अखंड पृथ्वीतलावर बांबूच्या सुमारे 1400 प्रजाती आढळून येतात. त्यापैकी 140 प्रजाती भारतात दिसून येतात. त्यापैकी 60 प्रजाती या लागवडीखाली आहेत. त्यामध्ये बांबूसा आणि डेंड्रोकॅलॅमस या दोन जाती प्रामुख्याने दिसून येतात. या दोन्ही जाती देशभरात सर्वत्र आढळून येतात.
महाराष्ट्राचा विचार करता. महाराष्ट्रात मानवेल, कटांग-काटस, कोंड्या मेस, पिवळा बांबू, चिवळी या जाती आढळून येतात तर कळक, मेज, चिवा, चिवारी, हुडा बांबू, मोठा बांबू, पिवळा बांबू असे लांबी व गोलाई यावरून बांबूचे प्रकार पडलेले आहेत. विदर्भात मानवेल, कटांग, गोल्डन बांबू तर कोकणात मांडगा व चिवार बांबू जंगलात आणि शेताच्या बांधावर नैसर्गिकरीत्या आढळून येतात.
1. मानवेल : ही महाराष्ट्रात सर्वाधिक लागवड केली जाणारी जात असून हिचे शास्त्रिय नाव डेंड्रोकॅलॅमस स्ट्रकट्रस् (Dendrocalamus strictus) असे आहे. या जातीचा फुलण्याचा कालावधी 30 ते 35 वर्षे आहे. योग्य वातारण आणि चांगल्या देखभाली खाली या बांबूची उंची 25 ते 50 फुटापर्यंत जावू शकते तर गोलाई दोन ते साडेतीन इंच होवू शकते. याचा उपयोग बांधकाम, विणकाम, हस्तकला, फर्निचर, जैवइंधन, प्लायवूड, खाण्यासाठी कोंब, चारा आणि शेतीकामासाठी काठ्या म्हणून होतो. याच्या लागवडीनंतर वेळोवेळी फांद्याची तसेच वड्या वाकड्या येणार्या काठ्यांची छाटणी करावी लागते.
2. माणगा : याच जातीला मेस असेही म्हणतात. याचे शास्त्रय नाव डेंड्रोकॅलॅमस स्टोक्सी (Dendrocalamus stocksii) असे असून, याचा फुलण्याचा ठरावीक असा कालावधी नाही. याची योग्य वातारणात देखभाल केल्यास याची उंची सर्वसाधारण 25 ते 40 फुटापर्यंत जाते तर जाडी दोन ते साडेतीन इंच होते. याचा उपयोग बांधकाम, विणकाम, हस्तकला, फर्निचर, खाण्यासाठी कोंब, चारा आणि शेतीमधील कामासाठी काठ्या म्हणून होतो. हा बांबू सह्याद्रीच्या पर्वतरांगा तसेच कोकणात लागवडीसाठी योग्य असून इतर ठिकाणी लागवड केल्यास याची उंची आणि जाडी कमी राहू शकते.
3. एस्पर : ही बांबूची जात अति पावसाच्या प्रदेशात लागवडीसाठी योग्य असून याचे शास्त्रय नाव डेंड्रोकॅलॅमस एस्पर (Dendrocalamus asper) असे आहे. याचा फुलण्याचा कालावधी 60 ते 80 वर्षोपर्यत आहे. योग्य वातारण आणि चांगली देखभाल केल्यास याची उंची 60 ते 80 फुटापर्यंत जावू शकते तर जाडी 6 ते 8 इंच होवू शकते. याचा उपयोग खाण्यासाठी कोंब, बांधकाम, हस्तकला, फर्निचर, जैवइंधन व प्लायवूड म्हणून करता येतो. हा अति पावसाच्या प्रदेशात लागवडीसाठी योग्य असला तरी कमी पावसाच्या प्रदेशात प्रायोगिक तत्वावर लागवड होणे गरजेचे आहे. सह्याद्री तसेच कोकणात लागवडीसाठी ही जात योग्य असून इतर ठिकाणी याची उंची तसेच जाडी कमी राहू शकते.
4. बुल्का : या बांबूच्या जातीला वनन, ब्रांडीसी असे म्हणतात तर याचे शास्त्रीय नाव डेंड्रोकॅलॅमस ब्रांडीसी (Dendrocalamus brandisii) असे आहे. याचा फुलण्याचा कालावधी 45 ते 60 वर्षे असा आहे. योग्य वातारणात चांगली देखभाल केल्यास याची उंची 60 ते 80 फुटापर्यंत जावू शकते तर याची जाडी 6 ते 8 इंचापर्यंत होते. याचा उपयोग बांधकाम, विणकाम, हस्तकला, फर्निचर, जैवइंधन, प्लायवूड तसेच खाण्यासाठी कोंब म्हणून होतो. हा बांबू अति पावसाच्या प्रदेशात लागवडीसाठी योग्य आहे. कमी पावसाच्या प्रदेशात प्रायोगिक तत्वावर लागवड होणे गरजेचे आहे. सह्याद्री तसेच कोकणात लागवडी साठी योग्य आहे. इतर ठिकाणी याची उंची तसेच जाडी कमी राहू शकते.
5. कंटांग : या बांबूच्या जातीला काष्टी, काटे कळक व काटोबा असेही म्हणतात. याचे शास्त्रय नाव बांबूसा बांबोस (Bambusa bambos) असे असून, याचा फुलण्याचा कालावधी 35 ते 50 वर्षे आहे. याची योग्य वातावरणात देखभाल केल्यास उंची 60 ते 80 फूट होवू शकते तर जाडी 5 ते 6 इंच होते. याचा उपयोग बांधकाम, कागद लगदा, फर्निचर, इथेनॉल, बायोइंधन, प्लायवूड, खाण्यासाठी कोंब, औषधी पाने, चारा इत्यादीसाठी केला जातो. विशेषत: हा बांबू काटेरी असल्याने याची लागवड आणि व्यवस्थापन अतिशय काटेकोरपणे करावे लागते, अन्यथा हा बांबू कापायला अतिशय त्रास होतो. जर काटेकोर पणे योग्य व्यवस्थापन होणार असेल तर लागवडीला हरकत नाही. नदी, नाले, ओढे यांच्या काठावर या बांबूची वाढ जास्त चांगली होते.
6. टूल्डा : या जातीच्या बांबूला मित्रींगा असेही म्हणतात तर याचे शास्त्रीय नाव बांबूसा टूल्डा (Bambusa tulda) असे आहे. याचा फुलण्याचा कालावधी 35 ते 60 वर्षे आहे. याचे योग्य वातावरणात चांगले व्यवस्थापन केल्यास याची उंची 35 ते 45 फुटापर्यंत जावू शकते तर जाडी दोन ते साडेतीन इंच होवू शकते. याचा उपयोग बांधकाम, विणकाम, हस्तकला, फर्निचर, जैवइंधन, प्लायवूड, खाण्यासाठी कोंब, जनावरांसाठी चारा, शेतीसाठी काठ्या यासाठी केला जातो. कोरड्या वातावरणात या बांबूला जास्त फांद्या येतात. त्या फांद्या छाटल्यास नवीन येणारे कोंब सरळ यायला मदत होते.
7. नुतन्स : या जातीच्या बांबूला मल्ल बांस असेही म्हणतात. या जातीचे शास्त्रीय नाव बांबूसा नुतन्स (Bambusa nutans) असे आहे. याचा फुलण्याचा कालावधी 35 ते 40 वर्षे आहे. याचे योग्य वातावरणात चांगले व्यवस्थापन केल्यास याची उंची 25 ते 40 फुट व जाडी दोन ते आडेतीन इंच होते. याचा उपयोग बांधकाम, कागद लगदा, फर्निचर, इथेनॉल, बायो इंधन, प्लॉयवूड यासाठी केला जातो. कोरड्या वातावरणात या बांबूला जास्त फांद्या येतात. त्या फांद्या छाटल्यास नवीन येणारे कोंब सरळ यायला मदत होते. या बांबूची वेगवेगळया वातावरणात प्रायोगिक तत्वावर लागवड होण्याची गरज आहे.
8. भीमा : या जातीच्या बांबूला भालुका, बराक, बाल्कू असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव बांबूसा बाल्कूवा (Bambusa balcooa)असे आहे. याचा फुलण्याचा कालावधी 35 ते 45 वर्षे असून, याचे योग्य वातावरणात चांगले व्यवस्थापन केल्यास याची उंची 35 ते 50 फूट तर जाडी 3 ते 5 इंच होऊ शकते. याचा उपयोग बांधकाम, फर्निचर, इथेनॉल, जैवइंधन यासाठी केला जातो. औद्योगिक दृष्या अतिशय महत्त्वाचा असा हा बांबू आहे. याची फायदेशीर लागवड करायची असेल तर अनेक शेतकर्यांनी एकत्र येऊन करायला हवी. एकट्या दुकट्याने लागवड केली तर औद्योगिक दृष्ट्या वापराला मर्यादा येतात. कोरड्या वातावरणात या बांबूला जास्त फंद्या येतात. त्या फांद्या छाटल्यास नवीन येणारे कोंड सरळ यायला मदत होते.
9. बिजली : या जातीच्या बांबूला बाखल, बुखाल, लोटो, सेसकीएन, स्खेन, तेनंग, उस्केन, तेसेरो, बातोई, पाशिपो, पुशी, मकाल असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव बांबूसा पल्लिडा (Bambusa pallida)असे आहे. याचा फुलण्याचा कालावधी 55 ते 60 वर्षे आहे. याची योग्य वातारणात चांगली देखभाल केल्यास याची उंची 40 ते 65 फुट तर जाडी अडीच ते साडेतीन इंच होऊ शकते. याचा उपयोग आसाम मध्ये बांधकाम, फर्निचर, इथेनॉल, जैवइंधन व औद्योगिक कामासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
10. बेतवा : या जातीच्या बांबूला जामा बेतवा, नारंगी बांस, बारी असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव बांबूसा पॉलिमॉर्फा (Bambusa polymorpha)असे आहे. याचा फुलण्याचा कालावधी 55 ते 60 वर्षे असून, याची चांगली देखभाल केल्यास याची उंची 49 ते 80 फूट तर जाडी 3 ते 5 इंच होऊ शकते. याचा वापर बांधकाम, फर्निचर, इथेनॉल, जैवइंधन म्हणून केला जातो.
11. देवबांस : या जातीच्या बांबूला जारी, किरंती, वारी, मकार, मिरतींगा, रॉथिंग, पाओशिडीग, पिंग असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव बांबूसा तुल्दा (Bambusa Tulda) असे आहे. याचा फुलण्याचा कालावधी 30 ते 60 वर्षे असून, याची पोषक वातारणात देखभाला केल्यास याची उंची 50 फूट तर जाडी सव्वातीन इंच होऊ शकते. याचा वापर बांधकाम, फर्निचर, इथेनॉल, जैवइंधन व कागदाचा लगदा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
12. पिवळा बांबू : या जातीच्या बांबूला बासिनी बांस, बकाल, लाम सामोईबी, वैरूआ, सुंद्रोगाई, सुंदरकणीया बांस, कोटुना असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव बांबूसा व्हलगॅरिस (Bambusa vulgaris) असे असून, याचा फुलण्याचा कालावधी 80 वर्षाहून अधिक काळ आहे. याची योग्य वातावरणात काळजी घेतल्यास याची उंची 30 ते 70 फूट तर जाडी 2 ते 4 इंच होऊ शकते. याचा वापर बांधकाम, फर्निचर, इथेनॉल, जैवइंधन म्हणून केला जातो.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
बांबू लागवडीनंतर कशी घ्यावी काळजी ?
फायद्याच्या बांबू शेतीचे लागवड तंत्र
नैसर्गिकरित्या वनामध्ये आढळणाऱ्या बांबूच्या प्रजाती या कमी उत्पादन क्षमता असणाऱ्या आहेत. त्या व्यापारी बांबू शेतीसाठी सुसंगत नाहीत. अशा ठिकाणी शेतकर्यांनी लागवडीयोग्य अशा सुधारीत बांबू प्रजातींचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यामध्ये भीमा बांबू, तुरडा, नुटन्स, पॉलीमार्फा, कटांग यांचा समावेश होतो. या जास्त उत्पादन देणाऱ्या बांबूच्या जाती आहेत.
बांबूच्या येवढ्या जाती असल्या तरी नव्याने बांबू लागवड करणार्यांनी आपल्या परिसरातील बांबू उत्पादकांनी कोणती जात लावली आहे. त्याचे त्या जातीसंदर्भात काय अनुभव आहेत. शिवाय कोणत्या जातीला जास्त मागणी आहे. याचा चांगला अभ्यास करून मगच लागवडीसाठी बांबूची जात निवडावी.
सविता करचे सहाय्यक प्राध्यापिका, श्रीराम उद्यान विद्या महाविद्यालय, पाणीव (माळशिरस) जि. सोलापूर (मो. 8408998989)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास हा लेख आवडला असल्यासखालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇