बांबू शेती करायचीय ? जाणून घ्या बांबूच्या अभिवृद्धी विषयी

0
1026

बांबूची अभिवृद्धी बियांपासून किंवा कंदापासून करता येते. ज्या जातीच्या बिया मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. व त्यांची उगवण क्षमता चांगली आहे. अशा जातींची अभिवृद्धी बियापासून केलीतर चालते मात्र काही जाती अशा आहेत की, त्यांच्या बिया सहसा उपलब्ध होत नाहीत किंवा उपलब्ध झाले तरी त्यांनी उगवण क्षमता कमी आहे; अशा बिया दुर्मिळ असलेल्या जातींची लागवड मुनवे व कलमे लावून करावी लागते.

शेतकऱ्यांनी आपल्या भागात चांगल्या वाढणाऱ्या प्रजातींचाच लागवडीसाठी वापर करावा. विशिष्ट उद्देशाने नवीन प्राजातीची लागवड करावयाची असल्यास ती प्रजाती ज्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात येते तेथून त्या प्रजातीचे कंद आणावेत आणि त्यापासून लागवड करावी.

लक्षात घ्या, बांबू ही ‘एकदल’ वर्गात मोडणारी वनस्पती आहे. कारण द्विदल वनस्पतीप्रमाणे बांबूला सोटमुळ नसते तर बांबूला तंतुमुळे असतात. बांबूची फुले गवतांच्या फुलांसारखी बारीक व गुच्छाच्या स्वरुपात येतात. काही बांबूच्या जातींना आयुष्यात एकदाच फुले येतात. काही बांबू फुले आल्यानंतर मरून जातो. बहुतेक बांबूंना क्वचितच दरवर्षी फुले येतात. काही बांबूंना 65 वर्षांनी, तर काही मोजक्या बांबूंना 130 वर्षांनी फुले येतात. भारतात बहुतांश बांबूंना 32 व 60 वर्षांनी फुले येतात. विशेषत: ती सर्वत्र एकाच वेळी येतात. त्यापासून तयार होणार्‍या बिया या शुष्क व कण स्वरूप भाता प्रमाणे असतात.

व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या व महाराष्ट्राच्या वातारणात उत्तम येणाऱ्या अशा कळक, मानवेल, माणगा व मेस यापैकी कळक व मानवेल संपूर्ण महाराष्ट्रात आढळतात तर माणसा व मेस कोकणात मोठ्या प्रमाणात आढळतात. कळक व मानवेलचे ‘बी’ दरवर्षी शिवाय मुबलक प्रमाणात मिळते. तसेच त्यांची रूजण्याची क्षमताही चांगली असते.

बियांपासून अभिवृद्धी : बियांपासून अभिवृद्धी करताना गादीवाफ्यावर किंवा पॉलिथिन पिशवीत अशा दोन पद्धतीने करता येते. मात्र यासाठी फेब्रुवारी ते जून या दरम्यान बांबूच्या बेटाभोवती पडलेले पक्व ‘बी’ गोळा करून ते निवडून व स्वच्छ करून ठेवावेत. त्या बियांचे बुरशी व जिवाणूपासून संरक्षण करण्यासाठी ‘सेरेशन’ या बुरशीनाशकाची (5 ग्रॅम) प्रक्रिया करावी. तसेच या बियांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी प्रति जैविकांचाही आज-काल उपयोग केला जातो.

गादीवाफ्यावर अभिवृद्धी : गादीवाफ्यावर अभिवृद्धी करावयाची झाल्यास प्रथम 1 मीटर रूंद व 10 मीटर लांबीचे गादीवाफे शेणखत व कंपोस्ट खत घालून तयार करून घ्यावेत. तयार केलेल्या गादीवाफ्याला चांगले पाणी देवून त्याच्या वाफसा अवस्थेत 30 सें. मी. अंतरावर आडव्या ओळीमध्ये ‘बी’ पेरून घ्यावे. त्यानंतर वाफ्ंयाला पुरेसे पाणी द्यावे. बियाण्याची ही पेरणी साधारणत: सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात करावी. पाच ते दहा दिवसात बिया रूजून येतात. त्यानंतर आठ दिवसांनी रोपे एका पानावर येतात. त्यानंतर तीन ते चार महिन्यांनी म्हणजेच जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पॉलिथिन पिशवीत ही रोपे भरून घ्यावीत. पॉलिथिन पिशवीतील ही रोपे जून-जुलै महिन्यात लागवडी वापरता येतात.

पॉलिथिन पिशवीत अभिवृद्धी : पॉलिथिन पिशवीत अभिवृद्धी करायाची झाल्यास 25 बाय 12 सें.मी. आकाराच्या पॉलिथिन पिशवीचा वापर करावा. माती, कंपोस्टखत व चांगले कुजलेले बारीक शेणखत यांचे 1 : 1 : 1 मिश्रण करून पॉलिथिन पिशवी भरून घ्यावी. त्यामध्ये तीन ते चार बिया टोकण करून पुरेसे पाणी द्यावे. सर्वसाधारण हे टोकण सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात करावे. पाच ते दहा दिवसात बिया रूजून येतात. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी रोपे एका पानावर येतात. अशा प्रकारे पिशवीत लावलेल्या रोपांची वाढ जोमदार होते. बियाणे रूजण्याचे प्रमाण वाफ्यापेक्षा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जास्त मिळते. तसेच बियांची रूजवण क्षमता एक ते दोन महिन्यापर्यंत टिकून राहते. आणि विशेष म्हणजे बियाणे कमी लागते.

अशाप्रकारे गादीवाफा किंवा पॅलिथिन पिशवीमध्ये बियांपासून तयार केलेल्या रोपांची लागवड केल्यास बेट तयार होण्यास पाच ते सहा महिने तर पहिल्या तोडणीत सहा ते आठ वर्षे लागतात.

कंदाद्वारे अभिवृद्धी : बांबू लागवडीची ही सर्वात चांगली पद्धत आहे. या पद्धतीमध्ये जुन्या बांबूच्या बेटातील एक ते दोन वर्षे वयाचा उगवणक्षम दोन ते तीन डोळे असलेला चांगला कंद निवडावा. तो कंद मुख्य कंदापासून मुळ्यासह अलगद बाजूला काढावा. कंद काढण्यापूर्वी त्या कंदाच्या फांदीवर जमिनीपासून तीन ते चार फुट उंचीवर धारदार चाकूने तिरका काप घ्यावा. हे करत असताना मुख्य कंदाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. काढलेल्या कंदाच्या जागी मातीची भर घालून ती घट्ट बसवावी. म्हणजे मुख्य कंदाचे पाण्यामुळे किंवा वार्‍यामुळे नुकसान होणार नाही. काढलेल्या कंदाच्या फांदीवर काप घेतलेल्या ठिकाणी माती किंवा शेणाचा गोळा लावावा. म्हणजे कुजेला चांगलाच प्रतिबंध होतो.

दुसरीकडे लगेच लागवड करावयाची असल्यास पावसाळ्याच्या सुरूवातीला कंद काढून त्याची लगेच लागवड करावी. जर रोपांची निर्मिती करून लागवड करावयाची असल्यास फेब्रुवारी ते मार्च दरम्यान वरील प्रकारे कंद काढून ते पॅलिथिन पिशवीत लावावेत. त्यापूर्वी माती, वाळू व चांगले कुजलेले बारीक शेणखत यांचे 1 : 1 : 1 मिश्रण करून पॉलिथिन पिशवी भरून घ्यावी. अशा प्रकारे भरलेल्या पिशव्यांमध्ये कंदाची लागवड करावी. हे करीत असताना फांदीवरील उगवणक्षम डोळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे कंदापासून रोप तयार केलेल्या पिशवांमधील रोपांची जुलै महिन्यात हव्या त्या ठिकाणी लागवड करावी.

बांबूच्या सर्व प्रकारच्या जातींमध्ये कंदाद्वारे अभिवृद्धी करता येऊ शकते. मात्र कंदाची उपलब्धता कमी असल्यामुळे या पद्धतीने बांबूची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याला मर्यादा येतात. कंदाद्वारे केलेल्या बांबूच्या लागवडीमध्ये झाडे जगण्याचे प्रमाण चांगले असते विशेषत: या पद्धतीमध्ये वाहतुकीचा खर्च कमी येतो. विशेषत: कंदापासून लागवड केल्यामुळे चार ते पाच वर्षापासून उत्पादनास सुरूवात होते.

हेही वाचा :

बांबू लागवड आणि तोडणी

बांबू लागवडीनंतर कशी घ्यावी काळजी ?

फायद्याच्या बांबू शेतीचे लागवड तंत्र

सागाची जलद वाढ होण्यासाठी

सागशेती

अशी करा सिसू वनवृक्षाची लागवड

कशी करावी निलगिरीची व्यापारी लागवड

सुरूवृक्षा लागवडीचे व्यापारी उत्पादन तंत्र

कांडीद्वारे अभिवृद्धी : हल्ली बांबूच्या खास करून माणग्याच्या अभिवृद्धीसाठी कांडी पद्धत वापरली जाते. यामध्ये प्रत्येक तुकड्यावर मध्यागी एक गाठ येईल याप्रकारे तुकडे करावे. हे तुकडे 15 मिनीटे बुरशीनाशक व मुळे सडविणार्‍या संप्रेरकाच्या मिश्रणात बुडवून ठेवावे. असे प्रक्रियायुक्त तुकडे रोपवाटिकेतील गादीवाफ्यावर ठेवावे. खते व किटकनाशकांचा नियमित वापर करून त्यांच्या वाढीवर लक्ष ठेवावे. गाठीवरील डोळा फुटून त्यापासून नवीन रोप व मुळे तयार होतात. अशाप्रकारे तयार झालेली रोपे तीन महिन्यानंतर मोठ्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये ठेवावी. त्यानंतर जुलै महिन्यात त्याची लागवड करावी.

टिश्युकल्चर तंत्रज्ञान : बांबूच्या रोपांची वाढती मागणी लक्षात घेता आता बांबूची टिश्युकल्चर तंत्राने रोपांची निर्मिती केली जाते. टिश्युकल्चर तंत्राचा वापर केल्यामुळे आपणास ज्या प्रजातीची रोपे हवी आहेत. त्या प्रजातीची रोपे मिळू शकतात. त्याच्या गुणधर्मामध्ये थोडाही फरक पडत नाही. विशेष म्हणजे त्यांची गुणवत्ता उत्तम असते. शिवाय त्याच्या उत्पन्नाचा निश्‍चित अंदाज बांधता येतो. मात्र ही रोपे थोडी महाग पडतात. अशा प्रकारे हव्या त्या प्रजातीची टिश्युकल्चर रोपे आणूनही बांबूची लागवड करता येते.

(संदर्भ : शेतीमित्र मासिक)

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here