वांग्याची लागवड आता महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात आणि तिन्ही हंगामात होत असली तरी वाग्याचे एकरी उत्पादन मात्र म्हणावे असे मिळत नाही. त्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी त्यावर पडणार्या किडी आणि रोग हे महत्त्वाचे कारण आहे. विशेषत: वांग्यावर उगवणीपासून तोडणीपर्यंत रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे वेळीच रोगाची लक्षणे ओळखून वेळीच उपाययोजना केल्यास रोगांचे प्रमाण आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवता येतात. बाजारात वांग्याला मिळणारा दर पाहून शेतकरी आता तिन्ही हंगामात या पिकाची लागवड करतात. महाराष्ट्रात जवळजवळ सर्वच जिल्ह्यात वांग्याची लागवड केली जाते तसेच वांगी हे पीक जवळच्या तसेच लांबच्या बाजारपेठांना विक्रीकरता पाठविण्याच्या दृष्टीकोणातून महत्त्वाचे बागायती पीक म्हणून फायदेशीर देखील आहे. वांगी पिकावर येणार्या रोगांचा विविध बंदोबस्त करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उगवणीपासूनच रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात होते. त्यासाठी रोगाची लक्षणे ओळखून वेळीच उपाययोजना केल्यास रोगांचे प्रमाण आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवता येतात.
रोपे कुजणे : या रोगाचा प्रादुर्भाव झालेली रोपे जमिनीलगत फिक्कट हिरवट आणि तपकिरी दिसतात. रोपे निस्तेज पिवळसर होऊन जमिनीलगतचा भाग कुजून रोपे अचानक कोलमडलेली दिसतात. वांगी पिकांमध्ये रोगांची सुरवात रोपवाटीकेपासून होते. तसेच रोगांचा प्रसार जमिनीतून, बियाण्याद्वारे पाणी, रोगग्रस्त झाडांचे अवशेष, हवा आणि किडींमाफर्र्त होत असतो.
पर्णगुच्छ किंवा बोकड्या : हा रोग अतिसुक्ष्म अशा घातक लसीमुळे (फायटोल्फाझ्मा) होतो व या रोगाचा प्रसार तुडतुड्या मार्फत होतो. भारतातमध्ये हा रोग महत्त्वाचा आणि आर्थिकदृष्ट्या नुकसान करणारा आहे. या रोगामुळे झाडांची वाढ खुंटते. पाने लहान आकाराचे, मऊ-पातळ-गुच्छसारखी-पिवळसर झालेली दिसातत. पाने लहान व बोकडेसारखी दिसतात. झाडावर लहान पानांचे झुपके तयार होतात. अशा झाडांना फुले लागत नाहीत आणि लागलीच तर हिरवट रंगाचे लहान आकाराचे फार कमी प्रमाणात असतात. वांग्यामध्ये या किडींचे प्रमाण कोरड्या हवामानात जास्त आढळते. विशेषत: उन्हाळ्याच्या सुरूवातीला प्रमाण जास्त आढळते व पावसाळ्याच्या सुरवातीला हा रोग नुकसानकारक ठरतो. या किडींचे पिले आणि प्रौढ पानातील रस शोषूण घेतात. त्याचबरोबर घातक लस पानात सोडतात. किडींचे प्रमाण जास्त असल्यास पाने वाकडी होतात. पावसाळी हंगामात हा रोग फार घातक आणि नुकसानकारक ठरतो.
मोझॅक व्हायरस : मोझॅक व्हायरसमुळे झाडाची वाढ खुंटते, पाने आखडली, वळलेली, सुरकुतल्यासारखी दिसतात. नवीन पानांवर गर्द हिरवटपणा दिसून येतो. या रोगामुळे फुलेव फळे फार कमी प्रमाणात येतात. आलेली फळे लहान आणि रंगहीन दिसतात. हा रोग काही गवतावर असतो. या रोगाचा प्रसार स्पर्शाने आणि मावा किडींमाफर्र्त फार झपाट्याने होतो. या किटकांची वाढ कोरड्या हवामानात जास्त होते. विशेषत: हिवाळ्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत प्रमाण जास्त असते.
जिवाणूजन्य मर : वांग्यावर सुक्ष्म जीवाणूंपासून होणार्या रोगांमुळे झाडाची वाढ खुंडते. पाने पिवळी पडतात. झाडाची खालील पाने झाड मरण्या अगोदर गळतात. खोडाचा आतील भाग तपकिरी होतो. असे रोगग्रस्त झाड मरते. रोगग्रस्त झाड उपटून खोडाचा भाग कापून पाण्यात धरला असता पिवळसर द्रव आपणास दिसतो. जिवाणूजन्य मर रोग जमिनीतील सुक्ष्म बुरखोल्डेरिया (राल्स्टेंनिया) जिवाणूंपासून होतो.
विषाणूजन्या रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन : विषाणूजन्य रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाड उपटून नष्ट करावी म्हणजे किडींमाफर्र्त होणारा प्रसार थांबवता येईल. रोपवाटिकेत बियाणे रूजल्यानंतर प्रत्येक वाफ्यात दोन ओळींमधून 25 ते 30 ग्रॅम फोरेट टाकावे किंवा डायमेथोएट 10 मिली अथवा मिथील डिमेटॉन 10 मिली 10 लिटर पाण्यातून रोपांवर फवारावे. रोग प्रतिकारक जातींचा उपयोग करावा. वांगी पिकातील तणांचा नायनाट करावा. रोगविरहीत झाडाच्या फळांचा बियाण्यासाठी उपयोग करावा. रोप लावण्यापूर्वी इमिडॅक्लोप्रीड 10 मिली किंवा कार्बोसल्फान 20 मिली लिटर + ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम 10 लिटर पाणी या द्रावणात रोपांची मुळे तीन तास बुडवून लावावी. वरील रोपे प्रक्रिया केलेली नसल्यास 1000 पीपीएम टेट्रासायक्लीन द्रावणात बुडवून करावी आणि लागवडी नंतर चार ते पाच आठवड्यांच्या अंतराने तीन फवारण्या घ्याव्यात. रोपे लागवडी नंतर दहा दिवसांनी थिंमेट/फोरेट प्रती हेक्टरी 10 किलो याप्रमाणे प्रत्येक झाडाभोवती गोल रिंग करून (बांगडी पद्धतीने) द्यावे. रस शोषणार्या किडींसाठी व्हर्टीसिलीयम 29 ग्रॅम+ 10 लिटर पाण्यातून आठ दिवसांच्या अंतराने फवारावे. लागवडीनंतर 40 ते 50 दिवसांनी पिकावर एंडोसल्फान, कॉपर ऑक्झिक्लोराईड यांची फवारणी करावी.
पानांवरील ठिपके : अल्टरनेरीया नावाच्या बुरशीमुळे पानांवर तपकिरी रंगाचे वाकडेतिकडे डाग दिसतात या डागामध्ये गोलाकार एकात एक अशी वलये असतात रोगाचा प्रादुर्भाव पानांच्या सर्व भागांवर पसरून अशी पाने पिवळी पडून गळतात. या रोगाचा फळांवर प्रादुर्भाव होऊन खोलगट तपकिरी रंगाचे डाग आढळून येतात. अशी फळे पक्व होण्याअगोदर गळतात. त्याचप्रमाणे सर्कोस्पोरा नावाच्या बुरशीमुळे पानांवर मोठ्या प्रमाणात वाकडेतिकडे गोलाकार तपकिरी-करड्या रंगाचे डाग पडून पाने गळतात. फळांवर डाग पडून फळे कुजतात.
पानांवरील करपा आणि फळकुज : फोमोप्सिस नावाच्या रोगामुळे हा रोग जमिनीतून आणि बियाण्यामाफर्र्त होऊन या रोगामुळे पानांवर करड्या तपकिरी रंगाचे वाटोळे व लंबकृती डाग दिसतात. पाने पिवळी पडून करपल्यासारखी दिसतात. तसेच या रोगाचे तपकिरी फळांवर खोलगट तपकिरी काळसर डाग दिसतात. रोगाचा प्रादुर्भाव फळांच्या आतील भागात पसरून फळे सडतात. या रोगाची बुरशी-रोगट बी जमिनीत एक एक वर्षांपर्यंत राहू शकते. या रोगाचा दुय्यम प्रसार पाणी, किटक आणि रोगग्रस्त झाडांच्या अवशेषामाफर्र्त होतो.
मर रोग : व्हर्टेसिलीयिम दहलिया या बुरशीमुळे होतो. या रोगाची भारतामध्ये पुणे तेथे सर्वप्रथम 1949 (पटेल) मध्ये नोंद झाली. या रोगाची मुख्य लक्षणे मुळे आणि खोड यांवर आढळतात. रोगग्रस्त झाडे खुजी होतात. या रोगामुळे झाडांची पाने पिवळी पडून पूर्ण झाड मरते. व्हर्टीसिलीयम बुरशीमुळे झाडांची वाढ खुंटते. पाने फिक्कट पिवळसर होऊन मरतात. फळे लागत नाहीत. फुले, फळे आल्यानंतर हा रोग आल्यास फळे सुरकुतलेली दिसतात. फुले, फळे गळून पडतात. या रोगात झाडाची एक बाजू चांगली दिसते. तर दुसर्या बाजूची रोगग्रस्त पाने करपलेली दिासतात. हे दोन्ही रोग जमिनीतून होत असून असे रोगग्रस्त झाड उपटून खोड कापून निरीक्षण केल्यास आतील भाग तपकिरी रंगाचा दिसतो.
बुरशीजन्य रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन : जमीन उत्तम निचरा होणारी असावी. पिकांची फेरपालट करावी. टोमॅटो-बटाटा पिके या पिकानंतर घेऊ नये. तसेच तीन वर्ष वांगी त्या जमिनीत घेऊ नये. जमिनीची खोल नांगरट करून पूर्वीच्या पिकाची धसकटे गोळा करून नष्ट करावी. बियाण्यासाठी सुरवातीचे रोगविरहीत झाडाच्या फळाचे ‘बी’ वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम अथवा कार्बेनन्डॅझीम (बाविस्टीन) एक ग्रॅम अथवा कॅप्टन तीन ग्रॅम अथवा थायरम तीन ग्रॅम प्रती किलो या प्रमाणात बियाण्यास चोळावे. बियाणे पेरणीसाठी तयार केलेल्या तीन बाय तीन मिटर गादीवाफ्यात चांगल्या कुजलेल्या पाच किलो शेणखतात 50 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर मिसळून वाफ्यावर सारख्या प्रमाणात मिसळावे आणि ताबडतोब बीजप्रक्रिया केलेले ‘बी’ पेरून पाणी द्यावे. असे केले नसल्यास 30.40 कॉपर ऑक्सिक्लोराइड (ब्लायटॉक्स) प्रती वाफ्यात टाकून जमिनीत मिसळावे किंवा 25 ग्रॅम डायथेन एम. 45 ते 10 लिटर पाण्यात मिसळून आठ ते दहा दिवसांच्या अंतराने रोप लागवडी योग्य होईपर्यंत जमिनीत मिसळावे.
रोपवाटिकेत रोपे 20 ते 25 दिवसांनी असताना बाविस्टीन 10 ग्रॅम किंवा डायथेन एम 45, 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. लागवडीपूर्वी रोपे पाच ग्रॅम बाविस्टीन 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळावे तयार केलेल्या द्रावणात रोपे 30 मिनीटे बुडवून लागवड करावी.
लागवडीच्या वेळी जमिनीतील बुरशीच्या नियंत्रणासाठी 2.5 ते 3 किलो ट्रायकोडर्मा पावडर 25 किलो शेणखत आणि निंबोळी पावडर मिसळून प्रती एकरी लागवडीसाठी तयार केलेल्या सरीत सारखे प्रमाणात मिसळावे आणि ताबडतोब पाणी देऊन लागवड करावी.
लागवडीच्या वेळी जमिनीतील बुरशीच्या नियंत्रणासाठी 2.5 ते 3 किलो ट्रायकोडर्मा पावडर 25 किलो शेणखत आणि निंबोळी पावडर मिसळून प्रति एकरी लागवडीसाठी तयार केलेल्या सरीत सारखे प्रमाणात मिसळावे आणि ताबडतोब पाणी देऊन लागवड करावी. रोगाचा प्रादुर्भाव झालेली रोगग्रस्त पाने-सडलेली किडकी फळे गोळा करून बांधावर किंवा शेताशेजारील मोकळ्या जागेत न टाकता जाळून नष्ट करावी.
पानांवरील करपा, फळकुज, पानांवरील ठिपके आणि भुरी या रोगांच्या नियंत्रणासाठी बाविस्टीन 10 ग्रॅम अथवा डायथेन एम. 45, 25 ग्रॅम अथवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (ब्लायटॉक्स) 25 ग्रॅम अथवा कॅप्टन 20 ग्रॅम यांपैकी एक बुरशीनाशक आलटून पालटून 10 लिटर पाण्यात मिसळून तीन फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने द्याव्यात. भुरीसाठी पाण्यात विरघळणारे गंधक 25 ग्रॅम वरील बुरशीनाशकामध्ये मिसळून फवारणी करावी.
जमिनीतील बुरशीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर केला नसल्यास लागवडीनंतर किंवा रोगाची लक्षणे दिसताच ब्लायटॅाक्स 30 ग्रॅम अथवा बाविस्टीन 10 ग्रॅम अथवा कॅप्टन 20 ग्रॅम यापैकी एक बुरशीनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेले द्रावण साधारणत: 50 ते 100 मिली झाडाच्या बुंध्याभोवती रिंग करून आलटून पालटून 15 दिवसांच्या अंतराने दोनदा ओतावे.
डॉ. ए. एल. हारदे, डॉ. डि. पी. कुळधर वनस्पती रोगशास्त्र विभाग, वनस्पती, ना. महात्मा कृषी विद्यापीठ परभणी.