डाळवर्गीय पिकांमध्ये हरभरा पिकाला फार महत्त्व आहे. रब्बी-उन्हाळी हंगामात सर्वांत कमी पाण्याचे, सर्वांत कमी खर्च, जमिनीची सुपिकता टिकविणाऱ्या हरभरा पिकाची लागवड करण्याची शेतकऱ्यांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात जागरूकता झाली आहे. या पिकाच्या शास्त्रोक्त लागवडीसाठी काही मुद्दे प्रामुख्याने अंमलात आणल्यास शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन घेणे शक्य होईल.
महत्त्वाच्या टिप्स : हरभरा लागवड केलीय ? मग; असे करा व्यवस्थापन
रब्बी-उन्हाळी हंगामात सर्वांत कमी पाण्याचे, सर्वांत कमी खर्च, जमिनीची सुपिकता टिकविणाऱ्या हरभरा पिकाची लागवड करण्याची शेतकऱ्यांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात जागरूकता झाली आहे. या पिकाचे महत्त्व शेतकऱ्यांना पटू लागल्याने आणि चांगला बाजारभाव मिळत असल्याने शास्त्रोक्त लागवडीसाठी खालील मुद्दे प्रामुख्याने अंमलात आणल्यास शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन घेणे शक्य होईल. डाळवर्गीय पिकांमध्ये हरभरा पिकाला फार महत्त्व असल्याने तसेच अंग ओलितावर व हिवाळी हंगामातील दवावर हे पीक चांगले येत असल्याने या पिकाला क्वचितच सिंचनाची व्यवस्था करावी लागते.
जमीन व हवामान : हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, भुसभुशीत जमीन निवडावी. पहिल्या पिकाच्या कापणीनंतर जमीन नांगरून ती भुसभुशीत करावी. फार हलक्या जमिनीत हरभरा पिकाची पाणी व्यवस्थापनामध्ये काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पाणथळ तसेच क्षारवट जमिनीमध्ये या पिकाची लागवड फायदेशीर ठरत नाही.
हरभरा पिकाला प्रामुख्याने कोरडे व थंड हवामान मानवते. 10 ते 15 सेल्सिअस कमाल तापमान व 25 ते 30 सेल्सिअस किमान तापमान असताना किंवा घाटे भरण्याच्या अवस्थेत धुके पडल्यास पिकावर विपरीत परिणाम होऊ शकतो. पर्यायाने उत्पादनात घट होऊ शकते. तापमान कमी असल्यास घाटे भरण्यास पोषक वातावरण निर्माण होते.
बियाण्याची निवड : लागवडीसाठी उत्तम व दर्जेदार बियाणे वापरावे. बियाण्याचे प्रमाण हे बियाण्याच्या आकारावर अवलंबून असून मोठ्या दाण्याचे बियाणे जास्त लागते तर लहान दाण्याचे बियाणे कमी लागते. साधारणत: लहान दाण्यासाठी 50 ते 55 किलो न मोठ्या दाण्यांसाठी 65 ते 70 किलो हेक्टरी बियाणे वापरावे. बियाणे पेरण्यापूर्वी बियाण्यांस 10 किलोस 50 ग्रॅम ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे बुरशीजन्य रोगांना आळा बसून मर रोगावरती मात करणे शक्य होते. यासाठी 250 ग्रॅम (पाव किलो) चे एक पाकिट 10 किलो बियाण्यांस पुरेसे होते. बाजारपेठेनुसार एका पाकिटास साधारणत: 15 ते 20 रूपये खर्च येतो. ही प्रक्रिया करण्यापूर्वी गुळाचे द्रावण तयार करून (10 ग्रॅम प्रती किलो बियाणे) त्यामध्ये लागवड क्षेत्रानुसार बियाणे घेवून गुळाच्या द्रावणात रायझोबियम जिवाणू संवर्धकाची पावडर टाकून हळूवार बियाणे त्या मिश्रणात बुडवून हलवा हलव करून त्याचा थर बियाण्यांवर येईल अशा पद्धतीने प्रक्रिया करावी. रायझोबियम जिवाणू संवर्धकामुळे हरभरा पिकाच्या मुळांवरील असलेल्या गाठींमधील रायझोबियम नावाच्या जीवाणूंना चेतना मिळून त्यांचे हवेतील नत्र स्थिरीकरण करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. पर्यायाने पिकांना पुरेसा नत्र मिळून नत्राची गरज पूर्ण होते. त्यामुळे पिकाची चांगली वाढ होते व जमिनीतील नत्राचे प्रमाण सुद्धा वाढते.
लागवडीसाठी दोन अळींमध्ये 30 सें. मी. व दोन झाडांमध्ये 10 सें. मी. अंतर ठेवल्यास हेक्टरी 3.33 लाख रोपे बसू शकतात. त्यामुळे झाडांची योग्य संख्या राखल्याने उत्पादन चांगल्या प्रकारे मिळू शकते. काही भागांत सरी वरंबा पद्धतीने सुद्धा हरभर्याची लागवड करतात. भारी जमिनीत 90 सें. मी. रूंदीच्या सर्या पाडून वरंब्याच्या दोन्ही बाजूला 10 सें. मी. अंतरावरती एक ते दोन दाणे टाकून पेरणी करावी. साधारणत: 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर हा लागवडीसाठी योग्य कालावधी मानला जातो. लागवड उशीरा झाल्यास फांद्या, फुले व घाटे यांच्या अवस्थेवर तापमानामुळे विपरीत परिणाम होऊ शकतो. पर्यायाने फुलांचे प्रमाण कमी होऊन घाटे कमी होतात व उत्पादनात घट होते.
लागवडीयोग्य जाती : विश्वास ही जात 115 ते 125 दिवसात येणारी असून याचे हेक्टरी उत्पादन 20 ते 22 क्विंटल आहे. विजय ही जात 100 ते 105 दिवसात येणारी असून याचे हेक्टरी उत्पादन 12 ते 14 क्विंटल आहे.
विकास ही जात 100 ते 105 दिवसात येणारी असून याचे हेक्टरी उत्पादन 12 ते 15 क्विंटल आहे. तर विशाल ही जात 110 ते 115 दिवसात येणारी असून याचे हेक्टरी उत्पादन 22 ते 25 क्विंटल आहे.
खात व्यवस्थापन : चांगले कुजलेले शेण किंवा गांडूळखत 625 ते 650 किलो प्रती हेक्टरी शक्य असल्यास वापरावे. त्यामुळे जमिनीची जलधारण क्षमता सुधारून पिकाच्या उत्पन्नावर चांगला परिणाम होतो व जमिनीची जडणघडण चांगली होते. याबरोबर 25 किलो नत्र+50 किलो स्फुरद (54.35 किलो युरीया आणि 312 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रामुख्याने युरिया व सिंगल सुपर फॉस्फेट या माध्यमातून हेक्टरी देण्यात यावे. जर शेतकर्याजवळ डी. ए.पी. (डायअमोनियम फॉस्फेट) उपलब्ध असल्यास हेक्टरी 125 किलो पेरणीच्या वेळी बियाण्यांबरोबर दिल्यास चांगल्या प्रकारे खत पिकाला उपलब्ध होऊन उत्पन्न वाढू शकते.
हरभरा पिकाच्या घाटे भरण्याच्या अवस्थेत 200 ग्रॅम युरीया 10 लिटर पाण्यामध्ये मिश्रण करून (दोन टक्के द्रावणाची) फवारणी करावी. जर अन्नद्रव्याची कमतरता असल्यास फेरस सल्फेट, मॅग्नेशिअम सल्फेट, झिंक सल्फेट यापैकी आवश्यकतेनुसार 25 किलो प्रती हेक्टर याप्रमाणे खतांबरोबर मात्रा द्यावी. जर जमिनीमध्ये स्फुरदाची कमतरता आढळल्यास 0:52:34 या विद्राव्य खताची 1.5 किलो प्रती 200 लिटर पाण्यात मिश्रण करून फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापन : हरभरा पिक पाण्यास अतिशय संवेदनशील पीक आहे. या पिकाला साधारणपणे 25 सें.मी. पाणी लागते. पेरणी केल्यानंतर एक हलके पाणी दिल्यास उगवण चांगली होते. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. 45 ते 50 दिवसांनी दुसरे पाणी 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी आवश्यकतेनुसार व जमिनीच्या ओलाव्यानुसार देण्यात यावे. प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील माती मानद स्वरूपाची असल्याने जमिनीस लगेच भेगा पडतात. त्यामुळे वेळोवेळी लागवड क्षेत्राची पाहणी करून कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अथवा संबंधित तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विद्यापीठ संशोधन केंद्रे यांच्या सल्ल्यानुसार पाणी नियोजन करावे. अति पाण्यामुळे हरभरा पीक उमळून नुकसान होते. काहीवेळा पाणी साचून राहिल्यास मुळ कुजव्या रोगामुळे पिकाचे नुकसान होवू शकते. त्यामुळे जमिनीच्या मगदुरानुसार व गरजेनुसार पिकास पाण्याचे नियोजन करावे.
फायद्याची गोष्ट : असे करा हरभर्यावरील घाटेअळीचे नियंत्रण
आंतरमशागत : लागवडीनंतर 20 दिवसांनी पिकाच्या जोमदार वाढीसाठी कोळपणी आवश्यक आहे. त्यासाठी एक कोळपणी व खुरपणी योग्य वेळी करावी. कोळपणी शक्यतो जमिनीला वाफसा असल्यावरच करावी. कोळपणीमुळे तणांचा बंदोबस्त होऊन जमिनीत हवा चांगली खेळती राहते व पिकास पोषक वातावरण मिळाल्यामुळे पीक जोमदार वाढण्यास मदत होते.
पीक संरक्षण : हरभरा पिकावर घाटे अळी व मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी लक्षणे ओळखून किड व रोग नियंत्रणासाठी शिफारशीनुसार योग्य त्या उपाययोजना वेळीच करण्यात याव्यात.
घाटे अळी : ही अळी हिरव्या रंगाची असून ती पाने, फुले यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान करते. या अळीमुळे जवळपास 25 ते 30 टक्के पिकाचे नुकसान होऊ शकते. याच्या नियंत्रणासाठी शिफारशीनुसार हेक्टरी पाच फेरोमेन सापळे ठराविक अंतरावर लावण्यात यावेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाच मिली निंबोळी अर्काची/तेलाची फवारणी करावी. किंवा एन. पी. व्ही. या विषाणूंचा 1000 मिली प्रती हेक्टर वापर करावा. शक्य असल्यास बी. टी. या जीवाणूंचे एक ग्रॅम प्रती लिटर या प्रमाणात मिश्रण करून फवारणी करावी. घाटे अळीचे प्रमाण जास्त असल्यास क्विनॉलफॉस 30 मिली प्रती 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मर रोग : हरभऱ्याला जमिनीतील बुरशीमुळे मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. फ्युजॅरिअम ही बुरशी लहान रोपांच्या मुळांद्वारे पिकांत प्रवेश करते त्यामुळे पिकांची वाढ खुंटते, मुळे कमकुवत होतात, पर्यायाने रोपे वाळून मरून पडतात. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी 10 ग्रॅम प्रती किलो बियाण्यास ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी.
काढणी आणि उत्पादन : घाटे वाळू लागताच पीक काढण्यास हरकत नाही. पीक कापणीनंतर दोन ते तीन दिवस चांगले उन्हात वाळवून मळणी करावी. साधारणत: जातीपरत्वे 100 ते 120 दिवसांत पीक चांगले तयार होते. मळणी केल्यानंतर चार ते पाच उन्हे देवून साठवणुकीपूर्वी कडूलिंबाचा पाला टाकून योग्य त्या साठवण कक्षात साठवणूक करावी. याप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केल्यास हरभरा पिकापासून हेक्टरी 25 ते 30 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.
डॉ. मनोज तलाठी, डॉ. राजेश मांजरेकर, कृषी विज्ञान केंद्र, किल्ला-रोहा, ता. रोहा, जि. रायगड.