आले हे पीक बहुगुणी मसाल्याचे पीक आहे. तसेच त्यापासून सुंठ व लोणचे बनवितात. आले या बहुगुणी पिकात औषधी गुणमर्ध असल्यामुळे या पिकास वर्षभर चांगली मागणी असते. आले पिकाच्या अपेक्षित उत्पादनासाठी हंगाम लागणीचा, योग्य जातीची निवड आणि योगय पीक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. आले हे पीक हमखास चांगला नफा मिळवून देणारे पीक आहे. हे लक्षात घेऊन सध्याच्या काळात आले लागवड फायदेशीर आहे.
आले पिकाची लागवड एप्रिल ते मे आणि जून महिन्यामध्ये करावी. आल्याच्या वाढीसाठी उष्ण व दमट आणि हिवाळ्यात थंड हवा उपयुक्त आहे. आल्याच्या उगवण क्षमतेसाठी 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असते. आले पिकासाठी जमीन पाण्याचा उत्तम निचरा असणारी, भुसभुशीत मध्यम जमीन निवडावी.
लागवडीची तयारी : जमीन तयार करताना जमीन उभी-आडवी खोलवर नांगरून घ्यावी. नांगरणी केल्यानंतर ढेकळे फोडून कुळवणी करून घ्यावी. त्यावेळी 40 ते 50 गाड्या प्रती हेक्टर चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. जमिनीत असलेल्या गवताच्या काड्या, हरळीच्या काश्या, लव्हाळा आणि चांगल्या प्रकारे वेचून जाळून टाकाव्यात. त्यानंतर आले पिकासाठी गादी वाफे किंवा सरीवरंबे तयार करून घ्यावेत. सरी वरंब्या पद्धतीमध्ये 45 सेमी रूंदीची सरी काढून वरंब्याच्या दोन्ही बाजूने 15 ते 20 सेमी दोन झाडातील अंतर ठेवावे. चार ते पाच सेमीपेक्षा जास्त खोल आले लागवड करू नये. लागवडीचे अंतर 30 बाय 15 सेमी किंवा 30 बाय 20 सेमी असावे. लागण करतेवेळी दोन ओळीतील 30 सेमी अंतर आणि दोन झाडातील 15 ते 20 सेमी ठेवावे. गादी वाफा पद्धतीने लागवड करताना जर ठिबक सिंचन पद्धतीची सोय असल्यास लॅटरलच्या दोन्ही बाजूस चार इंच खोलीचा चर उघडून त्यात लागवड करावी.
बेण्याची निवड : एकरी 800 ते 1200 किलो बेणे लागते तर, साधारणत: हेक्टरी 1500 ते 1800 किलो बेणे लागते. बेणे कमीत-कमी दोन डोळ्यांचे असावे. बेण्याचे वजन 20 ते 30 ग्रॅम असावे. बेणे लागवडीपूर्वी बुरशीनाशक 0.3 टक्के ब्लायटॉक्स द्रावणात आणि किटकनाशकांच्या द्रावणात बुडवून त्यानंतर जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
जाती : वैनाड, रिओ-डि जानीरिओ, चायना, जी-55-1, माहीम, स्थानिक.
तेल : बाष्पशील असलेल्या तेलाचे जास्त प्रमाण असणार्या जाती : सिला स्थानिक, एरनाड, चेरनाडू, नरसापटलम.
जास्त तेलयुक्त जाती : एरनाड, चेरनाडू, चायना, कुरूपामप, रिओ-डी-जानिरोओ.
सुंठ निर्मितीसाठी : करक्कल, नादिया, नरन, एरनाड, वैना, मननतोडी, कुरूप्पमपाडी.
तंतूचे प्रमाण कमी असणार्या जाती : चायना, बॅकाँक, जमैक.
खत व्यवस्थापन : सेंद्रिय खते, प्रति हेक्टर 40 ते 50 गाड्या शेणखत. माती परिक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा देताना 75 नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रति हेक्टरी घ्यावेत. यापैकी पूर्ण स्फुरद आणि पूर्ण पालाश लागवडीसोबत तर लावणीनंतर 30 दिवसांनी अर्धे नत्र व राहिलेले अर्धे नत्र 60 दिवसांनी द्यावे.
पाणी व्यवस्थापन : लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंत आले पिकास जमिनीच्या मगदुर व पिकाच्या गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. साधारणत: आठ ते 10 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
आंतरमशागत : आले पिकाच्या दर्जेदार वाढीसाठी शेत तणविरहित असावे. त्यासाठी दोन ते तीन खुरपणी कराव्यात व झाडांना मातीचा भर द्यावा. शक्य झाल्यास सावली देणारी झाडे (एरंडी) पिकामध्ये लावावीत.
किडी : आले पिकामध्ये प्रामुख्याने कंदमाशी, खवले कीड किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. किडींच्या नियंत्रणासाठी निरोगी बेण्याची निवड लागवडीसाठी तसेच लागवडीनंतर दर महिन्याच्या अंतराने कार्बारील 10 टक्के भुकटी किंवा फोरेट 10 जि दाणेदार हेक्टरी 20 किलो याप्रमाणे जमिनीवर झाडाच्या बुडाशी टाकून हलके पाणी द्यावे.
रोग : आल्यावर मुळकुजवा, पानावरील ठिपके, हे रोग प्रामुख्याने आढळतात. मुळकुजवा रोगाचा प्रादुर्भाव जमिनीत पाणी साचल्याने होतो. म्हणून निचर्याची जमीन निवडावी. रोग आढळल्यास झाडांच्या बुंध्याशी 0.3 टक्के ब्लायटॉक्स किंवा 0.1 टक्के बावीस्टीनचे द्रावण वापरावे. तसेच पानावरील ठिपके या रोगाची लक्षणे पानाच्या दोन्ही बाजूला असंख्य तांबडे डाग दिसतात, पानांचा रंग तांबुस तपकिरी होऊन ती पिवळी पडतात. तीव्रता जास्त आढळल्यास पानातील हरितद्रव्य कमी झाल्याने उत्पादन क्षमता कमी होते. नियंत्रणासाठी रोगाची लक्षणे आढळताच कॉपर ऑक्सोक्लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
काढणी व उत्पादन : ओल्या आल्यासाठी लागवडीनंतर सात ते आठ महिन्यांनी पाने पिवळी पडल्यावर किंवा वाळल्यावर पीक काढणीसाठी योग्य होते. पिकाची पाने 50 टक्के पेक्षा जास्त पिवळी पडून सुकू लागल्यावर पीक काढणीस तयार झाले असे समजावे. मात्र सुंठ तयार करण्यासाठी पाला वाळून खाली पडल्यावर म्हणजे 245 ते 260 दिवसांनी कुदळीने खोडून इजा न होता काढणी करावी. सुधारित पद्धतीने लागवड केल्यास हेक्टरी 150 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
प्रा. डॉ. एम. बी. नारखेडे / प्रा. जी. बी. सुर्यवंशी आदित्य कृषी महाविद्यालय, बीड. मोबा : 9822435624