कोरोना आणि लॉकडाऊनचे सावट असताना काल राज्यात विविध भागात वादळी वार्यासह अवकाळी पावसाने मोठा तडाका दिला. यामुळे मराठवाड्यासह, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील कांदा, द्राक्ष, आंबा, केळी व इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले. मोडून पडलेल्या ज्वारीचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वार्यासह पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकर्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.
सोलापूर, सांगली भागात काढणीला आलेल्या बेदाणा पावसाने भिजल्याने त्याचा चिखल झाला आहे. काढून पडलेली ज्वारी मोडणीसाठी राहिल्याने आता ती काळी पडण्याची शक्यता आहे. काही भागातील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. तसे काढणीला आलेला कांदा आणि लसून ही पिके या पावसामुळे नासण्याची शक्यता आहे. ज्या शेतकर्यांचे द्राक्षबागा जाग्यावर आहेत त्या द्राक्ष उत्पादक शेतकर्यांची धडकी भरली आहे. लातूर, सोलापूर या भागातील पाडाला आलेल्या आंबा बागेचेही या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

जालना जिल्ह्यात कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातही वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. रेणापूर तालुक्यात दुपारी 2 च्या सुमारात झालेल्या पावसाने विजेचे खांब पडले तर काही भागातील झाडेही उन्मळून पडली. त्यामुळे तीन तास वीज पुरठा खंडीत झाला होता.
विदर्भात काल काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, काल नवी मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यात आज व उद्या वादळी वार्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उद्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्वमोसमी पावसाचा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे. आज राज्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकाची किनारपट्टी या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. मात्र या क्षेत्राचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. मात्र हिमालय, पश्चिम बंगाल आणि सिक्किम ते दक्षिण छत्तीसगड व झारखंड आणि ओडिशाचा परिसर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच दक्षिण तमिळनाडूच्या परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती कायम आहे. तर ओडिशाच्या परिसरात काही प्रमाणात चक्रीय वाऱ्याची स्थिती असल्याने त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार आहे, तर मराठवाडा व विदर्भात शनिवारपर्यंत पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.