सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण 75.37 टक्के भरले असून, धरणाच्या पाणीपातळीत 495.660 मीटरपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या 15 दिवस पुणे आणि नगर जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वरचेवर वाढत आहे. जिल्ह्यातील भिमाकाठ्च्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
जुलै महिन्यात पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे खडकवासलासह सर्वच धरणांमध्ये अतिरिक्त पाणीसाठा झाल्याने ते अतिरिक्त पाणी पुढे उजनी धरणाकडे सोडण्यात येत आहे. त्यामुळे उजनी धरणाने 75 टक्क्यांची पाणी पातळी गाठली आहे. विशेष म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरण उणे पातळीत होते. पण पाण्याच्या सलग विसर्गामुळे धरण 75 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
मोठी बातमी : सरपंचपदाची निवड आता थेट मतदारातून
जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे उजनी धरणाच्यावरच्या बाजूला असलेल्या खडकवासलासह 18 धरणांमध्ये आता अतिरिक्त पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातील अतिरिक्त पाणी पुढे उजनी धरणाकडे सोडले जाते आहे.
सोलापूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 480 मिलिमीटर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 200 मिलिमीटर पाऊस झाला आहे, शिवाय तो सरसकट सगळीकडे पडलेला नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झालेल्या वाढीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
हे वाचा : देशातील 11 व्या कृषी गणनेला प्रारंभ
उजनी धरणाच्यावरच्या बाजूला असलेल्या इतर धरणातून उजनी धरणामध्ये पूर्वी 50 हजार क्युसेक, त्यानंतर 25 हजार क्युसेक असा विसर्ग सोडण्यात येत होता. सध्या विसर्गात काहीशी घट झाली असली, तरी विसर्गात मात्र सातत्य आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीपातळीत संथपणे वाढ होत आहे. शुक्रवारी दौंडकडून उजनी धरणात 8928 क्युसेक इतके पाणी सोडले जात होते.
उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्यामुळे शुक्रवारी धरणात एकूण पाणीपातळी 495.660 मीटरपर्यंत पोहोचली असून एकूण पाणीसाठा तब्बल 104.4 टीएमसीपर्यंत गेला आहे. त्यापैकी धरणात उपयुक्त पाणीसाठा 40.38 टीएमसी एवढा झाला आहे. तर या पाण्याची टक्केवारी तब्बल 75.37 टक्क्यांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 15 दिवसात धरणातील पाणीसाठ्यात शंभर टीएमसीपेक्षा अधिक वाढ झाली आहे.
महत्त्वाची बातमी : शेततळे, सूक्ष्म सिंचनासाठी 126 कोटी रुपयांचा निधी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1