वाणापासून जिरायतात 14 ते 15 क्विंटल तर बागायतात 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.
महत्त्वाच्या टिप्स : असे करा हरभर्यावरील घाटेअळीचे नियंत्रण
काबुली वाण : विराट : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हा काबुली वाण विकसित केला असून सन 2001 मध्ये हा वाण महाराष्ट्र राज्यकरिता लागवडीसाठी प्रसारीत करण्यात आला आहे. हा काबुली वाण अधिक टपोऱ्या दाण्यांचा असून 100 दाण्यांचे वजन 35 ग्राम भरते. 110 ते 115 दिवसांत या वाणाची पक्वता येते. हा वाण काबुली आणि टपोऱ्या दाण्यांचा असल्यामुळे बाजारात अधिक बाजारभाव मिळतो. हा वाण मर रोग प्रतिकारक्षम आहे. जिरायतात या वाणापासून 10 ते 12 क्विंटल तर बागायतात 30 ते 32 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.
पीकेव्ही : हा काबुली वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विकसित केला असून सन 2000 मध्ये महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित करण्यात आला आहे. हा वाण मर रोग प्रतिकारक्षम असून या वाणाचे दाणे अधिक टपोरे आहेत. 100 दाण्यांचे वजन 40 ग्राम भरते. हा वाण 110 ते 115 दिवसांत पक्व होतो. या वाणापासून 26 ते 28 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.