कारली हे वेलवर्गीय फळभाजी शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळवून देणारे अल्पावधीतील पीक आहे. या पिकाचा अधिक उत्पादनासाठी वेळेवर कीड व रोग व्यवस्थापन करणे गरजेचे असते. तत्पूर्वी किडी आणि रोगांची माहिती कारली उत्पादक शेतकऱ्यांना असणे गरजेचे असते.
हवामानातील अचानक बदलामुळे कारली फळभाजी पिकावर किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. काही किडीमुळे रोगांचा प्रसार होतो. मात्र योग्य उपायोजना केल्यास याचे वेळीच नियंत्रण करता येते. मात्र त्यासाठी किडींची ओळख होणे आवश्यक असते. यासंदर्भात महात्मा फुले कृषी विद्यापीठातील भाजीपाला सुधार प्रकल्पातील माजी प्रा. बबनराव इल्हे यांनी सांगितलेल्या काही टिप्स्
महत्त्वाच्या गोष्ट : काकडीचे असे करा पीक संरक्षण
1) फळमाशी : फळमाशी ही कीड खरीप आणि उन्हाळी हंगामात आढळते. खरिपात विशेष करून जास्त प्रादुर्भाव होतो, किडीची मादी माशी कळीच्या त्वचेमध्ये अंडी घालतात. अंडी उबवून अळ्या फळांमध्ये वाढतात. आणि त्या पूर्ण वाढीनंतर भोके पाडून बाहेर पडतात. फळमाशी लागलेली फळे लगेच ओळखता येतात. ती बहुधा वाकडी असतात. जेथून वाकतात तेथूनच अळीचे छिद्र दिसते आणि बरीचशी फळे त्याजागी पिकलेली दिसतात.
याच्या नियंत्रणासाठी अशी फळे दिसताक्षणीच तोडून पुरून किंवा जाळून टाकावीत. रक्षक सापळ्यात क्यूल्यूर वापरून एकरी चार ते पाच लावावेत. पिकावर 10 लिटर पाण्यात 20 मिली. एन्डोसल्फान किंवा डेल्टामेथ्रीन पाच मिली, 100 ग्रॅम गूळ आणि 10 लिटर पाणी मिसळून फुले येण्यास सुरूवात झाल्यावर फवारावे. एका आठवड्याच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या केल्यास कीड आटोक्यात येते.
फायद्याच्या टिप्स : भेंडीवरील किडींचे असे करा एकात्मिक व्यवस्थापन
2) मेलॉन वर्म : अळ्या हिरव्या रंगाच्या व शरीरावर पांढरे पट्टे असतात. त्या पाने खाऊन पानांची चाळणी करतात. तसेच फळावरील साल खातात आणि फळात ही शिरून आतील भाग खातात. याच्या नियंत्रणासाठी पानावर अळ्या दिसू लागताच ट्रायअॅझोफॉस 15 मिली, डेल्टामेथ्रीन पाच मिली आणि 10 लिटर पाण्यातून फवारावे किंवा निंबोळी अर्क चार टक्के फवारणी करावी.
3) तुडतुडे : या किडीमुळे पाने पिवळी पडून करपतात. त्यामुळे झाड कमकुवत होते. परिणामी झाड वाळून जाण्याची शक्यता असते. याच्या नियंत्रणासाठी इमिडॅक्लोप्रिड चार मिली. 10 लिटर पाण्यातून फवारावे.
फायद्याचा लेख : वांगी पिकाचे असे करा एकात्मिक कीड नियंत्रण
हे आहेत कारली फळभाजीवरील रोग : कारली फळभाजी पिकावर केवडा, भुरी, कवडी, करपा, मर या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. हवामानातील बदलामुळे येणार्या रोगांवर वेळीच बंदोबस्त केल्यास नियंत्रण येऊ शकते.
1) केवडा (डाऊनी मिल्ड्यू ) : या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानाच्या वरच्या बाजूला फिक्कट हिरवे ते पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात. रोगाचे प्रमाण वाढून देठ, बाळ्या, फांद्यावरही पसरून पाने करपतात व गळून पडतात.
2) भुरी : या रोगामुळे पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूला पिठासारखी पांढरी बुरशी वाढते. त्यामुळे वेलीची वाढ खुंटते. पाने पिवळी पडतात आणि वेली वळतात.
3) कवडी : या रोगामुळे पानावर लहान पिवळसर आणि नंतर तपकिरी रंगाचे ठिपके आढळतात.
4) करपा (पानावरील ठिपके) : या रोगामुळे पानावर तपकिरी ते काळ्या कडा असलेले गोलाकार ते वेडेवाकडे ठिपके पडतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढून असंख्य ठिपके एकमेकात मिसळतात आणि पाने करपतात.
5) मर रोग : या रोगामुळे रोप अवस्थेत जमिनीलगत रोपे कुजतात आणि पिवळी पडून मरतात. रोगाचा प्रादुर्भाव झाडाच्या वाढीच्या कोणत्याही काळात आढळून येतो.
6) विषाणूजन्य रोग : या विषाणूजन्य रोगामुळे नवीन पानावर हिरवट डाग दिसून येतात व पानाचा इतर भाग पिवळसर दिसतो. झाडांची वाढ खुंटते आणि फुले-फळे कमी प्रमाणात लागतात.
महत्त्वाची माहिती : वांग्यावरील रोगाचे सोप्या पद्धतीने करा; असे नियंत्रण
अशी करा उपाययोजना ! : कारली पिकावरील केवडा आणि भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी लागवडीनंतर 30 दिवसांनी कॉपर ऑक्झिक्लोराईड 30 ग्रॅम, पाण्यात मिसळणारे गंधक (सल्फेक्स) 30 ग्रॅम सॅन्डोव्होट (स्टिकर) 10 मिली, 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने फवारावे. कवडी व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅकोझेंब (डायथेन एम-45) किंवा क्लोरोथॅलीनील (कवच) 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डझिम (बाविस्टीन) 10 ग्रॅम या औषधांच्या आलटून-पालटून फवारण्या कराव्यात. मर रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीच्या वेळी अडीच ते तीन किलो ट्रायकोडर्मा पावडर शेणखत आणि निंबोळी पेंडीत मिसळून प्रती एकरी लागवडीच्या ठिकाणी जमिनीत मिसळावे किंवा रोगाची लक्षणे दिसताच कॅप्टन 30 ग्रॅम अथवा ब्लायटॉक्स 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून 100 मिली. द्रावण झाडाच्या मुळाभोवती ओतावे. विषाणूजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी रोगांचा प्रसार करणार्या किडीचे कीटकनाशक वापरून वेळीच नियंत्रण करावे.
(संदर्भ : शेतीमित्र मासिक)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1