खरबूज आणि कलिंगड (टरबूज) याची मागणी वाढत असून, क्षेत्रही वाढत आहे. मात्र उत्पादन तेवढे वाढलेले दिसून येत नाही. पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ आता मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातील वाढत चाललेली खरबूज आणि कलिंगड लागवड लक्षात घेता, विद्यापीठाने लागवडीच्या बाबतीत विकसीत केलेले तंत्रज्ञान शेतकर्यांना नक्कीच उपयुक्त पडणारे आहे.
कलिंगड व खरबूज उत्पादन वाढीसाठी जमिनीची निवड, हवामान, सुधारीत जाती, लागवडीची वेळ, लागवडीतील अंतर, खत व पाणी व्यवस्थापन या गोष्टींची माहिती शेतकर्यांना होणे गरजेचे आहे. या बाबत विद्यापीठाच्या शिफारशीचा अवलंब शेतकर्यांनी केल्यास नक्कीच या पिकात शेतकर्यांना पैसे मिळतात.

कलिंगड व खरबूज लागवडीसाठी जमीन : टरबूज आणि खरबूज लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य असते. मात्र जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असलेली जमीन या पिकासाठी सर्वोत्तम ठरते.
कलिंगड व खरबूज लागवडीसाठी हवामान : पिकाच्या लागवडीसाठी उष्ण व कोरडे हवामान व भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. बियाण्याची उत्तम उगवण होण्यासाठी 25 ते 30 सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. कमी तपमानात बियाण्याची उगवण चांगली होत नाही.
कलिंगड व खरबूज लागवडीसाठी सुधारीत जाती : टरबुजामध्ये शूगर बेबी, अर्का माणिक, नामदेव उमाजी कंपनीच्या नेल्सन (काळी पाठ) आणि नेपच्यून (फिक्कट हिरवे पट्टे), पुंटो, मायक्रा, क्रुझर तसेच नोन यू सीड कंपनीचे किरण-1,2 ( काळी पाठ) तर क्लॉज सीडस् कंपनीचे अरून 1 (काळी पाठ), सागर बायोटेक कंपनीचे करिना किंग, रॉम्बो, टुर्बो 295, महाराजा, ब्लॉक करिना, अरुणी 007, सकाटा सीड इंडिया प्रा. लि. कंपनीचे युवराज आणि वरुण (6838) तर अंकूर सीड्स कंपनीचे कशीश व सरस सिंजेन्टा कंपनीचे शुगर क्वीन, ऑगस्टा, स्वीट बेबी या जाती सर्वोत्तम आहेत.

खरबूजामध्ये सागर बायोटेक प्रा. लि. या कंपनीचे माधुरी, सोना व जहान्वी, सकाटा सीड इंडिया प्रा. लि. कंपनीचे वेस्टर्न किंग व वेस्टर्न गोल्ड, पुसा सरबती, हरामधू, पंजाब सुनहरी तर तैवान कंपनीची बॉबी ही जात अतिशय लोकप्रिय आणि अधिक उत्पादन देणारी आहे.
कलिंगड व खरबूज लागवडीची वेळ (उन्हाळी) : या दोन्ही पिकाला उष्ण व करोडे हवामान तसेच भरपूर सुर्यप्रकाशाची गरज असल्याने याची लागवड 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान करावी. तर
कलिंगड व खरबूज लागवडीचे अंतर : टरबूजाची लागवड करताना दोन बियातील व दोन ओळीतील अंतर दोन बाय अर्धा मीटर ठेवावे. तर खरबूजाची लागवड दीड बाया एक मिटर ठेवावे.
टरबूज व खरबूजाचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने शेतकर्यांनी या पिकाची लागवड बेड पद्धतेवर (गादी वाफा) करावी. साधारणता जमिनीच्या पूर्वमशागतीनंतर सारायंत्राच्या मदतीने सहा फूट अंतरावर बेड तयार करून घ्यावेत. आणि बेडवर दीड फूट अंतरावर झिग झॅग पद्धतीने टरबूजाची लागवड करावी. लागवडीपूर्वी बेडवर ठिबक सिंचनाच्या लॅटरल्स (नळ्या) आंथरूण घ्याव्यात आणि त्यानंतर बेडवर प्लॉस्टिक मल्च बसवून घ्यावा.
खरबूज, कलिंगडासाठी बियाण्याचे प्रमाण :
कलिंगड : अडीच किलो/हेक्टरी, किरण-1,2 : 650 ग्रॅम/हेक्टरी लागते.
खरबूज : दीड ते दोन किलो/हेक्टरी असावे. बिजप्रक्रिया करताना कॅप्टन किंवा कार्बेन्डॅझिम अडीच ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियास चोळावे.

खरबूज, कलिंगडासाठी खत व्यवस्थापन : जमिनीची पूर्वतयारी करताना 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत प्रति हेक्टर जमिनीत मिसळावे. लागवडीच्या वेळेस 50:50:50 किलो नत्र, स्फुरद व पालाश, प्रति हेक्टर (डि.ए.पी 125 किलो अधिक युरिया 60 किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश 100 किलो प्रति हेक्टर) या रासायनिक खताबरोबर बाजारात उपलब्ध असलेल्या सुक्ष्म मूलद्रव्याच्या अडीच बॅगा आणि साडे बारा किलो कॅल्शीयम नायट्रेट प्रति हेक्टर लागवडीच्या वेळेस द्यावे.
लागवडीनंतर 30 दिवसाने 125 किलो युरीया अधिक साडेबारा किलो कॅल्शीअम नायट्रेट प्रति हेक्टर द्यावे. फळधारणा झाल्यानंतर चिलेटेड बोरॉन 15 ग्रॅम/10 लीटर पाण्यात घेऊन 10 ते 12 दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या द्याव्यात जेणेकरून फळ तडकण्याचे प्रमाण आढळून येणार नाही.
खरबूज, कलिंगडासाठी संजीवकाचा उपयोग : वेलीवरील मादी फूलाचे प्रमाण वाढवण्यासाठी व नर फूलाचे प्रमाण कमी करण्यासाठी लागवड झाल्यानंतर झाडांना दोन आणि चार पाने आल्यावर इथे्रल 250 पीपीएम म्हणजेच अडीच ग्रॅम /10 लीटर पाण्यातून या संजीवकांची फवारणी करावी.
खरबूज, कलिंगडासाठी पाणी व्यवस्थापन : टरबूज पिकास वेलीच्या वाढीच्या काळात जमिनीच्या मगदराप्रमाणे सहा ते आठ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. फळधारणा होऊन फळे वाढू लागल्यावर आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी 15 ते 16 पाण्याच्या पाळ्या लागतात. फुलनिर्मिती, फळनिर्मिती व फळांची वाढ होण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण बसू देऊ नये.
हेही वाचा :
खरबुजापासून मिळवा हेक्टरी ५० टनापर्यंत उत्पादन
हमखास उत्पन्नासाठी असे करा कलिंगड लागवड व्यवस्थापन
द्राक्षावरील या खतरनाक रोगांचे असे करा नियंत्रण !
थंडीत फळबागांची अशी घ्या काळजी
खरबूज, कलिंगडाचे पीक संरक्षण
नाग अळी : आळी पानाच्या आत राहून आतील भाग खाते त्यामुळे पानावर नागमोडी रेषा तयार होतात. त्याच्या नियंत्रणासाठी पीक वाढीच्या सुरूवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव दिसताच खालील किटकनाशकाच्या आलटून पालटून फवारण्या द्याव्यात. व्हर्टिमेक पाच मि.ली. /10 लीटर पाणी किंवा फायटर 10 मि.ली./लीटर पाणी किंवा ट्रायझोफॉस 20 मि.ली. अधिक निंबोळी अर्क 25 मि.ली. प्रति 10 लीटर पाण्यातून फवारावे.
फळमाशी : अळ्या फळात राहून आतील गर खातात त्यामुळे फळ सडतात व अकाली पक्व होतात. याच्या नियंत्रणासाठी क्लु ल्युरचे एकरी 5 सापळे लावावेत किंवा मिथिल युजेनॉल या औषधात बुडवलेले कापसाचे बोळे प्रति एकरी 15 ते 20 डिशच्या मदतीने वापरावेत. या डिशकडे आकर्षित झालेले फळमाशीचे नर नष्ट करण्यासाठी डायक्लोरव्हास (नुऑन) या किटकनाशकाचे बोळे मिथील युजेनॉलच्या बोळ्यासोबत डिशमध्ये ठेवावेत. किटकनाशकाच्या फवारणीसाठी क्विनॉलफॉस 20 मिली अधिक 100 ग्रॅम गुळ 10 लीटर पाण्यात घेऊन वेलावर फवारणी करावी.
फुलकिडे, मावा आणि पांढरी माशी : पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने वाकडी होतात तसेच हे किटक विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात त्यामुळे या किडींचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे. याच्या नियंत्रणासाठी थायोमिथोक्झाम (अॅक्ट्रा) 4 ग्रॅम कार्बेासल्फान 10 मिली प्रति 10 लीटर पाण्यातून फवारावे.
रोग : काळा करपा : (अॅथ्रेक्नोज) आणि पानावरील ठिपके याच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब (डायथेन एम-45) 25 ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील (कवच) 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.
भूरी (पावडरी मिल्डस्) : याच्या नियंत्रणासाठी डिनोकॅप (केराथेन) पाच ग्रॅम किंवा ट्रायडेमॉर्क (कॅलॅक्झीन) 10 ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझीम (बावीस्टीन) 12 ग्रॅम प्रति 10 लीटर पाण्यातून फवारणी द्यावी.
केवडा (डाऊनी मिल्डस्) : याच्या नियंत्रणासाठी मेटॅलॅक्झिल एम झेड-72, 25 ग्रॅम किंवा फोसेटिल (अॅलीएट) 20 ग्रॅम अधिक मॅन्कोझेब 20 ग्रॅम किंवा अॅझोक्झिस्ट्रॉबीन (अॅमीस्टार) 10 मिली प्रति 10 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
काढणी व उत्पादन : कलिंगडची (टरबूज) फळे लागवडीनंतर 90 ते 120 दिवसानी काढणीस तयार होतात फळांच्या जमिनीलगतचा भाग फळावर बोटाने वाजविले असता बदबद आवाज येणे व देठाजवळ लव नाहीशी होणे ही सर्व लक्षणे फळे काढणीस योग्य आहेत. खरबूजाचे फळ पिकले म्हणजे थोडासा धक्का लागला तरी ते देठापासून वेगळे होते. सालीवर जाळी असलेल्या जातीत जाळीच्या मधली जागा पिवळसर झाली की, फळ पिकल्याची खूण समजावी. चांगली आकर्षक आणि दर्जेदार फळे उत्पादना बरोबरच ती ताजी ग्राहकार्यंत पोहचणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
उत्पादन : कलिंगडाचे (टरबूज) सरळ जात 20 ते 25 टन किंवा हेक्टर तर संकरित जात 40 ते 50 टन किंवा हेक्टर असे उत्पादन मिळते तर खरबूज : 20 ते 25 टन किंवा हेक्टर उत्पादन मिळते.
प्रा. ए. व्ही. गुट्टे, प्रा. एस. आर बरकुले विस्तार कृषी विद्यावेत्ता, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, अंबाजोगाई.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा