जिवामृत हे खत नसून अनंत कोटी उपयुक्त सुक्ष्म जिवानुंचे सर्वोत्तम विरजन आहे. तसेच सर्वोत्तम बुरशिनाशक सर्वोत्तम विषाणू नाशक जंतूरोधक व सर्वोत्तम संजिवक आहे. जिवामृत हे सिंचनाच्या पाण्यातून देता येते, सरळ जमिनीवर टाक्त येते. शिवाय ते उभ्या पिकावर फवारणी करत येते. या तिन्ही प्रकारे त्याचा वापर केल्यास सर्वोत्तम परिणाम दुसून येतो.

कोणत्याही झाडांची हिरवी पाने दिवसा अन्न निर्मिती करतात. या प्रक्रीयेला प्रकाशसंश्लेषन क्रिया म्हणतात. एक चौ. फुट हिरवे पान एका दिवसात सुर्यप्रकाशामधुन 12.5 kg. कॅलरी सुर्य ऊर्जा पानामध्ये जमा करतात व हवेतून कर्बाम्ल वायु घेऊन (कार्बन डाय ऑक्साईड) व जमिनीतून पाणी घेऊन 1 चौ. फुट पान एका दिवसाला 4.5 ग्रॅम अन्न निर्मिती करते व त्यापासून आपल्याला 1.5 ग्रॅम अन्नधान्याचं उत्पादन मिळते. 2.5 ग्रॅम फळांचे टनेज मिळते. याचा अर्थ जर आपण पानाचे आकारमान दुप्पट केले तर उत्पादन दुप्पट होईल. पानाचे आकारमान वाढविणारे काही संजिवके असतात ते जिवामृतामध्ये असतातच म्हणून जिवामृत फवारले की पानाचा आकार वाढतो.
पिकांच्या पानावर सतत रोग निर्माण करणाऱ्या बुरशीचा व जंतूंचा हल्ला होत असतो. जिवामृत हे अत्यंत उपयुक्त बुरशीनाशक व जंतूरोधक आहे. म्हणून जिवामृत फवारल्यावर पिकांवर रोग येत नाही.
पिकांवर किडींचा हल्ला सतत होत असतो व जर पानामध्ये प्रतिकारशक्ती नसेल तर पाने किडींना बळी पडतात. जिवामृतामध्ये पानांना प्रतिकारशक्ती देणारे काही घटक असतात. त्यामुळे जिवामृत फवारणीने पानामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते व पीक किडीपासून वाचवता येते.

आणीबाणीत जर मुळांच्या माध्यमातून पानांना नत्र मिळाला नाही तर पानांची वाढ थांबते परंतु काही जिवाणु असे आहेत की जे पानावर बसून थेट हवेतून नत्र घेतात व पानांना पुरवतात. त्यापैकी एसिटो डायझोटोपिकस सारखे जिवाणु यामध्ये मुख्य भुमिका बजावतात. हे जिवाणू जिवामृतात असतातच, त्यामुळे हे जिवाणू हवेतून नत्र घेउन पानांना देतात व झाडांची वाढ चालू ठेवतात.
सुर्यप्रकाशासोबत अतीनील किरणांसारखी अत्यंत घातक विविध किरणे येत असतात ते किरण पानावर पडले की, झाडांमधील अनुवंशिक गुणधर्मांमध्ये बदल होतो व झाडांमध्ये विकृती निर्माण होते. जिवामृताची फवारणी या विविध किरणांपासून सहनशीलता देते.

वेगवेगळ्या पिकांच्या पानांना सुर्यप्रकाशाची वेगवेगळी तिव्रता सहन करण्याची क्षमता असते. जेंव्हा ऊन्हाळ्यामध्ये ( मार्च ते जुन) सुर्य प्रकाशाची तीव्रता 8000 ते 12000 फुट कँडल पर्यंत वाढते. ज्या पिकांना ही तीव्रता सहन होत नाही त्या पिकांची पाने या उन्हामध्ये बाष्पीभवनाचा वेग वाढवतात. व त्यामुळे पानामध्ये ओलावा टिकत नाही व पाने सुकण्याची शक्यता असते अशावेळी पाने मुळांना संदेश पाठवतात, संदेश मिळताच मुळे पाणी पानांकडे पाठवतात. ओलावा पानांमध्ये येताच ताबडतोब बाष्पीभवनाने निघून जातो, अशा तऱ्हेने जमिनीतील ओलावा वेगाने घटतो परिणामी पाने पिवळी पडतात, करपतात व सुकतात.