कांदा साठवणुकीत मोठ्या प्रमाणात नुकसान होते. विशेषत: कांद्यावरील काही रोग व किडीचा परिणाम त्याच्या साठवणीवर होतो. त्यामुळे नुकसान वाढते. कांदा साठवणीतही काही रोग पडतात. मात्र या साठवणीत पडणार्या रोगांचे व किडीचे वेळीच नियंत्रण केल्यास कांदा उत्पादनात चांगलचा फरक पडतो. कांदा साठवणुकीत प्रामुख्याने मानकूज, काळी बुरशी, निळी बुरशी, विटकरी सड व काजळी हे रोग पडतात.
मानकूज : साठवणुकीत नुकसान करणार्या अनेक रोगांपैकी मानकूज हा एक महत्त्वाचा रोग आहे. या रोगामुळे 50 टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. हा रोग बोट्रायटीस अॅली या नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाची लागण कांदा काढणीला आत असता होते. रोगाची लक्षणे मात्र कांदाचाळीत भरल्यानंतर दिसू लागतात. कांद्याच्या पापुद्य्रामध्ये राखाडी रंगाची बुरशी वाढलेली दिसते.
उपाय : डायथायोकार्बामेटची बिजप्रक्रिया करून रोपे तयार करावीत. पिकाची फेरपालट करावी म्हणजे बुरशीचे जीवनचक्र थांबवता येते. काढणीपूर्वी कांदा पिकावर 0.2 टक्के (20 ग्रॅम 10 लिटर पाणी) कार्बेन्डॅझिमची फवारणी करावी. कांदा काढणीनंतर दोन ते चार दिवस पातीसह शेतात सुकवावा. लांग नाळ कापून प्रतवारी करून कांदा सावलीत 10 ते 15 दिवस ठेवावा आणि मगच चाळीत भरावा. कांदा भरण्यापूर्वी चाळीत 0.2 टक्के कार्बेन्डॅझिमची फवारणी करावी आणि नंतर कांदा चाळीत भरावा.
काळी बुरशी : साठवणीत हा रोग सर्वच ठिकाणी आढळत असला तरी उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात यांचा प्रभाव जाणवतो. हा रोग अॅस्परजिजलस नायजर या बुरशीमुळे होतो. या रोगाची सुरूवात कांदा काढणीनंतर कांद्याच्या वरच्या भागाकडून होते. काळी बुरशी निसर्गत: अनेक सजीव निर्जीववर वस्तुंवर वाढत राहते. दमट व उष्ण हवेत वाढ लवकर होते. चाळीतील तापमान 30 ते 35 डिग्री सेल्सिअस आणि आर्द्रता 70 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर काळी बुरशी लवकर वाढते. महाराष्ट्रात ठेवलेल्या कांद्यावर जुलै ते सप्टेंबर या काळात काळी बुरशी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते.
उपाय : काळी बुरशी अनेक प्रकारात अनेक वस्तुंवर उपलब्ध असते. कांदा किंवा लसणासारखे आवडीचे भक्ष्य आणि योग्य वातावरण मिळाले की, त्याची वाढ होते. तेव्हा कांदा पिकाच्या सर्व अवस्थेत काळजी घेणे आवश्यक असते. मानकूज रोगासाठी करावयाची उपाययोजना यासाठी लागू पडते.
निळी बुरशी : पेनिसिलियम नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. सुरूवातीस कांद्यावर पिवळसर खोलगट डाग पडतात व ते लगेच हिरवट निळसर होतात. पेनिसिलियमची बुरशी जमिनीत राहत नाही. कांद्यासोबत चाळीत जाते व सड वाढते. साठवणीतील इतर रोगांवरील उपाययोजना याही रोगास लागू पडते.
विटकरी सड : या रोगाची सुरूवात कांद्याच्या मानेपासून होते. आतील पापुद्रे गडद विटकरी रंगाचे होतात व सडतात. सड आतील पापुद्य्रापासून सुरू होऊन हळूहळू बाहेरच्या आवरणापर्यंत पसरते. बाहेरून कांदा चांगला दिसतो. परंतु हलकेच दाबल्यास मऊ लागतो व पांढरा चिकट द्रव मानेच्या भागातून निघतो. हा रोग सुडोमोनास आरूजीनोसा या नावाच्या जिवाणूमुळे होतो. जिवाणूचा शिरकाव कांद्यात शेतामधूनच होतो. या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वरीलप्रमाणे उपाययोजना करावी.
हेही वाचा :
कांद्यावरील रोगांचे करा असे नियंत्रण
अशी करा कांदा रोपांची जोपासना !
उत्तमप्रतिच्या कांदा बियाण्यासाठी हे वापरा कांदा बिजोत्पादन तंत्रज्ञान
कांद्याच्या जाती आणि किड रोग व्यवस्थापन
हमखास पैसे मिळवून देणारे कांदा उत्पादन तंत्र
कांद्यावरील विषाणूजन्य रोगांचे करा असे नियंत्रण
काजळी : हा रोग कोटिटोट्रायकम सिरिसीनान्स नावाच्या बुरशीमुळे होतो. रोगाची सुरूवात कांदा काढणीपूर्वी काही दिवस अगोदर होते आणि त्याची तीव्रता साठवणगृहात वाढते. कांद्याच्या वरच्या आवरणावर लहान गर्द हिरवा किंवा काळा ठिपका पडतो. ठिपक्याचा आकार एक इंच व्यासापर्यंत वाढत जातो व बुरशीची रचना कमी होत जाणार्या गोल कड्याच्या स्वरूपात दिसते. कधी-कधी काही बुरशी पापुद्य्राच्या शिरांच्या मार्गाने पसरलेली दिसते. पांढर्या कांद्याच्या जाती या रोगास अधिक बळी पडतात.
उपाय : पांढर्या कांद्याच्या जातीचे साठवणीतील नुकसान टाळण्यासाठी कांदा काढणीपूर्वी बुरशीनाशकांची वरील इतर रोगाप्रमाणे फवारणी करावी. कांदा चांगला सुकवून साठवणगृहात भरावा.
संदर्भ : शेतीमित्र मासिक (कांदा विशेषांक)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा