मिरची हे मसाला पिकातील महत्त्वाचे पीक आहे. या कोरवाहू पिकाकरिता निचर्याची आणि मध्यम प्रतीची जमीन मानवते. हलक्या जमिनीत केवळ बागायती पीक म्हणून मिरची घेता येते. चूनखडी असलेल्या जमिनीत मिरचीचे उत्पन्न चांगले मिळते. हे पिक खार्या जमिनी खेरीज सर्व प्रकाराच्या मध्यम ते खोल जमिनीत या पिकाची लागवड करता येते. गावाशेजारच्या पांढरीच्या जमिनीत हे पीक चांगले येते.
मिरची हे भारतातील सर्व वर्गातील लोकांच्या रोजच्या आहारामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वापरले जाणारे एक महत्वाचे भाजीपाल्याचे पीक आहे. विदर्भात नागपूर, बुलढाणा, अमरावती आणि चंद्रपूर हे मिरची पिकवणारे मुख्य जिल्हे आहेत. मराठवाड्यातील सातही जिल्ह्यात मिरची लागवड केली जाते. नांदेड जिल्ह्यातील देगलुर नायगाव व बिलोली हे तालुके मिरचीच्या उत्पादनांची मुख्य केंद्र आहेत.
उपयोग : मिरची हा भारतीय अन्न पदार्थातील महत्त्वाचा घटक असून आमटी, लोणची, चटणी, भाजी वगैरे सारख्या पदार्थातून मिरचीचा उपयोग करण्यात येतो. मिरचीपासून केलेल्या पदार्थाचा उपयोग पचन क्रियेस मदत करण्यास बलवर्धक औषधांसारखा होतो. टॅनिनमध्ये हे मिसळून याच्या पाण्याने गूळण्या केल्यास घसा साफ होतो व श्वास नलीकेचे विकार दूर होतात. मिरचीतील तिखटपणा कॅपसीसीन या द्रव्यामुळे असतो. कॅपसीसीन हे मिरचीच्या बिया व सालीपेक्षा आतील पडद्यातच जास्त असते. म्हणून बिया पेक्षा आणि सालीपेक्षा आतील गर अधिक तिखट असतो. शेतकर्यांच्या दृष्टीने हे पीक फायद्याचे आहे. याचे मशागत थोड्या खर्चात होते. तसेच हे पीक कोरडवाहू किंवा बागायती म्हणूनही घेता येते. मिरचीचे रासायनिक पृथकरण खालील प्रमाणे आहे.
हवामान : मिरची हे उष्ण कटीबंधातील पिक असून त्यास उष्ण व काहीसे दमट हवामान चांगले मानवते. मिरची बियाची उगवण होण्यासाठी 18 ते 27 सें ग्रे. तापमानाची गरज असून पिकाच्या चांगल्या वाढीसाठी 25 ते 30 सें.ग्रे. तापमानाची आवश्यकता असते. निरनिराळ्या जमिनीत हे पीक येऊ शकते. पण गाळाच्या जमिनीत हे पीक उत्तम प्रकारे येते. कोरडवाहू पिकाकरिता निचर्याची आणि मध्यम प्रतीची जमीन मानवते. हलक्या जमिनीत केवळ बागायती पीक म्हणून मिरची घेता येते. चूनखडी असलेल्या जमिनीत मिरचीचे उत्पन्न चांगले मिळते. हे पिक खार्या जमिनी खेरीज सर्व प्रकाराच्या मध्यम ते खोल जमिनीत या पिकाची लागवड करता येते. गावाशेजारच्या पांढर्या जमिनीत हे पीक चांगले येते.
जाती : कोरडवाहूसाठी सुधारीत जाती संकेश्वरी आणि परभणी तेजस तर ओलितासाठी पुसा, पंत-सी-1, जी- 4, पुसा ज्वाला, फूले ज्योती, तेजस्वीनी, अग्नीरेखा, फूले सूर्यमूखी, फूले मूक्ता, कोकण कीर्ती, बी सी -25 आणि भास्कर (एलसी ए -235) आणि प्रकाश (एल सी ए -206), याशिवाय अजीत सीडसची अजीत-1, अजीत-3, अंकुर सीडची नागकन्या, मिरची आचारी, मिरची गुलजार, ए.आर.सी.एच.112, ए.आर.सी.एच.226, ए.आर.सी.एच 228,
संकरीत जाती : याशिवाय विविध कंपन्यांच्या संकरीत जाती आहेत. त्यामध्ये इंडो अमेरिकन सीडसची पोपटी इंडम 9 नंबर, इडम 5 नंबर, इंडम 6 नंबर, किरण, तेजस्वीनी, सुजाता, सूर्या, एम.एच.पी-58, नामधारी सीडची एन.एस.1101, एन. एस.1420, एन.एस.1701, एन.एस.101 यांचा समावेश होतो.
मशागत : पहिल्या पिकांची कापणी झाल्याबरोबर जमीन 10 ते 15 सें.मी. खोल नांगरावी आणि उन्हात तापू द्यावी. पहिल्या पिकाची खोडे व इतर काडिकचरा वेचून घेऊन कूळवाच्या आडव्या पाळ्या घालाव्यात, म्हणजे जमीन चांगली भुसभुशीत होईल. शेवटची पाळी पहिला पाऊस पडल्यावर देणे चांगले. बागायती पिकाकरिता 60 बाय 60 सेमी, 75 बाय 75 सेमी किंवा 90 बाय 90 सेमी या अंतराने जमिनीच्या मगदुरा प्रमाणे सर्या पाडाव्यात.
फेरपालट : मिरचीचा फेरपालट वांगी, तंबाखू, टोमॅटो आणि बटाटे या पिकाबरोबर करू नये. कारण ही पिके एकाच कूळातील असून, त्या सर्वावर सामान्यत: एकाच प्रकारचे रोग व किडी पडतात. एकाच जमिनीत सारखी मिरची घेतल्यास उत्पन्न चांगले मिळते असा विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्याचा अनूभव आहे. साळ, मका, कडधान्ये, भुईमूग आणि कापूस ही पिके फेरपालटास उत्तम आहेत.
खते : मिरचीला भरपूर खत लागते. भरपूर खतामुळे पिकही चांगले येते. हेक्टरी 20 ते 30 टन चांगले कूजलेले शेणखत कुळवाच्या शेवटच्या पाळीच्या अगोदर द्यावे किंवा प्रत्येक रोपाच्या जागेवर 50 ते 100 ग्रॅम चांगले कुजलेले शेणखत टाकून मातीत चांगले मिसळावे व त्या जागी रोपे लावावीत. अशा प्रकारे दिलेले खत शेतात पसरून टाकलेल्या खतापेक्षा अधिक परिणामकारक होते. तसेच 120 किलो नत्र 80 किलो स्फुरद व 50 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. राहिलेले अर्धे नत्र लागवडीनंतर एक महिण्यानी द्यावे.
लागवड हंगाम : मिरचीची लागवड तिन्हीही हंगामात करतात. खरीप जून ते जुलै रब्बी ऑक्टोंबर ते नोव्हेबर, उन्हाळी फेब्रुवारी लागवडीसाठी प्रति हेक्टरी एक किलो बियाणे लागते. रोपे गादीवाफ्यावर तयार करून घ्यावीत. जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी व चांगले कुजलेले 20 ते 30 टन शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. लागवड सरी-वरंबे पद्धतीने 60 बाय 45 सेमी, 60 सेमी, 75 बाय 75 सेमी किंवा 90 बाय 90 सेमी अंतरावर जमिनीच्या मगदुरा प्रमाणे करावी.
रोपे तयार करणे : मिरची या पिकाकरिता चांगले जोमदार व निरोगी रोपे तयार करणे महत्त्वाचे आहे. अशा पिकाचे 50 टक्के यश रोपे तयार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. त्यामुळे खात्रीच्या रोपवाटीकेतून मिरचीची रोपे आणून लागवड करावी. किंवा स्वत: रोपे तयार करावीत. जोमदार व निरोगी रोपापासून पीक तयार करणे केव्हाही चांगले असते. या करिता सुधारलेल्या जातीच्या निवडक मिरचाच्या बियापासून बी धरणे पाहिजे व त्या बियाण्यास बुरशीनाशक औषधाची मात्रा लावून बियाणे रोपे तयार करण्यासाठी वापरावी. 1 ते 15 किलो बियाणे एक हेक्टर क्षेत्रासाठी पुरेशे होते. संकरीत जातीचा वापर करावयाचा असल्यास 400 ते 500 ग्रॉम बियाणे प्रति हेक्टरी पुरेशे होते.
जमिनीची पूर्वमशागत चालू असतानाच रोपे तयार करण्याकरिता राखून ठेवलेल्या जमिनीवर रोपे तयार करावीत. रोपे तयार करण्याकरिता पाण्याची सोय असेल अशी विहिरीजवळची व उंचीवरची जमीन निवडावी. या जागेवर दोन बाय एक मीटर लांबी, रूंदीच्या आकाराचे व 15 सेमी उंचीचे गादी वाफे तयार करावेत. व वाफ्याच्या पृष्टभागावर शेणखताचा व रासायनिक खत सुपर फॉस्फेट 200 ग्राम प्रती वाफा मिसळून पातळ थर पसरावा. एक हेक्टर पीक लावण्याकरिता वरील आकाराचे 30 ते 40 गादी वाफे लागतात. बियाण्याची पेरणी लागवड करण्यापूर्वी वाफ्यामध्ये 20 ग्राम दाणेदार मिसळून घ्यावे. वाफा बांधल्यावर वरचा भर भुसभुशीत ठेवावा. त्यामुळे बी चांगले रूजुन रोपाची वाढ व्यवस्थित होते. तीन ते चार सें.मी. खोलवर बियाणे पेरावे व हलक्या हाताने ते मातीने झाकावे. पेरणी नंतर लगेचच वाफ्यात प्रथम झारीने पाणी द्यावे. त्यामुळे बी वाहून जात नाही. रोपे उगवून पाच ते आठ सेमी होईपर्यत त्यांना झारीने पाणी द्यावे. त्यानंतर रोपांना पाण्याची गरज वाढते. म्हणून पाटाने पाणी सोडावे. जादापाणी दिल्यास रोपे खराब होतात.
वाफा बांधल्यावर वरचा थर भुसभुशीत ठेवावा. त्यामुळे बी चांगले रूजुन रोपांची वाढ व्यवस्थीत होते. तीन ते चार सेमी अंतरावर खुरप्याने अगर बोटाने रेषा ओढून त्यामध्ये दोन ते सेमी खोलीवर बियाणे पेरावे. व हलक्याशा हाताने ते मातीने झाकावे बी पेरणीपूर्वी बियाणास आवश्यकता भासल्यास बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. पेरणीनंतर लगेचच वाफ्यात झारीने पाणी द्यावे.
रोपाची वाढ जोमाने होण्यासाठी दोन ओळीमध्ये हालकीशी खुरपणी करून वाफ्यातील तण काढावे व युरियाची मात्रा द्यावी. रोपाचे कीड व रोगांपासून संरक्षण करण्यासाठी 15 मिली नुवॉकान किंवा एन्डोसल्फान किंवा रोगर अधिक 25 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईट किंवा बाविस्टीन 10 लिटर पाण्यात या औषधीची फावारणी रोपे उगवणीनंतर दहा ते बारा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्यात करावी.
पुनर्लागवड : सर्व साधारणपणे बी पेरल्यापासून एक ते दीड महिन्यात रोपे स्थलांतरित करण्यालायक होतात. त्यावेळी रोपाची उंची 10 ते 12 सेमी होते. तत्पूर्वी लागवडीसाठी योग्य केलेल्या जमिनीत भाजीपाला पिके व जातिनिहाय शिफारशीनुसार योग्य अंतरावर सर्या अथवा सपाट वाफे तयार केल्यानंतर नत्र व पालाश खताचा शिफारशीप्रमाणे पहिला हप्ता जमिनीत मिसळून द्यावा व जमीन व्यवस्थित भिजवून लागवडीयोग्य करावी. कायम रोपे स्थलांतरित करताना रोपे काढणीपूर्वी वाफ्यास हलकेसे पाणी द्यावे, त्यामुळे रोपे सहज उपटतील. थंड हवामानात सायंकाळी किंवा ढगाळ वातावरणात रिमझिम पाऊस चालू असताना रोपाचे स्थलांतर केव्हाही करावे. लागवड करताना रोपे कमजोर नाहीत, याची काळजी घ्यावी. लागवडीनंतर ताबडतोब आंबवणीचे पाणी द्यावे.
आंतरमशागत : लागवडीनंतर एक ते दोन खुरपण्या करून जमीन तणविरहीत ठेवावी. ज्यावेळेस फलधारणेस सुरूवात होईल, त्यावेळेस रोपांना बाजूंनी माती लावावी. तण नियंत्रणासाठी रोपे लावण्यापूर्वी स्टॉम्प दीड लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे.
खांदणी : बागायती पिकास जेथे लागवणीपूर्वी सर्या तयार केल्या जातात तेथे नायट्रोजनचा दुसरा हप्ता देण्याच्या वेळी खादणी करावी. म्हणजेच फळे धारणाच्या आधी दोन ओळीमधून साध्या अगर सरी पाडण्याच्या नांगराने बांधी करून घ्यावी लावणी केलेल्या सरीची दुसरी बाजू खंदून मोकळी माती दुसर्या सरीत लावावी. यामुळे रोपे वरंब्यावर येतात. खांदणीमुळे झाडांना आधार मिळतो तण कमी होते आणि हवा खेळती राहते.
पाणी व्यवस्थापन : ओलिताखालील मिरचीस खरीप हंगामात गरजेनुसार रब्बी हंगामात 10 ते 12 दिवसांनी तर उन्हाळी हंगामात पाच ते सात दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
काढणी व उत्पादन : हिरव्या मिरच्याची पहिली तोडणी 75 ते 90 दिवसात काढणीस येते. लाल मिरचीची पहिली काढणी रोपे स्थलांतरित केल्यानंतर 120 दिवसात निघते. मिरची फुलावर असताना प्लॅनेफीक्स फवारावे, हिरव्या मिरचीचा तोडा केल्यास राहिलेल्या पिकाचे उत्पादन वाढते. कोरडवाहू हिरव्या मिरचीचे उत्पादन 100 ते 150 क्विंटल उत्पादन मिळते. ओलिताखालील हिरव्या मिरचीचे 250 ते 300 क्विंटल प्रति हेक्टरी तर वाळलेल्या लाल मिरचीचे उत्पादन 10 ते 15 क्विंटल मिळते.
बियाणे काढणे : मिरचीच्या पिकात बर्याच प्रमाणात नैसर्गिकरित्या परपरागीमीलन होते. म्हणून मिरचीच्या सुधारित जातीची शुद्धता राखण्याकरीता मिरची लावलेल्या प्लॉटमधून भरपूर मिरची आलेली त्या जातीची ठराविक झाडे निवडली पाहिजेत या झाडाच्या मिरच्या संपूर्ण पक्व झाल्यावर वेगवेगळ्या तोडून, उन्हात संपूर्ण फळे चांगली वाळवावीत तसेच थंड आणि कोरड्या ठिकाणी मे महिन्यापर्यंत साठवून ठेवाव्यात. साठवणीकरीता लोखंडी डब्बे किंवा पंप वापरावे चांगले पेरणीपूर्वी एक आठवडा बिया मिरचीपासून वेगळ्या कराव्यात बी काढून वेगळे केल्यावर काही तास उन्हात चांगले वाळवावे.
डॉ. एस. बी. रोहिदास / प्रा. जी. एन. इंगळे / एस. व्ही. कल्याणकर
उद्यान विद्या संशोधन योजना (भाजीपाला) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, परभणी.