आडसाली उसासाठी दुसऱ्या नांगरटीपूर्वी हेक्टरी 50 ते 60 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. शेणखत अगर कंपोस्ट खत उपलब्ध नसल्यास ऊस लागवडीपूर्वी ताग किंवा धैंचा यासारखे हिरवळीचे पीक घेऊन फुलोऱ्यापूर्वी जमिनीत गाडावीत. स्फुरद व पालाशयुक्त खते पेरून द्यावीत. नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नत्रयुक्त खते उसाच्या मुळाच्या सान्निध्यात येतील अशा पद्धतीने द्यावीत. युरियाचा वापर करताना निंबोळी पेंडीचा 6:1 या प्रमाणात वापर करावा.
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीसाठी गरजेनुसार हेक्टरी 25 किलो फेरस सल्फेट, 20 किलो झिंक सल्फेट, 10 किलो मॅंगेनीज सल्फेट आणि पाच किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे.
एकात्मिक खत व्यवस्थापन : शिफारशीनुसार चांगले कुजलेले खत अगर कंपोस्ट खत टाकून जमिनीत मिसळावे यापैकी अर्धी मात्र दुसर्या नांगरटी पूर्वी द्यावी. शेणखत किंवा कंपोस्ट खत उपलब्ध नसल्यास तग किंवा धैंचा सारखी हिरवळीचे पीक घेऊन पीक फुलकळी अवस्थेत जमिनीत गाडावी. जमिनीचे मातीपरीक्षण करून खताचे नियोजन करावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरत असल्यास गरजेनुसार स हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट, 20 किलो झिंक सल्फेट 10 किलो मंगनीज सल्फेट व 5 किलो बोरे क्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये (10:1 प्रमाणात) 2-3 दिवस मुरवून सरीमध्ये चाली घेऊन मातीआड करावे.
आडसाली उसासाठी रासायनिक खत देण्याचे वेळापत्रक (किलो प्रतिहेक्टरी) : आडसाली उसासाठी रासायनिक खते देताना वेळापत्रक पाळणे महत्त्वाचे असते. लागवडीच्या वेळी नत्र (युरिया) 40 (87), स्फुरद 85 (531) व पालाश 85 (142) अशी खत मात्रा द्यावी. लागवडीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी नत्र (युरिया) 160 (346), या खता मात्रा द्यावी. लागवडीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी नत्र (युरिया) 40 (87) येवढी खत मात्रा द्यावी. मोठ्या बांधणीच्या वेळी नत्र (युरिया) 160 (346), स्फुरद 85 (531) व पालाश 85 (142) अशी खत मात्रा द्यावी. सर्वसाधारण आडसाली ऊसाला एकूण नत्र (युरिया) 400 (868), स्फुरद 170 (1062) व पालाश 170 (284) अशी खत मात्रा द्यावी.
आडसाली उसामध्ये घ्या आंतरपिके 15 जुलै ते 15 ऑगस्ट या दरम्यान आडसाली उसाची लागण केली जाते. या हंगामात जमिनीच्या प्रकारानुसार भुईमूग, चवळी, सोयाबीन व भाजीपाला ही आंतरपिके घेता येतात. भुईमुगाच्या फुले प्रगती, टॅग-24, टी.जी.-26 या जाती निवडाव्यात. सोयाबीन आंतरपीक घेतल्यास जे.एस.-335 किंवा फुले कल्याणी या जातींचा वापर करावा. उसाची लागण करताना पट्टा पद्धतीने 2.5 – 5 किंवा 3 – 6 फूट अशा जोडओळ पद्धतीने लागवड केल्यास पट्ट्यामध्ये आंतरपीक चांगल्या प्रकारे घेता येते. उसामध्ये आंतरपिकाच्या बियाण्याचे प्रमाण आंतरपिकाच्या ओळीच्या संख्येनुसार व व्यापलेल्या क्षेत्रानुसार ठरवावे. आंतरपिकासाठी त्यांनी व्यापलेल्या क्षेत्रानुसार त्या त्या पिकाची शिफारशीत रासायनिक खतांची मात्रा वेगळी द्यावी. ऊस पिकामध्ये ताग, धैंचा यांसारख्या हिरवळीच्या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करता येतो. बाळबांधणीच्या वेळी हिरवळीची पिके सरीमध्ये गाडून बाळबांधणी करता येते. यामुळे जमिनीची सुपीकता टिकविण्यास मदत होते.
आंतरमशागत व तणनियंत्रण : उसाच्या उगवणीनंतर शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर करून आवश्यकतेनुसार तणांचे नियंत्रण करावे. कृषिराज अवजाराच्या साह्याने लागणीनंतर तीन महिन्यांनी बाळबांधणी करावी. पीक 4.5 ते 5 महिन्यांचे झाल्यानंतर पहारीच्या अवजाराने वरंबे फोडून व नंतर रसायन कुळव चालवून आंतरमशागत करावी. रासायनिक खतांची मात्रा देऊन रिजरच्या साह्याने मोठी बांधणी करावी. पाणी देण्यासाठी सऱ्या, वरंबे सावरून घ्यावेत.
तोडणी व उत्पादन : आडसाली हंगाम : तोडणी १४-१६ महिन्यानंतर करावी. प्रचलित फुले २६५ आणि को ८६०३२ या जातींची हेक्टरी २०० – २५० उस उत्पादन मिळते.
खोडवा व्यवस्थापन : गाळपासाठी पक्व उस पिकाची जमिनीलगत तोडणी करावी. बुडखे मोकळे करून पाचट सरीत लोटावे. वरती राहिलेले बुडखे धारदार कोयत्याने छाटावेत. छाटलेल्या बुडख्यावर कार्बेनडयाझीम १ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. सरीत लोटलेल्या पाचटावर 5 किलो युरिया, 10 किलो एस.एस.पी. आणि १ लिटर यादव पाटील केमिकल इंडस्ट्रीजचे भू-रत्ना हे पाचट कुजविणारे जीवाणू प्रतीटन पाचटासाठी वापरावे 30 दिवसात पाचट कुजून त्याचा सेंद्रिय खत तयार होतो. खोडवा पिकास पाणी द्यावे. वापस आल्यानंतर 50 % रासायनिक मात्र ( सूक्ष्म अन्नद्रव्यांसह) पहारीच्या सहाय्याने बेटापासून अर्धा फुट अंतरावर, अर्धा फुट खोलीवर द्यावे. दोन खड्ड्यांमधील अंतर 1 फुट ठेवावे. ही मात्र सरीच्या बाजूने उस तुटल्यानंतर 15 दिवसांच्या आत द्यावी. उर्वरित 50 % मात्रा याच पद्धतीने, परंतु सरीच्या विरुद्ध बाजूने 135 दिवसांनी द्यावी.
प्रा. दर्शना भिमराव मोरे, प्रा. पल्लवी सुभाष घुले, के. के. वाघ. उद्यानविद्या महाविद्यालय नाशिक (मोबा. 9689217790)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा