राज्यात फळबागांचे क्षेत्र वाढत असले तरी फळबांगांवर पडणाऱ्या रोगामुळे शेतकरी हैराणन झाले आहेत. हवामानातील बदलामुळे फळबागांच्या वाढीवर व उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. सध्या राज्यातील पपईच्या बागावर व्हायरसने हल्ला चढवला असून, शेकडो एकर पपईच्या बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
बीड जिल्ह्यातल्या बहुतेक गावातील पापईच्या बागांवर व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. फळबागातून जास्तीचे उत्पन्न मिळते म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पपईच्या बागा लावल्या. मात्र परतीच्या पावसाने पपईवर मर रोग आणि जास्तीच्या पाण्याने झाडांची खोड सडल्याने, पपईवर मावा तुडतुडे यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यातूनच या बुरशीसारख्या व्हायरसची निर्मिती झाली आणि हाच व्हायरस आता पपईच्या बागा अशा उद्ध्वस्त करत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
पावसाळ्यामध्ये ज्या पपईच्या बागा तोडणीला आल्या आहेत, त्या भागामध्ये या व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. अनेक शेतकऱ्यांनी यावर उपाययोजना केल्या आहेत मात्र त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. परतीच्या पावसाने डाळिंब आणि मोसंबीच्या बागांनाही मोठा फटका बसला होता. आता पुन्हा पपईच्या बागांवर रोग पडल्याने शेतकरी सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहेत.
पारंपरिक शेतीला फाटा देऊन फळबागांचे क्षेत्र वाढत असले तरी फळबाग लागवडीपासून ते काढणीपर्यंत योग्य व्यवस्थापन न झाल्यास देखील बागांचे नुकसान होण्याची शक्यता वरचेवर वाढत आहे. त्यातच आता सतत बदलणारे वातावरण, नवीन येणारे रोग आणि व्हायरस यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
पारंपरिक पिके घेणाऱ्या सोयाबीन आणि कपाशीच्या शेतकऱ्याला परतीच्या पावसाने यंदा झोडपले आणि चांगला पाऊस होवूनही शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. आता फळबागवाले शेतकरीसुद्धा अचानक आलेल्या या व्हायरसमुळे आर्थिक कोंडीत सापडले आहेत.