‘रयत सुखी तर राजा सुखी, शेतकरी सुखी’ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते. हेच खर्या अर्थाने त्यांच्या राज्यकारभाराचे धोरण होते. हे स्वराज्य शेतकऱ्यांचे आहे, शेती करणे हे रयतेचे मुख्य बलस्थान आहे, संपूर्ण प्रजेचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे, शेती हे केवळ जीवनावश्यक साधन नसून, रयतेच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे. याची महाराजांना जाणीव होती. महाराजांचे शेती, माती आणि माणसांविषयीचे विचार आज्ञापत्र, बखरीमधून दर्शन होते. स्वराज्याच्या हिताचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते. आज या महापुरूषाची जयंती अवघा मराठी मुलुखात उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या कृषी धोरणाचे घेतलेले दर्शन.
शेतात राबणारा स्वराज्याचा आधार
शिवकालात प्रत्यक्ष शेतात राबणारा रयत हाच खरा स्वराज्याचा आधार होता. त्याचे उत्पन्न हेच स्वराज्याचे उत्पन्न होते तसेच शेतकऱ्यांच्या युवा पिढीतून स्वराज्याला सैन्य मिळत असे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात शेतकरी हिताचा विचार करून शेतकऱ्यांच्या उन्नतीच्या योजना राबविल्या. शेतकऱ्यांना अनेक सवलतीही दिल्या. ते त्यांच्या काही अज्ञापत्रातून आपल्याला समजते.
1. ‘रयत सुखी तर राजा सुखी, शेतकरी सुखी’ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते

2. ज्याच्याकडे शेत कसण्याची कूवत आहे, मनुष्यबळ आहे पण मशागतीस बैलजोड़ी नाही, बी – बियाणे नाहीत त्याला दोनचार बैल देण्यास रोख रक्कम द्यावी किंवा सरकारातून बैल आणि बी – बियाणे द्यावेत.
3. शेतकऱ्यांस सरकारातून दिलेले कर्ज वाढीव पद्धतीने वसूल न करता त्याच्या शेतीचे उत्पन्न तयार झाल्यावर त्याच्या कुवतीनुसार हप्त्याने वसुल करावे.
4. गावचा गाव फिरून तेथील शेतकरी जेवढे आहेत ते गोळा करावे, कोणाकडे मनुष्यबळ आहे, बैल आहेत यांची कोणाकडे कशी व्यवस्था आहे याची विचारपूस करावी.
5. शेतकरी अडून निकामी झाला असेल तञयाला दोन चार बैलांकरिता रोड हाती द्यावी. पोटाकरिता दोनचार खंडी धान्य द्यावे. त्याच्याने शेत करवेल ते करवून घ्यावे, नंतर बैलाचे व धान्याची रोकड वाढीदिडी न करता फक्त मुद्दलच हळूहळू त्याच्या ऐपतीप्रमाणं वसून करावी.

6. नवीन शेतकऱ्यांस सोईसवलती देऊन पडिक जमीन लागवडीखाली आणावी, त्यासाठी सरकारने रक्कम मंजूर करावी.
7. ज्या शेतकऱ्यांवर सरकारची मागील बाकी येणे आहे पण त्याच्याजवळ काहीच नाही अशा शेतकर्यास जर तो शेती करण्याची अजूनही उमेद धरत असेल तर त्यास सर्व प्रकारची मदत करावी. त्याच्यावरील कर्ज माफ़ करण्यासारखे असेल तर तसे कळवावे.
8. दिव्यातील ज्योत विझल्याशिवाय झोपी जावू नकोस, अन्यथा उंदिर दिव्यातील पेटती ज्योत पळवतील. कडब्याच्या गंजी पेट घेतील. गुरा-ढोरांना चारा मिळणार नाही. गुरे-ढोरे दूध देणार नाहीत. माझ्या रयतेची बालके दुधापासून वंचित राहतील.
9. शेतकऱ्यांना लुटू नये, शेतकऱ्यांची चोरी करू नये, शेतकऱ्यांची इमानेइतबारे सेवा करावी. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठासदेखील मन दाखवू नये. शेतकऱ्यांच्या काडीसदेखील हात लावू नये. जर तुम्ही तसे कराल, तर मी तुमच्यावर राजी नाही असे समजावे.
10. जनावरांचा चारा काटकसरीने वापरा. चाऱ्याची उधळपट्टी कराल तर पावसाळ्यात जनावरांना उपास पडेल, घोडी मरायला लागतील. मग तुम्ही कुणब्याकडून धान्य, भाकरी, गवत, फांद्या, भाजीपाला आणाल. मग शेतकरी उपाशी मरेल, ते निघून जातील. मग ते म्हणतील, की तुम्ही तर मोगलापेक्षा अधिक जुलमी आहात.

11. शेतकऱ्यांचा तळतळाट लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांस काडीचादेखील त्रास देऊ नका. तुम्हाला गवत, धान्य, भाजीपाला, लाकूड हवे असेल, तर बाजारातून योग्य मोबदला देऊन विकत आणावा. कोणाकडून जुलूम अथवा अत्याचार अथवा भांडण करून घेऊ नका.
12. जिन्नसच वसूल घेऊन जमा करीत जाणे आणि मग वेळच्या वेळी विकत जाणे. महाग विकेल आणि फायदा होईल ते करीत जाणे. वसूल हंगामशीर घ्यावा आणि साठवण करून विक्री अशी करावी, की कोणत्या वेळेस कोणता जिन्नस विकायचा, माल तर पडून राहता कामा नये आणि विक्री महाग झाली पाहिजे. दहा बाजार केले तरी चालतील, पण मालाला भाव मिळाला पाहिजे. त्याचा फायदा होईल.
13. आरमारासाठी झाड हवे असेल तर आंबा-साग तोडू नका. कारण ती एका सालात पैदा होत नाहीत. शेतकऱ्यांनी त्यांना अनेक वर्षांपासून लेकराबाळांप्रमाणे वाढविलेले असते. ती झाडे तोडली तर शेतकऱ्यांच्या दुःखास पारावार राहणार नाही. ती तोडणे म्हणजे प्रजापीडन आहे. झाड हवे असेल तर जीर्ण झालेले झाड त्याच्या मालकाच्या परवानगीने त्याचा योग्य मोबदला देऊन त्याला आनंदी करून तोडून न्यावे. अत्याचार सर्वथा न करावा.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत स्वराज्यातील जमिनीची तीन वेळा मोजणी करण्यात आली. प्रथम सन १६३९ मध्ये दादोजी कोंडदेवाच्या वेळी नतंर १६४९ मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी आणि शेवटी शिवराज्याभिषेकानंतर सचिव अण्णाजी दत्तो यांनी १६७८ मध्ये स्वराज्यातील सर्व जमिनीची मोजणी करून जमिनीची प्रत ठरवून जमीन महसूल प्रत्येक गावचे जमिनीचे महसूल पत्रक तयार करून घेतले. बिघा, पाचर आदी शब्द शिवचरित्रामधील आजही वापरले जात आहेत. तसेच कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे त्याचे पत्रकही तयार केले, यालाच ‘पीक पाहणी’ असे म्हणतो. शिवकालापासून हा शब्द प्रचलित आहे. ब्रिटिश शासनाने या पध्दतीची नक्कल केलेली आहे.
हेही वाचा
जागतीक स्थरावर का चर्चेत आहे, भारतीय गीर गाय ?
खिल्लार या गोवंशाला का म्हणतात पांढरे सोने ?
शाश्वत शेतीसाठी गोमाता एक वरदान
मराठवाडा भूषण म्हणणारी ‘देवणी’ गाय आहे तरी कशी ?
शिवरायांनी नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले. प्रशासनाला वेळोवेळी शेतकरीहितासाठी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शेतीमालाला योग्य भाव मिळेल, याकडे लक्ष दिले. शेती आणि अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था येण्यासाठी शिवरायांच्या शेतकरीभिमुख धोरणाची आजही गरज आहे.
(या लेखातील संदर्भ हे आज्ञापत्र-अनंतर सभासद यातील व विकास पांढरे आणि श्रीमंत कोकाटे यांच्या लेखातून घेण्यात आले आहेत.)

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आमचे इंस्टाग्राम पेजला फॉलोव्ह करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.instagram.com/shetimitra03/
शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा