फॉल आर्मी वर्म (लष्करी अळी) शास्त्रीय नाव स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा ही अमेरिकेत मका पिकावर येणारी महत्वाची कीड आहे. भारतात जुन 2018 मध्ये सर्व प्रथम दक्षिण कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये या किडीची नोंद झाली. महाराष्ट्रात देखील मागील दोन वर्षापासून ही कीड मका, मधुमका, ज्वारी, बाजरी, भात ही तृणधान्य पिके तसेच कापूस, सोयाबीन, ऊस या पिकांना देखील मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव करतांना आढळते आहे.
सदर कीड बहुभक्षी असून 80 पेक्षा जास्त वनस्पतींवर उपजिविका करते. परिणामी सर्वच हंगामामध्ये किडीसाठी यजमान वनस्पती सहजपणे उपलब्ध होत असल्याकारणाने सदर किडीचे व्यवस्थापन करतांना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.
प्रवास क्षमता : या किडीचा पतंग एका रात्रीत सुमारे 100 कि. मी.पर्यंत तर वाऱ्याचा वेग अनुकूल राहिल्यास 30 तासात 1600 कि. मी.पर्यंत गेल्याची नोंद आहे. यामुळे दुर्गम भागातील मका पिक शोधून तिथेही सहजपणे अंडी घालू शकत असल्याने जवळपास सर्वच जिल्ह्यात मका पिकावर या किडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.
प्रजनन क्षमता : या किडीचे जीवनक्रम वर्षभर चालू असते. सदर किडीची प्रजनन क्षमता प्रचंड असून मादी तिच्या जीवनक्रमात सुमारे 1 ते 2 हजार अंडी घालते व त्यामुळे अल्पावधीतच किडीच्या संख्येत प्रचंड वाढ होते.
ओळख व जीवनक्रम
पतंग : नर पतंगाचे पुढील पंख करड्या व तपकिरी रंगाचे असून पंखाच्या टोकाकडे व मध्यभागी पांढरे ठिपके असतात. तर मादी पतंगाचे पुढील पंख पूर्णपणे करड्या रंगाचे असतात. नर व मादी पतंगाचे मागील पंख चमकदार पांढरे असून कडा करड्या रंगाच्या असतात. पतंग निशाचर असून 7 ते 12 दिवस जगतात. उष्ण व दमट वातावरणात ते खुपच सक्रीय असतात.
अंडी : मादी पतंग पानांच्या वरच्या किंवा खालील बाजूस, पोग्यांमध्ये पिवळसर – सोनेरी घुमटाकार 100 ते 200 अंडी पुजाक्यांमध्ये घालते. त्यावर लोकरीसारखे मऊ संरक्षक आवरण असते. अंडी अवस्था 2 ते 3 दिवसांची असते.
अळी : अळी अवस्था पिकाला प्रत्यक्ष नुकसान करणारी असल्यामुळे ती ओळखतांना पुढील खुणा लक्षात ठेवाव्यात. पूर्ण वाढलेली अळी 3.1 ते 3.8 से. मी. लांब असते. अळीचा रंग फिक्कट हिरवा ते जवळपास काळा असतो. पाठीवर फिक्कट पिवळ्या रंगाच्या तिन रेषा असतात. डोक्यावर उलट्या इंग्रजी ‘Y’ अक्षरासारखी खुण असते तर कडेने लालसर तपकिरी पट्टा असतो. शरीरावरील आठव्या खंडावर चौकोनी आकारात फुगीर गोल अंडी अथवा फिक्कट रंगाचे 4 ठिपके दिसुन येतात. अळीच्या शरीरावर इतरत्र कुठेही अशी ठेवण दिसत नाही. या दोन बाबींवरूनच प्रामुख्याने या प्रजातीची ओळख करता येणे सोपे होते. सामान्य लष्करी अळीचे शरीर तपकिरी असले तरी बहुतांश अळीची पाठ हिरवट असते व अशा अळीच्या पाठीवर फुगीर ठिपके गडद रंगा एैवजी हलक्या रंगाचे असतात. अळी अवस्था सहा टप्यांमध्ये पूर्ण होते. अळी अवस्था उन्हाळ्यात 14 दिवसांची तर हिवाळ्यात किंवा थंड वातावरणात ती 30 दिवसांपर्यंत असू शकते.
कोष : कोषावस्था जमिनीत 2 ते 8 सेंमी खोलीवर मातीच्या आवेष्टनात आढळते. कोष लालसर तपकिरी रंगाचे असतात. कोषावस्था 9 ते 30 दिवसांपर्यंत असू शकते. अशा प्रकारे 32 ते 46 दिवसांमध्ये किडीचा एक जीवनक्रम पूर्ण होतो. मोठा पाऊस आणि ढगाळ हवामान सतत एक आठवड्यापर्यंत राहिल्यास किडीची मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येते.
नुकसानीचा प्रकार : लष्करी अळीचा प्रादूर्भाव मका पिकावर सर्वच अवस्थांमध्ये आढळून येतो. अळ्या सुरुवातीस समुहाने राहतात पानांचा पृष्ठभाग खरबडून खातात. पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळ्यांनी पानांचा हिरवा पापुद्रा खाल्ल्यामुळे पांढरे चट्टे पडल्याचे दिसते. मोठ्या झाल्यावर अळ्या वेगवेगळ्या होतात. ही कीड स्वजातीय भक्षक असल्यामुळे एका पोग्यांत एक किंवा दोनच अळ्या आढळून येतात. तिसऱ्या अवस्थेतील अळ्या पोंग्यामध्ये शिरून पाने खायला सुरुवात करतात. त्यामुळे पोग्यांतून बाहेर आलेल्या पानांवर एकारेषेत एकसमान छिद्रे दिसून येतात. पाचव्या अवस्थेतील अळी पोग्यामंध्ये राहून पाने खात असल्याने मोठ्या आकाराची छिद्रे दिसतात. सहाव्या अवस्थेतील अळी अतिशय खादाड असून अधाशीपणे पाने खाते व पोग्यामंध्ये मोठ्या प्रमाणात विष्टा टाकलेली आढळते या अवस्थेत मक्याची पाने झडल्यासारखी दिसतात. बऱ्याच वेळा अळी कणसाच्या बाजूने आवरणास छिद्रे करून आतील दाणे देखील खाते.
पिक अवस्थेनुरूप करावयाचे व्यवस्थापन : मका पिक शेवटची पोंग्यांची अवस्था ते तुरा अवस्थेत असल्याने त्वरित उपाययोजना केल्यास लष्करी अळीमुळे होणारे नुकसान टाळता येईल.
सर्वेक्षण : पिकाचे आठवड्यातून दोन वेळा नियमित सर्वेक्षण केल्यास वेळीच अळीचा प्रादूर्भाव ओळखणे शक्य होते. त्याकरिता प्रत्यक्ष शेताचे निरीक्षण करतांना शेतात नागमोडी किंवा इंग्रजी W अक्षरासारखे फिरून पाच ठिकाणे व प्रत्येक 20 झाडे किंवा दहा ठिकाणे व 10 झाडे निवडावीत. प्रादूर्भावग्रस्त झाडांची टक्केवारी काढण्यास एकरी एवढे पुरेसे आहे. समजा 20 झाडांपैकी 2 झाडे प्रादुर्भावीत असतील तर नुकसान पातळी 10 टक्के आहे असे समजावे व अर्थिक नुकसान संकेत पातळी लक्षात घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात.
प्रत्यक्ष शेताचे निरीक्षण : मध्यम पोंग्यांची अवस्थेमध्ये (उगवणीनंतर 5 ते 6 आठवडे) 10 टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे दिसून येताच त्वरित उपाययोजना करावी. शेवटची पोंग्याची अवस्थेमध्ये (उगवणीनंतर 7 आठवडे) 20 टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे दिसून येताच त्वरीत उपाययोजना करावी. तर तुर्याच्या अवस्थेमध्ये (उगवणीनंतर 8 आठवडे) फवारणी टाळावी मात्र 10 टक्के प्रादुर्भावग्रस्त कणसे असल्यास फवारणी करावी.
हेही वाचा :
मका पिकावरील किडींचे असे करा व्यवस्थापन
विमा कंपनीकडे पीक नुकसानीची तक्रार करण्यासाठी हे आहेत चार पर्याय
असे करा, गाजर गवत तणांचे एकात्मिक नियत्रंण
बियाणे खरेदी करताना काय घ्यावी काळजी ?
कामगंध सापळ्यांचा वापर : मक्यावरील लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी 5 कामगंध सापळे वापरावेत. या कामगंध सापळ्यांमध्ये 3 पतंग प्रति सापळा आढळून आल्यास ट्रायकोग्रामा प्रीटीओसम किंवा टीलेनोमस रेमस यांनी परोपजीवग्रस्त केलेली 50,000 अंडी प्रति एकर एक आठवड्याच्या अंतराने 3 वेळा शेतात प्रसारण करावे.
प्रकाश सापळ्यांचा वापर : किडीचे पतंग मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्यास, प्रकाश सापळ्यांचा वापर करून पतंग पकडावेत व रॉकेल मिस्त्रीत पाण्यात बुडवून नष्ट करावेत. किडीच्या जास्तीत जास्त अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
किडीचे पर्यायी खाद्य तणे : जसे हराळी (सायनोडॉन डॅक्टीलॉन), सिंगाडा (बकव्हीट), डिजीटेरीया प्रजाती (कॅबग्रास) इ. वेळोवेळी काढून नष्ट करावीत. पिकाची काढणी लवकर करावी त्यामुळे नंतरच्या हंगामातील किडीच्या प्रादुर्भावातून सुटका होईल. मका हे मुखत्वे चारा पिक म्हणून घेतले जात असल्याने रासायनिक किटकनाशकांची फवारणी करणे टाळावे. किडीचा प्रादूर्भाव लक्षात घेऊन फवारणीसाठी जैविक घटकांचा वापर करावा. यासाठी निंबोळी अर्क 5 % एक लिटर किंवा अॅडीरेक्टीन 1500 पीपीएम 50 मिली किंवा बॅसिलस थुरीन्जीएन्सिस कुर्सटाकी प्रजाती 20 ग्रॅम किंवा मेटा-हायजिअम अॅनिसोप्ली (1 x 10८ सी एफ यु / ग्रॅम) 50 ग्रॅम किंवा नोमुरीया रिलाई (1 x 10८ सी एफ यु / ग्रॅम) 50 ग्रॅम याची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संध्याकाळच्या वेळेस जैविक घटकांची फवारणी पोंग्यामध्ये द्रावण जाईल अशा पद्धतीने करावी. त्यानंतर 10 दिवसांच्या अंतराने 1 ते 2 फवारण्या कराव्यात.
रासायनिक नियंत्रण : केंद्रीय कीटकनाशक मंडळाने काही कीटकनाशकांची तात्पुरत्या स्वरुपात शिफारस केलेली आहे. त्यांचा वापर फवारणीसाठी करता येईल.
फवारणीसाठी किटकनाशके : इमामेक्टीन बेंन्झोएट 5 डब्ल्यु जी 4 ग्रॅम किंवा स्पाईनेटोरम 11.7 एस सी 5 मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल 18.5 एस सी 4 मिली किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट 5.25 % + ल्युफेन्युरॉन 40 % डब्ल्यु जी 1.6 ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल 9.3 % + लॅमडा सायहॅलोथ्रीन 4.6 % झेड सी 5 मिली याची फवारणी करावी.
टिप : किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. द्रावण पोग्यांत जाईल याची काळजी घ्यावी. एकाच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी हंगामात दोन पेक्षा जास्त वेळा करू नये. मका हे चारा पिक म्हणून घेतले असल्यास रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करू नये.
यु. ए. पवार, डॉ. एस. टी. आघाव, व डॉ. सी. एस. पाटील कृषी किटकशास्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जिल्हा. अहमदनगर.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा