ग्रामिण कृषी अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेळीपालन व्यवसाय अनेक कारणांमुळे समाधानकारक नाही. शेळीच्या वाढीसाठी लागणार्या मुलभूत गरजांच्या अभ्यासाचा अभाव हे त्यापैकी प्रमुख कारण आहे. शेळीच्या आहारात पोषक तत्त्वांची प्रामुख्याने गरज असते. शेळीला आहारातून मिळणार्या पोषक तत्त्वावरच शेळची जात, शरीराचे वजन, वय, लिंग, स्तनपानाचा काळ, गर्भधारणा, प्रजनन, वातावरणातील तापमान व बाजार निवड इत्यादी गोष्टीचा प्रभाव पडत असतो.
शेळीच्या आहारातील पोषक तत्त्वांचा विचार करता शेळीला मिळणार्या हिरव्या चार्याबरोबरच गरजेचे असलेले कोरडे खाद्य, आहारातून मिळणारी उर्जा, प्रथिने, खनिजे, जिवनसत्त्वे आणि पाणी याचा विचार होणे गरजेचे असते.
1) कोरडे खाद्य : मांस उत्पादनाच्या शेळीच्या जातींसाठी त्यांच्या जिवंत वजनाच्या 3 ते 4 % कोरड्या खाद्याशांची गरज असते. दुभत्या शेळ्यांना त्यांच्या जिवंत वजनाच्या 5 ते 7 % कोरड्या खाद्यांची गरज आहे. चार्यातील तंतुमय पदार्थ, रूचकरता, ओलावा आणि चार्याची उपलब्धता हे कोरड्या खाद्यांशाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक आहेत.
2) उर्जा : ऊर्जा शेळीच्या आहारांमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावते. ज्याचा प्रभाव एकंदर उत्पादन आणि इतर पोषक तत्त्वांचा उपयोगावर पडतो. शेळीला देखरेखीसाठी दररोज सरासरी 101 किलोकॅलरी, गर्भधारणासाठी दररोज 180 किलोकॅलरी तर दूध उत्पादनासाठी दररोज 1220 किलोकॅलरी उर्जेची गरज असल्याचे आढळले आहे. या व्यतिरीक्त उर्जेची गरज वाढीव क्रियाकलाप, भूप्रदेशाचा प्रकार, चरण्या करीता केलेला प्रवास, आणि कुरण वनस्पतीची घनते प्रमाणे आवश्यक आहे. किमान क्रियाकलाप असलेल्या बंदिस्त शेळ्यासाठी त्यांच्या आहारांमध्ये मूलभूत निर्वाहाच्या गरजे पुरत्या उर्जेची आवश्यकता असते. तथापि साधारण क्रियाकलापा करीता 25 % अधिक ऊर्जो आवश्यक असते. डोंगराळ भागात चरणार्या शेळ्यांना मूलभूत निर्वाहाच्या गरजेपेक्षा 50 % जास्त उर्जेची आवश्यकता असते. शेळीच्या वाढीसाठी दररोज सरासरी 7.25 किलोकॅलरी उर्जेची गरज असल्याचे आढळले आहे.
आहारामधून ऊर्जेचे प्रमाण अपुरे पडल्यास शेळीची वाढ मंदावते. शेळी लवकर माजावर येत नाही. प्रजनन दर कमी होते आणि दूध उत्पादन देखील कमी होते. शेळ्यांना दीर्घकाळापर्यंत कमी ऊर्जेचा आहार दिल्यास, संक्रमण आणि परजीवी रोगामुळे प्रतिकार शक्ती कमी होऊ शकते. याउलट जास्त ऊर्जा आहारात असेल तर चरबीची वाढ होऊन शेळीच्या त्वचेची गुणवत्ता कमी होते.
3) प्रथिने : विविध शारीरिक कार्ये जसे वाढ, गर्भधारणा, स्तनपान आणि मूलत निर्वाह इत्यादी पार पाडण्यासाठी शेळीला प्रथिनांची अत्यंत गरज असते. मूलत निर्वाहासाठी आहारात प्रथिनाची दैनंदिन गरज सरासरी 20 ते 30 ग्रॅम तर दूध उत्पादनासाठी 60 ते 70 ग्रॅम असावी लागते. दररोज किमान 6 % एकूण प्रथिने शेळीने सेवन करणे आवश्यक आहे. अन्यथा वीर्याची क्रिया कमी होऊ शकते आणि चार्याच्या कार्यक्षमतेवर फरक पडू शकतो.
शेळ्यांच्या आहारात प्रथिनांचा भाग अल्काने (यूरियाने) अदलाबदल करू शकता, परंतु स्तनपान करणार्या शेळ्यांमध्ये युरियामुळे विषबाधा होवू शकते. सुक्या आहारामध्ये प्रथिने एक ते तीन युरियाने बदलू शकतो तसेच खुराकामध्ये एक ते दोन युरियाने बदलू शकतो. शेळ्यांच्या पचनसंस्थेला मुलूख कार्यक्षमतेने युरियाचा उपयोग करण्यासाठी व परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी एक अंदाजे तीन आठवडे कालावधी आवश्यक आहे. जेव्हा आहारात प्रथिनांचा भाग युरियाने बदलला जातो, तेव्हा आहारात 10:1 या प्रमाणात सल्फर समाविष्ट करण्याची काळजी घ्यावी.
आहारातील प्रथिनांच्या कमतरतेमुळे शेळ्यामध्ये भूक मंदावणे, वजन कमी होणे, दूध उत्पन्न कमी होणे, केसाची वाढ खुंटणे, अशक्तपणा आणि सूज येणे असे परिणाम दिसतात.
4) खनिजे : शेळ्याकरीता वापरल्या जणार्या खाद्यात सामान्य महत्त्वाच्या खनिजांचा पुरेशा प्रमाणात पुरवठा केला गेल्यामुळे शेळ्यांमध्ये खनिजाची क्वचितच गरज उद्भवते. मात्र शेळ्यांकरीता खाद्य तयार करताना कॅल्शियम, फॉस्फोरस, सोडियम, क्लोराईड आणि सल्फरसारखी काही प्रमुख खनिजे मिळतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सोडियम क्लोराईडचा 0.5 % दराने पोषकखाद्य मिश्रणात समावेश करावा. दूध उत्पादनासाठी 1.3 ग्रॅम, निर्वाहासाठी दररोज 4.7 ग्रॅम कॅल्शियमची गरज आहे. स्फुरदची गरज एका प्रौढ शेळीसाठी दिवसाला 3.3 ग्रॅम असते. खनिज/क्षार विटा सदैव चाटण्यासाठी शेळ्याच्या ठेवल्यास कोणत्याही खनिजाची कमतरता टाळण्यासाठी मदत होते.
5) जीवनसत्त्वे : शेळ्यांना साधारणपणे 5 ते 6 तास चरण्याकरीता सोडल्यास जीवनसत्त्व ‘अ’ आणि जीवनसत्त्व ‘डी’ ची आवश्यकता पूर्ण होते. त्यामुळे जीवनसत्त्व ‘अ’ व ‘डी’ची कमतरता क्वचित आढळते. तथापि बंदिस्तपद्धतीत शेळ्यांच्या आहारात या दोन जीवनसत्त्वे अपरिहार्यपणे पुरवठा करावा. चरणार्या शेळ्या करीता जीवनसत्त्व ‘ई’ आणि ‘के’ आवश्यक असते. जीवनसत्त्व ‘ब’ चे अनेक घटक असतात. ते शेळीच्या आहारातील अत्यावश्यक घटक नाही; कारण त्याचे उत्पादन शेळ्याच्या कोठी पोटात सुक्ष्मजीवाद्वारे होत असते. आणि जेव्हा आहारात अचानक बदल होतो तेव्हा आहारात आवश्यक समावेश शेळ्यांमध्ये जीवनसत्त्व ‘सी’ पुरेशा प्रमाणात शारिरीक उतीमध्ये तयार होते.
6) पाणी : शेळ्यांना पूर्ण वेळ स्वच्छ पाण्याचा पुरवठा असावा. सरासरी एका प्रौढ शेळीला दररोज 400 ते 700 मिली पाणी लागते. पर्यावरणाचे तापमान, स्तनपानाचा स्तर, शरीरातील चरबी, वय, शरिरातील पाण्याचे प्रमाण, व्यायाम, मीठ आणि खनिज सामग्री इत्यादीचा एकूण पाणी सेवनावर प्रभाव पडतो. शेळ्यांमध्ये मूत्र आणि विष्टेद्वारे पाण्याचे नुकसान कमी करून पाणी वाचवण्याची क्षमता आहे. त्या संवेदनशील असल्यामुळे इतर प्रजातीसारखे बेचव, थोडाही वास असलेले पाणी, घान स्त्रोेतातील पाणी शेळ्या पित नाहीत. म्हणून पाण्याची चव देखील पाणी सेवनावर प्रभावित करते. कमी पाणी मिळाल्यास आधी खाणे कमी होते. आरोग्यावर परिणाम होतो आणि ती स्वत:ला उपासमार घडवतो.
– डॉ. प्राजक्ता कुरळकर स्नातकोत्तर पशुवैद्यकिय व पशुविज्ञान संस्था, अकोला. (महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.)