पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने राज्यातील प्रयोगशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञांना देण्यात येणारे ‘वसंतराव नाईक कृषी पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या ४३ व्या स्मृतिदिनी गुरूवारी, दि. १८ ऑगस्ट रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व हवामान अभ्यासक पंजाबराव डख व हळद पीक तज्ज्ञ डॉ. जितेंद्र कदम प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृती मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

यंदा पश्चिम महाराष्ट्र विभागातून प्रियदर्शनी मानकर, (तळेगाव दाभाडे, जि. पुणे, गुलाब उत्पादक शेतकरी), संदीप घोले, (पाटस, ता. दौड जि. पुणे. कांदा वाण संशोधक शेतकरी) आनंदराव शिंदे (आनंद कृषी पर्यटन केंद्र, बोरगाव ता. जि. सातारा. कृषी पर्यटन) यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
मराठवाडा विभागातून नितीन सावंत (जागजी, जि. उस्मानाबाद. सफरचंद व ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकरी), अनुप मोरे (मुदखेड, जि. नांदेड. सोयाबीन, हळद उत्पादक शेतकरी) यांची उत्तर महाराष्ट्र विभागातून दीपक पाटील (माचला ता. चोपडा, जि. जळगाव. केळी व कापूस उत्पादक शेतकरी) यांची कोकण विभागातून देवराई कृषी समूह (मु .पो. कर्ली, देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी. सामुहिक बागायतीचे यशस्वी मॉडेल)
तर विदर्भ विभागातून प्रवीण गट्टाणी (सीताफळ, पेरू, आंबा फळबाग, श्री संत खप्ती शेतकरी पुरुष बचत गट (वेणी खुर्द, ता. पुसद, जि. यवतमाळ. (मिनी दाळमिल, सेंद्रिय दाळीचे पॅकिंग विक्री), अमोल बोडखे (लोणी, ता. पुसद, जि. यवतमाळ. विक्रमी टरबूज उत्पादन ) यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
कृषी शास्त्रज्ञ विभागातून डॉ. मनोज माळी, हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली, डॉ. शिवाजी म्हेत्रे, सोयाबीन पैदासकार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
दुपारच्या सत्रात डॉ. जितेंद्र कदम हे हळद पिकावर मार्गदर्शन करणार असून, यावेळी माजी राज्यमंत्री डॉ. एन. पी. हिराणी, माजी मंत्री मनोहर नाईक, माजी आमदार विजय पाटील-चोंढीकर, माजी राज्यमंत्री अविनाश नाईक, प्रा. गोविंद फुके, आमदार निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक या सोहळ्याला उपस्थित रहाणार आहेत.