एक हेक्टर कांदा लागवडीसाठी जवळ-जवळ दहा ते बारा गुंढे जमिन रोपवाटिका करण्यासाठी लागते. रोपवाटिकेची जागा पाण्याच्याजवळ असावी. म्हणजे वेळच्या वेळी पाणी देणे सोपे होते. लव्हाळ किंवा हराळी यासारखे गवत असणारी तसेच पाणी साचणारी सखल भागाची जमिन कांदा रोपवाटीकेसाठी निवडू नये.
खरीप लागवडीसाठी बी मे महिन्यात पेरावे लागते. या काळात अतिउष्णतेमुळे बियांची उगवण व रोपांची वाढ यावर अनिष्ट परिणाम होतो. अशा वेळी रोपवाटीकेची जागा अशा जागेवर निवडावी की जेणेकरून वाफ्यावर दुपारची सावली राहील. शक्यता नसल्यास तात्पुरती सावली करणे चांगले. वाफ्याच्या पश्चिम आणि दक्षिण बाजूने शेवरी किंवा एरंडी लागवड करावी जेणेकरून त्याची सावली मे महिन्यात मिळू शकेल. रब्बी हंगामाची रोपवटिका नेहमी स्वच्छ सुर्यप्रकाश मिळेल अशा जागी करावी. रोपवाटीकेची जमीन उत्तम निचरा होणारी व भुसभुसीत असावी.
रोपे गादी वाफ्यावर तयार करणे चांगले कारण गादी वाफ्यावर रोपांची वाढ एकसारखी होते. मुळांच्या भोवती पाणी फारकाळ साचून राहत नाही. त्यामुळे रोपे कुजणे किंवा सडणे हा प्रकार होत नाही. तसेच लावणीच्या वेळी रोप सहज उपटून काढता येते. रोपाच्या गाढी जाड आणि लवकर तयार होतात.
रोपवाटीकेचे क्षेत्र चांगले खोल नांगरणी करून घ्यावे. कुळवाची पाळ्या देवून भुसभुसीत जमीन करावी. गादी वाफे नेहमी उताराला आडवे करावेत. वाफे तयार करतांना प्रत्येक वाफ्यात दोन घमेले चांगले कुजलेले शेणखत आणि 50 ग्रॅम सुफला घालावा आणि चांगले मिसळून घ्यावे. दगड, विटांचे तुकडे, ठेकळे वेचून घ्यावी. गादीवाफे एक मीटर रूंद आणि तीन ते चार मीटर लांब करावेत. वाफ्यांची उंची 15 सें.मी. असावी. वाफ्याच्या रूंदीला समांतर चार बोटे अंतरावर रेषा पाडाव्यात त्यात दोन सें. मी. खोलीवर बी पातळ घेऊन बारीक शेणखत व माती मिश्रणाने झाकून घ्यावे आणि झारीने पाणी द्यावे. पाणी जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पध्दतीने द्यावे.
बियाची उगवण क्षमता चांगली असेल तर एक हेक्टर लागवडीसाठी आठ ते दहा किलो बी पुरेसे होते. बी उगवतांना किंवा उगवल्यानंतरही त्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे वाफेच्या वाफे बसतात. त्यामुळे लागवडीसाठी रोपे कमी मिळतात. तेव्हा बी पेरणीपूर्वी बियांना प्रति किलो दोन ते तीन ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक औषध चोळावे आणि मग बी पेरावे. बी ओळीने पेरावे त्यामुळे दोन ओळीतील अंतर समान राखता येईल त्यामुळे रोपे एक सारखी वाढतील. तसेच पुर्नलागवडीच्या वेळी रोपे वाफ्यातून सहज उपटन काढाता येतील
बी पेरल्यानंतर शक्यतो पहिले पाणी झारीने द्यावे म्हणजे बी जागचे जागी राहते. वाहून जात नाही, परंतु वाफ्याचे प्रमाण जास्त असल्यास पाटाने पाणी देणे सोयीचे ठरते. परंतु पाणी देतांना प्रवाह कमी ठेवावा. मुळांच्या भोवतालची जमीन भिजेल अशा बेताने पाणी द्यावे.
संपुर्ण रोप उगवून आल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी 25 ते 30 ग्रॅम प्रति वाफ्यात दानेदार थिमेट किंवा फोरेट दोन ओळीमध्ये टाकून मातीने झाकावे. रोपांची वाढ होत असताना दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने दहा लिटर पाण्यात बारा ते पंधरा मिली नुवॉक्रान आणि डायथेन एम – 45, 25 ग्रॅम मिसळून नियमीत फवारणी करावी. त्यामुळे करपा आणि फुलकिड्यांचे नियंत्रण होईल.
बी पेरणीपासून खरीप हंगामात सहा ते आठ आठवड्यांची रोपे लागवडीस योग्य होतात. रब्बी आणि उन्हाळी हंगामात रोप लागवडीस योग्य होण्यासाठी आठ ते नऊ आठवडे लागतात. 20 ते 25 सें. मी. उंच आणि 0.8 ते 0.9 से.मी. जाडीची रोपे लागवडीसाठी योग्य असतात.
रोपांचे स्थलांतर करण्यापूर्वी सात ते आठ दिवस आधिपासून हळूहळू पाणी कमी कमी करावे म्हणजेच दोन पाळ्यातील अंतर वाढवावे. त्यामुग रोपे काटक बनतात आणि पूर्नलागवडीस रोप मरण्याचे प्रमाण अतिशय नगण्य असते. मात्र रोपे उपटण्यापूर्वी 24 तास अगोदर पाणी द्यावे. त्यामुळे रोपे काढणे सोपे होते.
विलास मो. घोपे, संजय उ. आमले, शरद पवार कृषी तंत्र विद्यालय, जळगाव(जा), जि. बुलडाणा.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा