मागील आठवड्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यंदाचा सर्वसाधारण म्हणजेच 96 टक्के पाऊस होण्याचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजात 5 टक्के कमी-अधिक तफावत होऊ शकते. असे मत ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
खुळे यांच्या अंदाजानुसार यंदा एप्रिल, मे आणि जून महिन्यांत कमाल तापमानाचा विचार करता, कोकण, सह्याद्री घाटमाथा व पूर्व विदर्भ वगळता महाराष्ट्रातील सुमारे 80 टक्के भागांत सरासरी इतकेच तापमान राहण्याचा अंदाज आहे. म्हणजेच उन्हाळा आल्हाददायक असण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित कोकण व सह्याद्रीचा घाटमाथा तसेच पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत दुपारचे कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. सर्व साधारण राज्यात 20 टक्के भागात कडक उन्हाळा जाणवण्याची शक्यता आहे.
संपूर्ण उन्हाळ्यातील किमान तापमान बघता कोकण व दक्षिण महाराष्ट्रातील काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 65 टक्के भागात पहाटेचे किमान तापमान हे सरासरी इतकेच राहण्याची शक्यता अधिक असून, या भागांत पहाटेच्या वेळी गारवा जाणवणार आहे.
उर्वरित कोकण व दक्षिण महाराष्ट्रातील मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांत पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांत पहाटेच्या वेळी तुलनेने कमी गारवा जाणवेल, असे दिसते.
एकंदरीत संपूर्ण उन्हाळ्यात मुंबई, ठाणे, रायगड, खानदेश, नाशिक, नगर व विदर्भातील जिल्ह्यांत 1 ते 2 दिवस उष्णतेची लाट येण्याची तुरळक शक्यता आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाचा सर्वसाधारण म्हणजेच 96 टक्के पाऊस होण्याचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजात 5 टक्के कमी-अधिक तफावत होऊ शकते. म्हणजेच यंदा सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्याचा विचार करता, यंदा मान्सून काळात ‘टरसाइल’ प्रकारनुसार सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता दर्शविली जात असली, तरी तो सरासरी इतकाच होण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीतील क्षेत्रफळभारित सरासरी पाऊस हा अंदाजे १०० सेंमी च्या आसपास समजावा. परंतु हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे.
सरासरीच्या ९० ते ९५ टक्के या दरम्यानचा पाऊस हा सरासरीपेक्षा कमी मानला जातो. म्हणजेच यंदा राज्यात ९० ते ९५ सेंमी इतका क्षेत्रफळभारित सररासरी पाऊस अपेक्षित आहे. मात्र या सर्व शक्यतांमध्ये देखील मान्सूनचे उशीरा आगमन व आगमनानंतर कमकुवत मॉन्सूनचा रेटाप्रवाह आणि पावसाचे असमान वितरण या तीन गोष्टींवरून क्षेत्रफळभारित सरासरी पाऊस हा ९० सेंमीपेक्षा कमी पावसाची शक्यता दर्शवते.
सरासरी ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस हा ‘टंचाई’ प्रकारात मोडला जातो. शेतीसाठी ही दुष्काळसदृश परिस्थितीची शक्यताही नाकारता येत नाही. वरील तीन घडामोडी या जर-तरच्या शक्यतेवर आधारित आहेत. तीन नकारात्मक गोष्टी सकारात्मकतेत जरी बदलल्या तरी विशेष फरक पडणार नाही.
तरी देखील पाऊस हा फार तर देशात पडणार तसा महाराष्ट्रतही सरासरीइतका पाऊस पडू शकतो म्हणजे फार सुकाळ स्थिती समजू नये. एकंदरीत एल-निनोचा धसका न घेता, मान्सून वेळेवर आला तरी खरिपात कमी कालावधीत कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचे नियोजन करावे.
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान खाते, पुणे.
(मोबा. 9422059062/9423217495)
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा !