विविध भाजीपाला पिकांना लागणारी पाण्याची गरज ठरविताना जमीन, हवामान, पिकांचा प्रकार, इत्यादी बाबी विचारात घ्याव्या लागतात. हलक्या व रेताड जमिनीत पाणी लवकर खालच्या थरात निघून जाते आणि पिकास उपलब्ध होत नाही. अशा जमिनीत कमी प्रमाणात व वारंवार पाणी द्यावे लागते. मध्यम आणि भारी जमिनीत एकदा दिलेले पाणी पिकांना अधिक काळापर्यंत उपलब्ध होते.
खोलमुळे असलेल्या भेंडी, टोमॅटो यासारख्या भाजीपाला पिकांना एका वेळी जास्त पाणी देऊन दोन पाळ्यांतील अंतर वाढविता येते. अशा पिकांना वारंवार पाणी दिल्यास जमिनीच्या वरच्या आठ ते दहा सेंटिमीटर थरातील पाण्याची बाष्पीभवनामुळे वाफ होऊन ते हवेत उडून जाते आणि पिकांच्या वाढीस उपयुक्त होत नाही. या उलट उथळ मुळ्या असलेल्या भाजीपाला पिकांना एकाच वेळी जास्त पाणी दिल्यास ते पिकांच्या मुळ्यांच्या थरापेक्षा खोलवर निघून जाते. म्हणून अशा पिकांना प्रत्येक वेळी कमी कमी पाणी देऊन पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर कमी करता येते.
उन्हाळ्यात कोरडी हवा आणि अधिक तापमानामुळे बाष्पीभवन वाढते त्यामुळे पिकांना जास्त प्रमाणात आणि लवकर पाणी द्यावे लागते. या उलट थंड व दमट हवामानात पाण्याच्या पाळ्यांमधील अंतर वाढवावे लागते.
बटाटा पिकास आठ ते दहा दिवसांच्या अंतराने सहा ते आठ पाण्याच्या पाळ्या दिल्यास जास्त उत्पादन मिळते. हिवाळ्यात टोमॅटो पिकास ठिबक सिंचन पद्धतीने दिल्यामुळे टोमॅटो फळांची प्रत चांगली राहते आणि पाण्याची 45 टक्के बचत होते. ऑगस्ट महिन्यात लावलेल्या मिरचीच्या पिकाला आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या सहा ते आठ पाळ्या द्याव्यात.
भाजीपाला पिकांना पाणी देण्याची वेळ : पिकांना पाणी देण्याचे प्रमाण आणि वेळ ठरविताना जमिनीचा प्रकार, लावलेले पीक पिकांच्या वाढीची अवस्था आणि हवामान यांचा विचार करावा लागतो. प्रत्येक पिकाच्या ठराविक वाढीच्या वेळेला पाण्याची गरज वेगवेगळी असते. त्यानुसार पिकांच्या वाढीसाठी ठराविक काळात पाणी जास्त लागते. म्हणून त्या पीकाची महत्त्वाची अवस्थेत वेळेवर पाणी देणे महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, प्रत्येक पिकाला फुले आल्यावर फळधारणेच्या वेळी आणि फळे वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असते.
भाजीपाला पिकांना इतर पिकांपेक्षा पाण्याची जास्त आवश्यकता असते. भाजीपाल्याची वाढ होत असताना भरपूर पाण्याची आवश्यकता असणारे दोन महत्त्वाचे कालावधी आहेत. पहिला कालावधी म्हणजे बियांची उगवण होत असताना अथवा रोपांची लागवड केल्यानंतर लगेच सुरू होते. बियांची अथवा रोपांची लागवड केल्यानंतरच्या काळात जास्त पाण्याची आवश्यकता नसली तरी रोपांना आवश्यकतेप्रमाणे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक असते. दुसरा कालावधी म्हणजे पिकांची जोमाने वाढ होऊन त्यावर फुले आणि फळे येण्याचा काळ होय. या काळात बाष्पीभवनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर वाफ होत असते. म्हणून या काळात पिकांना पाण्याचा भरपूर पुरवठा करणे आवश्यक असते.
डॉ. प्रेमा जगन्नाथ बोरकर आनंद निकेतन कृषी महाविद्यालयवरोरा, जि. चंद्रपूर