उडीद हे कमी कालावधीत येणारे खरीप हंगामातील कडधान्य पीक आहे. हे ७० ते ७५ दिवसात काढणीस येत असल्यामुळे दुबार पीक घेण्यास योग्य आहे. उदीडाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारे जमीन आवश्यक असते. सुधारित लागवड तंत्राचा वापर केल्यास आणि यावर पडणार्या रोग व किडीचे वेळीच नियंत्रण केल्यास हेक्टरी सरासरी ७०० ते ८०० किलो उत्पन्न मिळविता येते.
महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी मुगाप्रमाणेच उडीदाचेही अल्प मुदतीचे पीक खरीप हंगामात घेऊन रब्बी हंगामात ज्वारी किंवा गहू पिके घेता येतात. हे पीक ७० ते ७५ दिवसात काढणीस येते. तुलनात्मकदृष्ट्या या पिकाखाली जळगाव, उस्मानाबाद, औरंगाबाद, अकोला, बुलढाणा व धुळे जिल्ह्यात अधिक क्षेत्र आहे.
जमीन व हवामान : उदीडाला मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारे जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी क्षारपड चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी. भारी, काळ्या जमिनीमध्ये व वार्षिक सरासरी ६०० ते ७५० मि. मी. पावसाच्या भागात हे पीक चांगले येते. मध्यम, भारी जमिनीतसुद्धा यापिकाचे समाधानकारक उत्पादन मिळते. फुलोरा येण्याच्या काळात पाऊस पडल्यास दाणे पोसले जाऊन उत्पादन अधिक मिळते. निचर्याची जमीन तसेच पोयट्याची जमीन या पिकासाठी योग्य असते.
पूर्वमशागत : या पिकाला मुगाप्रमाणेच पूर्वमशागत करावी. मिश्र पीक असल्यास मुख्य पिकाची मशागत पुरेशी होते. या पिकाला हेक्टरी २० किलो ग्रॅम नत्र व ४० किलोग्रॅम स्फुरदाची मात्रा द्यावी.
पेरणी : महाराष्ट्रात हे पीक खरीप हंगामात घेण्यात येते. पेरणी शक्यतो ३० जूनपूर्वी संपवावी. त्यामुळे उत्पादन जास्त मिळते. शिवाय पीक वेळेवर निघून रब्बीची पूर्व मशागत करण्यास वेळ मिळतो. दोन ओळीतील अंतर ३० सें. मी. ठेवून हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे पेरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया केल्यास उत्पादनात साधारणपणे १० ते २० टक्के वाढ होते. एक हेक्टरसाठी लागणार्या बियाण्यास जीवाणूचे दीड पाकीट पुरते. पेरणीनंतर दोन ते तीन आठवड्यांनी १० सें. मी. अंतर ठेऊन विरळणी करावी. पेरणीस जसजसा उशीर होत जाईल त्याप्रमाणात उत्पादनात मोठी घट होत जाते.
सुधारित जाती : सिंदखेडा १-१, नं-५५ व डी-६-७ हे जुने वाण महाराष्ट्रात बर्याच दिवसांपासून लागवडीखाली आहेत. टी-९ या लवकर येणार्या वाणाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून यापासून जास्त उत्पादन येते. त्यामुळे कमी पावसातही त्याच्या उत्पादनात विशेष घट येत नाही. अलिकडेच भाभा आण्विक संशोधन केंद्र, ट्रॅाम्बे मुंबई आणि पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला यांनी संयुक्तरित्या संशोधित केलेली टी.ए.यु-१ ही जात विदर्भासाठी प्रसारित केलेली आहे. तर बी.डी.यु.-१ ही जात महाराष्ट्रासाठी प्रसारीत करण्यात आली आहे.
नागपूर संशोधन केंद्राने प्रसारीत केलीली नं.५५ हे जात ८० ते ८५ दिवसात येणारी असून १०० दाण्याचे वाजन ४.३ ते ४.५ ग्रॅम भरते. हेक्टरी ८०० ते ९०० किलो ग्रॅम उत्पादन मिळते. विशेषत: विदर्भासाठी ही जात योग्य आहे. टी-९ ही जात कानपूर (उत्तरप्रदेश) संशोधन केंद्रानी प्रसारीत केली आहे. ही जात ६५ ते ७० दिवसात येणारी असून, हेक्टरी उत्पादन हेक्टरी ११०० ते १२०० किलो मिळते. संपर्ण महाराष्ट्रात खरीप व रब्बी हंगामासाठी ही जात योग्य आहे. तर टी.ए.यु.१ ही अकोला ट्रॅम्बे संशोधन केंद्रातर्फे प्रसारीत करण्यात आलेली विदर्भासाठी योग्य असलेली सुधारीत जात आहे. ही ७० ते ७५ दिवसात येते तर उत्पादन हेक्टरी ११०० ते १२०० किलो मिळते.
बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी प्रती किलो बियजाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर लावावी व त्यानंतर 25 ग्रॅम रायझोबियम जिवाणूची पावड गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळू लावावी. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोागचे नियंत्रण होते.
बियाचे व पेरणीचे अंतर : पेरणीसाठी हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे वापरावे. ‘बी’ पेरीसाठी दोन ओळीतल अंतर ३० सें. मी. व दोन रोपामधील अंतर १० सें. मी. राहील या बेताने पेरणी करावी. तुरीचे अंतरपीक घ्यायचे असल्यास मुख्य पिकाच्या दोन ते चार ओळीनंतर एक तुरीची पेरणी करावी.
खत मात्र : २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद म्हणजेच १०० किलो डीएपी प्रती हेक्टरी द्यावे.
आंतरमशागत : पेरणीपासून तीन आठवड्यांनी पहिली खुरपणी करावी. आवश्यकतेनुसार आणखी एक खुरपणी १५ दिवसांनी करावी.
पाणी व्यवस्थापन : या पिकाला फुले येण्याच्या व शेंगा भरण्याच्या काळामध्ये हलके पाणी द्यावे.
कीड व त्याचे नियंत्रण : या पिकाला मुगाप्रमाणेच मुख्यत: मावा, पिसू, भुंगेरे व पाने खाणार्या अळीचा उपद्रव होतो. मावा ही कीड पानांच्या मागच्या बाजूस राहून रस शोषण करते. या किडींचा प्रादुर्भाव दिसू लागताच त्यांच्या बंदोबस्तासाठी बी.एच.सी. १० टक्के भुकटी हेक्टरी २० किलो वारा शांत असताना धुरळावी. उडिदाच्या पिकावर मुख्यत: भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊन पाने पांढरी होऊ लागतात. रोगांची लक्षणे दिसू लागताच ३०० पोताची गंधक भुकटी हेक्टरी २० किलोग्रॅम या प्रमाणात वारा शांत असताना धुरळावी. प्रतिबंधक उपाय वेळेवर न केल्यास पीक हातने जाण्याची भिती असते.
रोग व त्याचे नियंत्रण : उडीद पिकावर भुरी, करपा व पिवया मोझॅक हे रोग येतात. तञयासाठी त्यांचे वेळीच नियंत्रण करण्यासाठी बुरशीनाशकाचा वापर करावा.
भुरी : हा रोग इरीसायली पॉलीगोनी या बुरशीमुळे होतो. ढगाळ हवामान व हवेतील आर्द्रता ६० ते ७० टक्के व तापमान २० ते २५ से. ग्रे. मध्ये या बुरशीची लागण झपाट्याने होते. या रोगाची लागण पानावर वरच्या भागावर पांढरट-राकेरी रंगाच्या बुरशीची पावडर दिसून येते कालांतराने पूर्ण पानावर पावडर पसरून शेवटी पाने काळी पडतात व वाळतात. त्यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण कमी होऊन उत्पन्नात ५० ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.
नियंत्रण : पानावर रोग दिसतातच २५ ग्रॅम ८० टक्के पाण्यात मिसळणारे गंधक किंवा डिनोकॅप (कॅरेथेन) १० मि.ली. किंवा ट्रायडेमार्क (कॅलीक्सीन) ५ मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोग प्रबिंधक जातींची लागवड करावी.
मुळकूज : हा रोग रायझोक्टोनिया नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेत व वाढीच्या अवस्थेत आढळून येतो. झाडाची पाने पिवळी पडतात व झाड एक आठवड्याच्या आत मरतात. झाडे उपटून पाहिल्यास मुळांचा भाग कुजलेला आढळतो. या रोगाची लागण बियाण्यापासून तसेच जमिनीमध्ये असलेल्या रोगट अवशेषापासून होते.
नियंत्रण : रोगट झाडे उपटून नष्ट करावीत. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम तीन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करून पेरणी करावी.
पानावरील चट्टे : हा रोग सरकोस्पोरा व कोलेटोट्रीकम नावाच्या बुरशीमुळे होतो. सुरूवातीस पानावर १ ते २ मि.मी. व्यासाचे करड्या रंगाचे लहान लहान चट्टे दिसतात व ते कालांतराने मोठे होऊन एकमेकांत मिसळतात. असे अनेक पानाच्या देठावर व खोडावर सुद्धा आढळतात. या रोगाचा प्रादुर्भार फुले व शेंगा जास्त आढळून आल्यास शेंगा भरण्याचे प्रमाण कमी होऊन उत्पन्नात घट येत.
बुरशीच्या बीजाणूचा प्रसार हवेद्वारे होतो. या रोगाचे बीजाणू रोगट फांद्या, पाने यामध्ये सुप्तावस्थेत राहतात व नवीन रोगाच्या सुरुवातीचे कारण ठरतात.
नियंत्रण : शेतातील रोगट पाने, फांद्या गोळा करून नषट करावीत, रोग दिसताच डायथेन एम-४५, २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पानावरील करपा : हा रोग जमिनीत राहणार्या मायक्रोफोमिना नावाच्या बुरशीद्वारे होतो. रोगाची लागण पिकाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत आढळून येते. पिकाच्या रोपावस्थेत रोगाची सुरूवात पानावर अनियमित आकाराच्या तपकिरी रंगाच्या चट्ट्यांच्या स्वरुपात दिसून येते. हे चट्टे किंवा ठिपके एकमेकांत मिसळून पूर्ण पाने करपतात. अशा प्रकारचे चट्टे किंवा ठिपके खोडावरही येऊन रोप करपते. कधीकधी रोपे शेंड्याकडून खालच्या भागाकडे वळत जातात. पीक फुलोर्यात असताना रोगाची तीव्रता वाढल्यास शेंडेमर होऊन पिकाची हानी मोठ्या प्रमाणात होते. रोगाचा प्रसार जमिनीतील रोगट झाडाच्या अवशेषाद्वारे व बियाद्वारे होतो. रोगाचे जिवाणू जमिनीत बर्याच काळापर्यंत रोगट झाडाच्या अवशेषावर जिवंत राहतात. जमिनीतील रोग बिजाणूंची संख्या जमिनीचा ओलावा कमी झाल्यास जास्त होतो.
नियंत्रण : पेरणीपूर्वी बियाण्यास २.५ ग्रॅम थायरम किंवा बावीस्टीन या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच बावीस्टीन १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोग प्रतिकारक वाणाची लागवड करावी. जमिनीतील ओलावा वाढवून तापमान कमी केल्यास रोगाचे नियंत्रण करता येते.
पिवळा मोझॅक (केवडा) : हा विषाणूजन्य रोग असून खरीपापेक्षा रब्बी व उन्हाळी हंगामात याचा प्रावदुर्भाव जास्त आढळून येतो. रोगाची सुरुवात पानावर ठळक, पिवळसर व फिकट पिवळसर एकमेकांशी संलग्न चट्ट्यांच्या स्वरुपात दिसून येते. पानाच्या दोन शिरांमधील भाग किंचीत उंचावल्यासारखा दिसतो. सर्वसाधारणपणे पानाचा आकार बदलत नाही. रोगट झाडास शुले व शेंगा कमी लागतात. व त्यांचा उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. रोगाचा प्रसार शेतामध्ये रोगट झाडापासून निरोगी झाडावर पांढरी माशी किडीद्वारे होतो.
नियंत्रण : उडीदाच्या रोगप्रतिकारक वाणाची निवड लागवडीसाठी करावी. रोगाचा प्रसार पांढरी माशीद्वारे होत असल्यामुळे मेटासिस्टॉक १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
काढणी व उत्पादन : सुमारे ७० ते ७५ दिवसात पीक तयार झाल्यावर उपटून शेंगा तोडून वेगळ्या कराव्यात. शेंगा चांगल्या वाळल्यानंतर बैलांच्या सहाय्याने तुडवून किंवा काठीने बडवून मळणी करावी. नंतर उफणणी करून ‘बी’ अलग करावे. साठवण करण्यापूर्वी धान्य एक ते दोन दिवस उन्हात वाळवावे. हेक्टरी सरासरी ६०० ते ७०० किलो उत्पादन मिळते.
डॉ. के. का. झोटे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा