डाळींब हे फळझाड, 10 ते 15 % चिकणमाती, 30 ते 40 % पोयटा, 40 ते 50 % वाळू अशा प्रकारची निकृष्ट, कोणतेही पीक येत नाही अशी पडीक, हलकी, माळरानाची किंबहुना जेथे कुसळही उगवत नाही अशा शुन्य माती असलेल्या जमिनीत सुध्दा चांगले येत असल्याने महाराष्ट्रात त्याची लागवड झपाट्याने वाढली आहे. डाळींबाच्या झाडाची साल, पाने, फुलं, फळांची साल, बीज इत्यादींमध्ये असणाऱ्या औषधी उपयुक्ततेमुळे पुढील 50 वर्षेतरी त्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खात्रीची बाजारपेठ उपलब्ध असणार आहे.
डाळींब पीक लागवडीमध्यें डाळींबाच्या फुलाला अनन्यसाधारण महत्व आहे.कारण त्यांच्या संख्येवरच फळांचे उत्पन्न अवलंबून आहे. डाळींब झाडावर लागणाऱ्या फुलांचे प्रकार, त्यांच्या वाजवी संख्येसाठी आवश्यक बाबी, त्यावरील समस्या व त्या निवारण्यासाठी करावयाची सेंद्रीय उपाययोजना यावर सदर लेखात भर दिला आहे.

डाळींबावरील फुलांचे प्रकार : झाडावर किती प्रकारची फुले येतात, त्यांचे योग्य प्रमाण व वैशिष्टे पुढीलप्रमाणे प्रामुख्याने फुलाचे नर (male), द्विलिंगी (Bisexual/ Hermophrodite), व अर्धमादी (Intermediate) असे प्रकार पडतात. नर फुलांचा आकार निमूळता, नरसाळ्याचा आकार, बीज कोष (ovary) नसलेला असतो द्विलिंग फुलाचा आकार घंटीसारखा आकार, खालील फुगीर भाग, बीजकोष (ovary) असलेला असता तर अर्धमादी फुलाचा आकार निमूळता पण लहान आकाराचा बीजकोष (ovary) असलेला असतो. झाडावर नर फुलांचे सरासरी प्रमाण 30 %, द्विलिंग फुलांचे प्रमाण 55 %, तर अर्धमादी फुलाचे प्रमाण 15 %, असते. नर फुलांचे फळात रुपांतर होण्याचे सरासरी प्रमाण शुन्या टक्के असते. द्विलिंग फुलांचे फळात रुपांतर होण्याचे सरासरी प्रमाण 80 ते 90 टक्के असते तर अर्धमादी फुलांचे फळात रुपांतर होण्याचे सरासरी प्रमाण 40 ते 50 %, असते. झाडावर चांगल्या उत्पादनासाठी नर फुलांचे अपेक्षीत प्रमाण 30 टक्के द्विलिंग फुलांचे प्रमाण 70 टक्के असते तर अर्धमादी फुलांचे प्रमाण नगण्य असते. नर फुलांचे गुणधर्म म्हणजे या फुलांत परागकण असतात परंतु बीजकोष (ovary) नसते. फूल पर-परागीकरण झाल्यानंतर 2 ते 3 दिवसात गळून जातात. नर फुलांचे फळांत रुपांतर होत नाही. द्विलिंग फुलांचे गुणधर्म म्हणजे फुलांचा आकार डमरु किंवा घंटीसारखा असतो. फुलात बीजकोष (ovary) फुगीर असते फुलांचे पर-परागीकरण 90 % मधमाश्यांद्वारे व 3 % इतर कीटकांद्वारे होते. तर अर्धमादी फुलांचे गुणधर्म म्हणजे परागकणांची संख्या कमी असते. फुलात बीजकोष (ovary) लहान आकाराची असते. परागीकरणानंतर फळांचा आकार सामान्य नसतो. (Miss-shaped fruits) मधमाशांमुळे फुलांचे फळात होणारे रुपांतर वाढवता येते.
डाळींबावरील फुलांची निर्मिती : डाळींब झाडाच्या अन्नग्रहण करणाऱ्या मुळीक्षेत्रात वर्षानुवर्षे रासायनिक खते दिली जातात. परिणामी मुळी क्षेत्रातील सामू (pH) अल्कलीधर्मी होतो.त्यामुळे जमिनीतील फूल (हयूमस) जळते.गांडुळे, सूक्ष्मजिवाणू मरतात. जमीन कडक होते.ट्रॅक्टरच्या वापराने जमीन कॉंक्रीटसारखी खाली कडक झाल्याने पाण्याचा निचरा होत नाही.त्यामुळे झाडांची अन्नग्रहण करण्याची क्षमता मंदावते, अशा परिस्थितीत झाडाची फूलगळ समस्या उद्भवते.
बहार धरल्यानंतर जेव्हा फुलोरा उमलून येतो.त्यात नर फुलांचे प्रमाण जास्त असते.ह्याला कारण फळ काडीत (फळे ज्या काडीवर लागतात ती काडी) योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा साठा झालेला नसतो. मागील फळांचा हंगाम संपल्यावर फळफांद्यांची झालेली झीज भरुन न निघाल्यामुळे या फळकाड्या गर्भधारणेस (फळधारणेस) सक्षम राहत नाहीत. त्यामुळे मादी फुलांचे पोषण करुन फळ अवस्थेपर्यंत नेण्यासाठीची आवश्यक ताकद नसते. त्यामुळे फुले जरी लागली तरी ती टिकत नाहीत, गळून पडतात. त्यासाठी जमिनीत हयूमसचे प्रमाण भरपूर पाहिजे व ते सतत निर्माण होत राहणे महत्वाचे आहे.त्यामुळे खोड, फांद्या व फळफाद्यांत भरपूर अन्नसाठा भरला जातो.
चालू वर्षीच्या नवीन काडीवर डाळींबाची फुले येत नाहीत, तर मागील हंगामातील पक्व झालेल्या काडीवर फुले येतात. ह्यासाठी ह्या काडीला पक्व होण्यासाठी पानांनी तयार केलला भरपूर अन्नसाठा ह्या काडीत साठवायला पाहिजे. हे अन्न साठविण्याचे काम त्या काडीवर किंवा फळफांदीवर जी हिरवी पाने असतात ती पाने करतात. ही हिरवी पाने प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) क्रियेने सूर्यप्रकाशातून फोटॉन कणांच्या स्वरुपात सौर उर्जा घेतात. हवेतून कर्बाल्मवायू (Co2) व जमिनीतून मुळ्याद्वारे बाष्प उचलतात. त्यांचा रासायनिक संयोग पानातच होतो व त्यापासून अन्न तयार करतात. कारण कर्बाम्लवायू ह्या दोन मूलद्रव्यांपासून बनतो. हा वेगळा केलेला प्राणवायू मानव व सजीवसृष्टीच्या श्वासोश्वासासाठी पानाद्वारे पर्णछिद्रातून (Stomata) हवेत सोडला जातो.मग पानात शिल्लक राहिलेल्या कर्बाशी पाण्याचा रासायनिक संयोग होतो व त्यापासून जे अन्न पानात तयार होते त्याला कर्बोदके (Carbohydrates) म्हणतात.
जमिनीतील एकदल वनस्पतींच्या मुळ्यांना असहजिवी, सूक्ष्मजिवाणूंनी (ॲसिटोबॅक्टर, ॲझोटाबॅक्टर, ॲझोस्पिरिलय, बायजेरिकिया, फ्रँकिया) व द्विदल वनस्पतींच्या सहजिवी सूक्ष्मजिवाणूंनी (रायझोबियम) पुरवलेला सेंद्रिय नत्रडाळींबाच्या पानाकडे पाठविला जातो. त्यानंतर पानात जी कर्बोदके व सेंद्रिय नत्र या दोघांचा रासायनिक संयोग होतो व त्यापासून प्रथिने (Proteins) बनतात व ती डाळींबांच्या काडीत संग्रहीत करतात. त्याद्वारे काडी पक्व होते व फुलं काढण्यास सक्षम होते.
डाळींबाच्या फूल समस्या :
1) डाळींब झाडाच्या खोडात, फांद्यात व फळकांडीमध्ये कर्बोदके (Carbohydrates), मुख्य, दुय्यम व सूक्ष्म मूलद्रव्यांचे असंतुलीत किंवा कमी प्रमाण असणे विशेषत: नत्राचे प्रमाण जास्त असल्यास नर फुलांची संख्या जास्त होवून ती 2-3 दिवसात गळून पडतात.
2) बहार धरतांना डाळींबाच्या झाडांना पाण्याचा योग्य ताण (अपुरा किंवा जादा) न बसल्यास फूलं येत नाही.
3) डाळींबाच्या दोन बहारात योग्य अंतर नसल्यास फुल निघत नाहीत.
4) जमिनीच्या पोताप्रमाणे (भारी, मध्यम,हल्की जमीन) डाळींब झाडांची छाटणी अपुरी किंवा जादा (overpruning) झाल्यास फूलं येत नाहीत.
5) जमिनीच्या प्रतीनुसार पाणी कमी किंवा जास्त देण्यात आले तर फुलं गळतात.
6) डाळींब झाडांना जास्त ताणानंतर पाणी दिले तर किंवा नाही दिले तर जमिनीचे तापमान वाढल्याने फुलगळ होते.
7) डाळींब झाडावरील कळी फूलांवर कीड (रस शोषणाऱ्या) व रोगांचा (सर्कोस्पोरा अल्टरनेरिया, कोलेटोट्रीकम इ.) प्रादुर्भाव झाला तर फुलं गळतात.
8) डाळींब झाडात संजिवकांची (Hormones) कमतरता झाली तर समस्या उद्भवते.
9) डाळींबाला फूलं धरण्यासाठी आदर्श तापमान 270 ते 320 से लागते. 270 पेक्षा कमी किंवा 320से. पेक्षा जास्त झाले तर फुल निघण्यास अडचण येते.
10) डाळींबाच्या खरड छाटणीमुळे सुध्दा फुलं निघत नाहीत. डाळींब झाडांवर फूलं निघण्याऐवजी पालवी फुटते किंवा कायीक वाढ जास्तीची होते. त्यामुळे फुलं जोमदार येत नाहीत किंवा येतच नाहीत. फुलं निघाली तरी त्यात मादी फुलाऐवजी नर फुलांचे प्रमाण वाढते व गळते.
11) फळ पोषणासाठी आवश्यक अन्नसाठा निर्माण करण्यासाठी आवश्यकप्रमाणात पाने झाडावर नसली तर फूलं निघत नाहीत किंवा टिकत नाहीत.
12) फुलांमध्ये परागीकरण होण्यासाठी आवश्यक मधमाशांची संख्या नसली तर फळधारणा होत नाही व गर्भविहीन फुलं गळून पडतात. कारण डाळींबात मधमाशांद्वारे 97% व बाकी 3% परागीकरण इतर कीटकांपासून होते.
13) जास्त पाऊस, ढगाळ हवामान किंवा सारखा पाऊस अशा परिस्थितींमध्ये फुलं मोठ्या प्रमाणात गळतात. हिवाळा व उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात फुलगळ होते.
14) पाणी धरुन ठेवणाऱ्या, निचरा व्यवस्थीत नसलेल्या जमिनीवरील डाळींबाची फुलगळ मोठ्या प्रमाणावर होते.
15) पावसाळ्यात किंवा दमट हवामानात बुरशीजन्य रोग किंवा किडींच्या प्रादुर्भावामुळे होणारी फुलगळ थांबविण्यासाठी नियमीत औषध फवारणी न केल्यास खूप फुलगळ होते.
16) अयोग्य खते, अवाजवी सजीवकांचा वापर डाळींब बागेमध्ये केल्यास फूलांची गळ होते.
17) डाळींब लागवडींचे कमी अंतर, झाडांची दाटी, कमी सूर्यप्रकाश व खेळती हवा. नसणे, व त्यामुळे आर्द्रतेचे वाढलेले प्रमाण, यामुळे फुलांचे देठ कुजते व ती गळतात.
18) डाळींबात वांगे, टमाटे, मिरची, भेंडी, कांदे, लसून सारखे आंतरपिके घेतली तर रस शोषणाऱ्या किडांचा प्रादुर्भाव डाळींबावरील फूलावर होवून ती गळतात.
डाळींबाच्या फूलसमस्येवर सेंद्रिय उपाय :
1) डाळींब बागेसाठी काळी भारी जमीन निवडू नये, पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.
2) डाळींबाची 10X15 किंवा 10X12 फुटावर लागवड करुन संपूर्ण झाडांना भरपूर सुर्यप्रकाश व खेळती हवा मिळेल त्याची व्यवस्था करावी.
3) सेंद्रिय खते, नीम व इतर पेंडी, जीवामृताची ड्रेचींग व फवारणी, जैविक खतांचा वापर करुन डाळींब झाडावरील पानांची संख्या व आकारमान (Leaf index and surface area) वाढवण्याचा प्रयत्न करावा.
4) डाळींब बागेत धैंचा/ताग ही हिरवळीची पिके वरचेवर घेवून जमिनीतील सेंद्रिय कर्ब, सुक्ष्मजिवाणूंची संख्या वाढवून झाडे सकस व रोग प्रतिकारक्षम बनवावी. आर्थिक लाभांसाठी इतर आंतरपिके घेतल्यास डाळींबाच्या झाडांकडे अपूरे लक्ष दिले जाते, जमिनीतील अन्नसाठा वरचेवर वापरला जातो, कीड रोगाचा मुक्काम शेतात राहतो. त्यामुळे डाळींबाची योग्य वाढ व निगा होत नाही असा अनुभव आला आहे.
5) डाळींब झाडाच्या, बुडाची भोवती फूट वरचेवर काढावी, वॉटरशूट काढावेत व 4 ते 6 मुख्य फांद्या ठेवून झाडांना योग्य वळण (Training) व छाटणी (Pruning) करावी.
6) वर्षात एकच बहार घ्यावा.
7) अवाजवी संजीवके, अयोग्य सेंद्रिय खते, औषधे, जैवीक कीड व रोगनाशके वापरु नयेत. व लागवड खर्च वाढवून फूल समस्येला आमंत्रण देवू नये.
8) डाळींबाच्या मुळी क्षेत्राची माती बदलावी.
डाळींबाची फळ काढल्यानंतर झाडाखालील मुळी क्षेत्रातील जुनी माती हलक्या पध्दतीने, मुळींना इजा होवू न देता बाजूला करावी, तेथे दुसरी सुपीक माती भरावी .अशा पध्दतीने डाळींब झाडांच्या परिघातील वाढलेला सामू असलेली माती बदलल्यामुळे उच्च दर्जाची, रेडीमेड, सुपीक माती झाडाच्या मुळ्यांशी स्थिरावते.त्यामुळे मुळींना अन्नग्रहणासाठी पोषक वातावरण तयार होते.
फायदे : मुळींचे आयुष्य वाढून त्या कार्यक्षम होतात. जमीनीखालील चालणारे झाडाचे कार्य सतत निरोगी राहते. झाडाचे आयुष्य वाढून अधिकाधिक उत्पादन देतात.
9) डाळींब झाडाच्या खोडात, मुख्य फांद्यात, व पेन्सील/रिफील आकाराच्या फळकांडीमध्ये कार्बोदके 60% व नत्राचे 40% प्रमाण असेल तर फूल समस्येवर मात करता येते. त्यासाठी डाळींबाच्या झाडांना मुख्य अन्नद्रव्यांची (नत्र, स्फुरद, पालाश) स्लरी, दुय्यम अन्नद्रव्यांची (कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर) स्लरी, सूक्ष्म अन्नद्रव्यांची (लोह, मॅंगनीज, तांबे, मॉलीब्डेनम, जस्त, बोरॉन, क्लोरीन, क्रोमीयम, सोडीयम, व्हेनडीयम, आयोडीन, सिलीका, सेलेनियम व कोबाल्ट) स्लरी व कडधान्यांची स्लरीखालीप्रमाणे द्यावी.
मुख्य अन्नद्रव्यांची स्लरी : डाळींब रोप लावल्यानंतर पहिल्या बहाराआधी प्रत्येक महिन्याला एकूण 2 ते 3 वेळा द्यावी.
घटक : ताजे शेण किंवा बायोगॅसची स्लरी 20 किलो+गोमूत्र 10 लिटर+निंबोळी पेंड 15 किलो+सायट्रीक ॲसिड-100 ग्रॅम+ॲझॉस-NPK कंन्सोर्शियम 250 मिली प्रति एकर.
जिवाणूंची स्लरी : डाळींब झाडांना दर 2 महिन्यातून एकदाही स्लरी द्यावी.
घटक : ताजे शेण/बायोगॅस स्लरी-20 किलो+गोमूत्र 10 लिटर+सेंद्रिय गुळ 2 किलो+ॲझॉस – NPK कंन्सोर्शियम 250 मिली+ ई.एम.2 – 1 लिटर + ट्रायकोडर्मा 1 किलो+ पेसिलोमायसीस 1 लिटर मिश्रण 1 लिटर प्रति झाङ
कडधान्यांची स्लरी : डाळींब झाडांना दर 3 महिन्यातून एकदा ही स्लरी द्यावी.
घटक : भरडलेले कडधान्ये – मूग, मठ, चवळी, हरभरा, मसूर, वाटाणा, उडीद प्रत्येकी 1 ते 2 किलो + ताजे शेण किंवा बायोगॅस स्लरी 20 किलो + गोमूत्र 10 लिटर + ह्युमीक ॲसीड-2 लिटर+व्हर्मीवॉश (गांडूळपाणी) 2 लिटर + ई.एम 2, 10 लिटर मिश्रण 7 ते 10 दिवस आंबवून 1 लिटर प्रती झाड द्यावे.
दुय्यम व सूक्ष्म मूलद्रव्यांची स्लरी : डाळींब झाडांना दर 6 महिन्यातून एकदा द्यावी.
घटक : ताजे शेण 20 किलो + गोमूत्र 10 लिटर + शेंगदाणा पेंड 15 किलो + ॲमिनो ॲसिड-1 लिटर+सायट्रिक ॲसिड-100 ग्रॅम + दुय्यम मूलद्रव्ये (कॅलशियम 8 किलो. + मॅग्नेशियम 8 किलो+ सल्फर-8 किलो)+ सुक्ष्म मुलद्रव्ये (झिंक सल्फेट 4 किलो+मॅगनीज 800 ग्रॅम + फेरस सल्फेट1.6 किलो+कॉपर सल्फेट – 10 ग्रॅम + बोरॉन 16 ग्रॅम) सेंद्रिय मायक्रोन्यूटियंट उदा. व्हर्मीवॉश 5% मधुन कॅलशियम, स्फुरद, मॅग्नेशियम व लोह मिळते.वरील मिश्रण 1 लिटर प्रती झाड द्यावे.
10) डाळींब लागवडीसाठी बायोडायनामिक कॅलेंडर मधील निर्देशित तारखांना खत देणे, फवारणी करणे, छाटणी करणे इत्यादी केले तर डाळींबाच्या फळाची प्रत व त्याचे उत्पन्न वाढवता येते. डाळींब फूलांचा अभ्यास, झाडावरील सुक्ष्म निरिक्षण व रासायनिक ऐवजी सेंद्रिय पध्दतीचे व्यवस्थापन तंत्र वापरले तर डाळींब उत्पादक फळांचे भरघोस व उत्तम प्रतीचे उत्पादन घेवू शकतो.
दिलीपराव देशमुख बारडकर ई-10 टाईप बिल्डींग, फ्लॅट नं. 207, व्यंकटेश नगरी, अग्नीहोत्री इंजिनियरिंग कॉलेज समोर, नागठाणा रोड, वर्धा -442001 मो.नं. 9881497092 / 07378386116