देशात रासायनिक खताचे आगमन व त्यांचा वापर होण्यापुर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत, पेडींचा वापर, पिकाची फेरपालट यांच्याद्वारे जमिनीची सुपिकता टिकवुन ठेवत असे. कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करु लागले व त्यामुळे त्याचा दुष परिणाम पिकांवर तसेच जमिनीत दिसुन येऊ लागला. पर्यायाने पाणी, प्राणी, पक्षी, मानवी आरोग्य व गांडुळ मित्राचे आस्तितवच धोक्यात आले त्यामुळे रासायनिक खाताबरोबर शेतीला वरदान असणारी काही खते बनवण्याची पद्धत आज शेतकऱ्यांनी जोपासली पाहिजे. इतर पद्धीतीबरोबरच गांडुळ खत बनण्याची पद्धतही अगदी सोपी आणि फायदेशीर आहे.
गांडुळ खत म्हणजे काय ? : गांडुळाच्या नैसर्गिक कार्य करण्याच्या सवयीचा उपयोग करुन सेंद्रिय पदार्थापासुन तयार झालेले खत म्हणजे गांडुळ खत होय. यात नत्र, स्फुरद, पालाश, संजिवके, कॉल्शीअम आणि सुक्ष्मद्रव्य इत्यादीचे प्रमाण शेणखतापेक्षा अधिक असते यात गांडुळाचे अंडीपुंज असुन उपयुक्त जिवाणु आणि प्रती जैविके असतात.
गांडुळाची जात व जीवन क्रम :
१. इसीनिया फिटेडा :- सरासरी आयुष्यमान ३ ते ४ वर्षे त्या जातीचे प्रजनन हे वर्षभर चालते. ती विष्ठा ही रेतीच्या स्वरुपात टाकते. ओलाव्याचे प्रमाण ३० ते ३५ टक्के राखते. या जातीच्या गांडुळाचा रंग हा गर्द लाल असतो. या जातीची लांबी ३ ते ४ इंच इतकी असते.
२. युड्रेलिस युजेनी :- सरासरी आयुष्मान हे १ ते १.५ वर्षे या जातीचे प्रजनन वर्षभर चालते. ती विष्ठा दाणेदार गोळ्यांच्या स्वरुपात टाकते. ओलाव्याचे प्रमाण ३०-३५ टक्के राखते. या जातीच्या गांडुळाचा रंग हा तांबुस तपकिरी असतो. या जातीची लांबी 4-5 इंच इतकी असते.
गांडुळाचे खाद्य : हे खत तयार करत असताना गांडुळाना व्यावस्थीत अन्न पुरवणे महत्वाचे आहे. त्यामुळ गांडुळाची वाढ व प्रजोत्पादन झपाट्याने होते. झाडांची पाणे, कापलेले गवत, तण, काडी-कचरा, पाला-पाचोळा, भाज्यांचे टाकाऊ भाग, कंपोस्ट खत, शेण खत, लेंडी खत इ. पदार्थ गांडुळाचे आवडीचे आहेत.
गांडुळाची काळजी : गांडुळ हा प्राणी स्व:ताचे रक्षण स्व्त: करु शकत नाही त्यामुळे त्याचे बेडुंक, पक्षी, सरडे, साप, गोम, उंदीर, मुंग्या, कोंबड्या, ह्या शत्रुपासुन रक्षण करावे. जमीनीमध्ये घातक रसायनांनचा वापर टाळावा.
गांडुळ खत तयार करण्याची पध्दत :
गांडुळ खत मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाठी खालील पध्दतीचा वापर करावा :
अ) खड्डा पध्दत (३ मी लांब X २ मी रुंद X ०.६ मी खोल)
ब) सिमेंट हौद पध्दत (३ मी लांब X २ मी रुंद X ०.६ मी खोल)
क) बिछाणा पध्दत (३ मी लांब X २ मी रुंद X ०.६ मी खोल)
गांडुळ खत तयार करण्याच्या वरील पध्दती पैंकी आपल्या सोयीनुसार एक पध्दत निवडावी. निवड केलेल्या पध्दतीसाठी लागणारी खड्याची रचना ही गुरांच्या गोठ्याजवळ उंच जागेवर योग्य निचरा असणाऱ्या ठिकाणी माडंवाच्या किंवा झोपडीच्या सावलीत करुन घ्यावी ज्यामुळे उन्हापासून व पावसापासून खताचे व गांडुळाचे संरक्षण होईल.
खड्डा भरताना सर्वच पद्धतीमध्ये थरांची रचना सर्वसाधारणपणे एकाच प्रकारे केली जाते. सुरुवातीस तळाशी १५ सेंमी जाडीचा संद्रिय पर्दाथांचा थर द्यावा उदा. (उसाचे पाचट, गव्हाचे काड, सोयाबीन, तुर, भुसा, पालापाचोळा, चाऱ्याचा उरलेला भाग, इ.) त्यावर अर्धवट कुजलेले शेण खत व चाळलेली माती ३:१ से या प्रमाणात मिसळुन त्याचा १५ से.मी. चा थर द्यावा. त्यावर ताज्या सेणाचा कालवून त्याची रबडी करुन १० से.मी. चा तिसरा थर द्यावा. शेवटी बिछाण्यावर सेंद्रिय पर्दाथाचे आच्छादन घालावे हा बिछाणा पाण्याने ओला करावा. वातावरणा नुसार व आवश्यकते प्रमाणे पाणी द्यावे. व खतामध्ये ५० टक्के ओला टिकुण राहिल याची काळजी घ्यावी. रचलेल्या थरातील उष्णता कमी झाल्यावर १-२ आठवड्यांनी वरील सेंद्रिय पर्दाथाचा थर बाजुला सारुन कमीत कमी १००० प्रौढ गांडुळे सोडावी. गांडुळाची संख्या कमी असेल तर खत तयार होण्यास जास्त काळ लागतो. पण सर्वसाधारणपणे ३x२ x ०.६ मी. गांडुळाची संख्या १० हजार झाली की दोन महिन्यांत उत्तम असे एक टन गांडुळ खत तयार होते. गांडुळ खताचा रंग काळसर तपकिरी असतो. खत तयार झाल्यावर पाणी बंद करावे, वरचा थर कोरडा झाला की, पुर्ण गांडुळ खत गांडुळा सकट बाहेर काढावे.
गांडुळ खतातील अन्नद्रव्यांचे प्रमाण : नत्र (०.५ – १.६ %), स्फुरद (०.३ – २.३ %), पालाश (०.१५ – ०.१५ %)
गांडुळ खताचे फायदे : बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. मातीची पाणी निचरा होण्याची क्षमता वाढते. जमीनीचे भौतिक, जैविक गुणधर्म सुधारतात व उत्पादनात वाढ होते. संतुलीत अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. जमीणीची धुप थाबंते.
संजय बाबासाहेब बडे सहाय्यक प्राध्यापक, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगांव ता. वैजापुर, जि. औरंगाबाद. मो. ७८८८२९७८५९