शेळीला गरीबाची गाय असे संबोधले जाते. भारतात शेळ्यांच्या एकूण 23 मान्यताप्राप्त जाती आहेत. सध्याच्या परिस्थितीत शेळ्यांचे दूध व मांस उत्पादन समाधानकारक पातळीवर नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, शेळीच्या चार्यासाठी लागणार्या जमिनीची तुटपुंजी उपलब्धता आणि पौष्टिक चारा उत्पादनासाठी सिंचन सुविधांची उणीव दोन्ही प्रमुख कारणांमुळे व्यावसायिक शेळीपालन करताना शेळ्यांच्या आहाराकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे असते.
शेळ्यांचा ओठांची ठेवण विचारात घेतल्यास वरील ओठ लवचीक, सैलसर असतात. त्यामुळे जिभेच्या सहाय्याने शेळ्या जमिनीलगतचे गवत सहज खाऊ शकतात. विशेषत: इतर जनावरांना खाता न येणारी आणि नाकारलेल्या वनस्पतीची पानेही शेळ्या खातात. शेळ्या इतर प्रजातीपेक्षा झाडपाल्यामुळे होणार्या विषबाधेला कमी संवेदनाक्षम आहेत. विशेष म्हणजे, शेळ्या खराब झालेले कोणत्याही प्रकारचे अन्न खात नाही. शेळ्यांमध्ये पायाभूत चयापचयाचा दर इतर प्रजातीपेक्षा जास्त आहे; म्हणून त्यांना मेंढ्या आणि गायींपेक्षा उच्च पातळीचे पोषण आहार आवश्यक आहे. शेळ्यांमध्ये पोषक तत्वांची दूध उत्पादनासाठी रूपांतर करण्याची कार्यक्षमता 45 ते 71 टक्क्यांपर्यंत आहे.
शिशुआहार : जन्म झाल्यावर 3 दिवसापर्यंत पिल्लांना शेळीच्या दूधाचा चीक द्यावा. तीन दिवसानंतर दुधाचे प्रमाण कमी करून दिवसाला 100 मिली इतके करावे. मातेच्या दुधा व्यतिरीक्त, कोवळे हिरवे गवत, लसून गवत, बर्सिम, चवळीसारख्या काही शेंगा वर्गीय चारा द्यावा. 7 दिवसातून 4 ते 5 वेळा खाद्य द्यावे आणि वयाच्या 40 ते 60 दिवस दरम्यान 3 वेळा खाद्य द्यावे. या काळातील आहारात 17 ते 18 % टक्के पाचक प्रथिने व 65 ते 70 % पचनिय पोषक घटक असावेत. वयाच्या 60 दिवसांनंतर पिल्ल्याचे वजन जन्मत: असलेल्या वजनाच्या तीन ते चार पट जास्त म्हणजे 7 ते 10 किलो असावे व त्यावेळी पिल्ल्याचे दूध तोडावे.
पोषण आहार : शेळीच्या पिल्लाचे दूध तोडल्यावर नऊ ते दहा % पाचक प्रथिने आणि 60 ते 65 % पचनिय पोषक घटक असलेले उत्पादक खाद्यान्न चालू करावे. उत्पादक कालावधी एक वर्ष असतो. या कालावधीत शेळीचे वजन सुमारे प्रौढ वजनाच्या एक ते तीन % संपादन करावे. शेळी एक वर्षाची पूर्ण झाल्यावर अपेक्षित शरिराचं वजन 18 ते 20 किलो असावे.
प्रौढ शेळीचा आहार (फिनिशर रेशन) : साधारणपणे शेळी 20 ते 30 किलो सरासरी वजनाची झाल्यावर ती विकली जाते. या कालावधीत शारिरीक वाढ दर फार कमी असतो आणि निर्वाहा आहार पोषक तत्वांची आवश्यकता पूर्ण करते. फिनिशर खाद्यात पाचक प्रथिने 5 ते 6 % आणि पचनिय पोषक घटक 60 ते 65 % आसावेत. चरबीयुक्त मांस उत्पादनाकरीता जोपासलेल्या जनावराचे आहारात एकूण कोरड्या चार्याच्या 30 ते 40 % भरडा चारा असावा. याउलट चरबी नसलेल्या मांस उत्पादनाकरीता एकूण कोरड्या चार्याच्या 20 ते 25 % भरडा चारा असावा. चरबीयुक्त मांस उत्पादनाकरीता, उच्च ऊर्जा असलेले धान्यांचा पोषकद्रव्ये मिश्रणात समावेश करावा.
गाभण शेळ्यांचा आहार : गर्भाच्या एकूण विकासाच्या 70 ते 80 % वाढ गर्भावस्थेच्या शेवटच्या 50 दिवसात होत असल्यामुळे या काळात तिच्या आहाराची काळजी घेणे फार गरजेच आहे. प्रथिने, कॅल्शियम आणि स्फुरदाची गरज या कालावधीत वाढलेली असते. त्यामुळे दररोज 150 ग्रॅम देखभाल रेशनाच्या व्यतिरीक्त 25 टक्के पाचक प्रथिने व 55 ते 60 % पचनिय पोषक घटक असलेला 300 ते 500 ग्रॅम आहार गभण शेळीला द्यावा पण गभण परंतु दूध देणार्या शेळ्या करीता 300 ते 400 ग्रॅम खुराक मिश्रण/किलो दूध उत्पादनासाठी द्यावे. खनिज चाटन उपलब्ध करून देण्यात यावे.
दुधाळ शेळ्यांचा आहार : प्रौढ स्तनपान करणार्या मादी शेळीसाठी दररोज 150 ग्रॅम निर्वाह रेशनाच्या व्यतिरिक्त खुराक मिश्रण 400 ग्रॅम 1 लिटर दूध उत्पादना मागे दिले जाणे आवश्यक आहे. स्तनपान करणार्या शेळ्यांच्या खुराक मिश्रणात 9 ते 12 % पाचक प्रथिने आणि 60 ते 65 % पचनिय पोषक घटक असायला हवे, तसेच मानक दर्जाचे खनिज मिश्रण असलेला आहार अपरिहार्यपणे पुरवावा.
भाकड शेळ्यांचा आहार : पुरेशी कुरणे सुविधा उपलब्ध असल्यास, भाकड शेळ्या पुरेशा तास चरल्यास निर्वाह रेशनाची पुर्तता होते. तथापि, कुरणे सुविधा उपलब्ध नसल्यास 200 ग्रॅम खुराक मिश्रण 5 ते 6 % पाचक प्रथिने आणि 55 ते 60 पचनिय पोषक घटकासह मिश्रण द्यावे.
प्रजननासाठी उपयोगात येणार्या शेळी व बोकडांचा आहार : बहुतेक नर आणि मादी पिल्लाची निवड प्रजननाच्या उद्देशसाठी केली जाते त्यांना पुनर्स्थित साठा/कळप म्हटले जाते. वयाच्या एक वर्षात लैगिंक परिपक्वता आणि शरीराचं इच्छीत वजन गाठण्याकरीता पुनर्स्थित साठाचे योग्य आहार देणे गरजेचे आहे. लहान जातीच्या एक वर्षापर्यंतच्या शेळीचे शाररीक वजन 15 ते 18 किलो असावे. तसेच मोठ्या जातीच्या शेळ्यांचे वजन 20 ते 25 किलो असावे. दर्जेदार पुरेसे कुरणे उपलब्ध असतात तेव्हा अतिरीक्त खुराक देणे आवश्यक नाही. परंतु सडपातळ शेळीस 250 ते 500 ग्रॅम खुराक मिश्रण 10 ते 12 % पाचक प्रथिने आणि 68 ते 70 % पचनिय पोषक घटक पुरवणे गरजेचे आहे. खुराक मिश्रणात अपरिहार्यपणे खनिज मिश्रण द्यावे किंवा खनिज चाटन गोठ्या मध्ये असावी.
बोकड म्हणजे प्रजोत्पादनाच्या उद्देशाने जोपासलेल्या नर त्यांला एकूण वजनाच्या 3 ते 3.5 टक्के खुराक मिश्रण आवश्यक आहे. सरासरी प्रजनना करीता नरांना 500 ग्राम ते एक किलो खुराक आणि एक ते दोन वर्षादरम्यान वयाच्या करडांना 250 ग्रॅम खुराक आवश्यक आहे.
– डॉ. शैलेद्र कुरळकर स्नातकोत्तर पशुवैद्यकिय व पशुविज्ञान संस्था, अकोला. ( महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.)