अलिकडे अधिक उत्पादन देणार्या सुधारित आणि संकरित बी-बियाणांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. शेतकरी एकाच वर्षामध्ये एकापाठोपाठ एक अशी पिके घेतात. त्यामुळे जमिनीला विश्रांती मिळत नाही. तसेच सिंचन सुविधामध्ये वाढ झाल्याने रासायनिक खतांचा असंतुलित वापर, जमिनीतील अन्नद्रव्यांचे पिकांकडून होणारे शोषण यामुळे जमिनीच्या सुपिकतेवर अनिष्ट परिणाम झाला आहे. पाणी प्रदूषित झाले आहे. अमुल्य अशा जमीन व पाणी या नैसर्गिक संपत्तीचा र्हास होत आहे. पिकांच्या पोषणासाठी संतुलित अन्नद्रव्यांची गरज असते. रासायनिक खतांची पूर्ण मात्रा देऊनही उत्पादनवाढीस मर्यादा आल्या आहेत. उलट उत्पादकता कमी झाली आहे, त्यामुळे शेतजमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी दर्जेदार व अधिक उत्पादन मिळविण्यासाठी जमीन व पाण्याची तपासणी आवश्यक आहे.
जमिनीतील मुल्यद्रव्ये : त्यासाठी 20 मुलद्रव्यांची कर्ब, प्राणवायू, हायड्रोजन, नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, कॅल्शियम व मॅग्नेशियम ही नऊ मुलद्रव्ये मोठ्या प्रमाणात लागतात. यापैकी पिकांना विशेषकरून नत्र, स्फुरद व पालाश या पोषक अन्नद्रव्यांची नितांत गरज लागते. त्याप्रमाणे सुक्ष्म प्रमाणात लागणारी; परंतु आवश्यक हितकारक किंवा उपयोगी अशी 11 मुलद्रव्ये आहेत. यामध्ये जस्त, लोह, तांबे, बोरॉन, मंगल, मॉलिब्डेनम, कोबाल्ट यांचा आवश्यक मुलद्रव्ये आणि सोडीअम, सिलीकॉन, क्लोरीन यांचा आवश्यक परंतु उपयुक्त मुलद्रव्ये म्हणून समावेश होतो. प्रमुख पोषक मुलद्रव्यांपैकी स्फुरद व पालाशयुक्त खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली. आजच्या काळात रासायनिक खतांची पूर्ण मात्रा देऊनही उत्पादनवाढीस मर्यादा आल्या आहेत. उलट उत्पादकता कमी झाली आहे, त्यामुळे शेतजमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी, दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी, शाश्वत शेतीसाठी जमीन व पाण्याची तपासणी आवश्यक आहे. शेतीतील माती परीक्षण करून त्याला आवश्यक ती खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होते. खतांच्या खर्चात पुरेपूर फायदा घेता येतो. आम्ल-विम्ल व क्षारयुक्त जमिनी सुधारून त्या पिकवाढीस योग्य वापरता येतात. माती परिक्षणावरून जमिनीचा कस व अन्नद्रव्यांची कमतरता समजते. जमिनीची आम्ल किंवा विम्लता समजते तसेच जमिनीतील मुक्त चुनखडीचे प्रमाण समजते. शेतातील मातीचा प्रतिनिधीक नमुना घेणे ही माती परिक्षण कार्यक्रमात सर्वात महत्त्वाची बाब आहे.
मातीचा नमुना केव्हा घ्यावा : उन्हाळी हंगाम म्हणजेच एप्रिल-मे हा कालावधी मातीचा नमुना घेण्यासाठी योग्य आहे. मातीचा नमुना पिकांची कापणी झाल्यावर किंवा नांगरणीपूर्वी घ्यावा. जमिनीवर पीक काढताना मातीचा नमुना घ्यायचा असेल तर खते दिल्यावर दोन महिन्यांनी पिकांच्या दोन ओळींमधून घ्यावा. भाजीपाला व नगदी पिकांसाठी दोन वर्षातून एकदा मातीचा नमुना घेऊन तपासणी करणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे इतर पिकांसाठी शेतातील मातीचा नमुना किमान तीन ते चार वर्षातून एकदा घ्यावा.
मातीचा नमुना कसा घ्यावा : सर्वसाधारण पिकांसाठी व एकसारखी जमीन असल्यास दोन हेक्टर जमिनीतून मातीचा एक प्रतिनिधीक नमुना घ्यावा, परंतु एकाच शेतात निरनिराळ्या प्रकारची जमीन (उदा : रंग, उतार, क्षारयुक्त, चोपण, खोलगट, काळी, भुरकट, उथळ इत्यादी) असल्यास प्रत्येक प्रकारच्या जमिनीतून एक स्वतंत्र प्रतिनिधीक नमुना घ्यावा.
मातीचा नमुना घेण्यासाठी गिरमिट (सॉईल अगर), पहार, कुदल, फावडे, खुरपे तसेच घमेले किंवा बादली, प्लॅस्टिक कापडी टेबल इत्यादी साहित्य लागते. नमुना घेताना जमिनीच्या पृष्ठभावरील पालापाचोळा, लहान-मोठे दगड बाजूला करून शेतामधील 10 ते 15 ठिकाणाहून 15 ते 30 सें.मी. खोलीपर्यंतचा एकसारखा जाडीचा मातीतील थर घमेले अथवा बादलीत घ्यावा. खुरपे किंवा फावडे यांचा उपयोग करायचा असेल तर एक ‘व्ही’ आकाराचा 30 सें.मी. खोलीचा खड्डा खोदावा. या खड्ड्यातील एका बाजूने सारख्या जाडीची वरपासून खालपर्यंतची माती खुरप्याच्या साहाय्याने घ्यावी. अशा रितीने शेतातील प्रत्येक विभागातून मातीचे नमुने घेऊन ते बादली किंवा घमेल्यात एकत्र करावेत. त्यातील काडीकचरा, दगड बाजूला काढून माती चांगली मिसळावी व ती त्या प्लॅस्टिक कापडावर टाकावी. या मातीचे सारखे चार भाग करून समोरासमोर दोन भाग ठेऊन बाकीची माती परत चांगली मिसळून त्याचे चार भाग करून समोरासमोराचे दोन भाग ठेऊन बाकीची माती वेगळी करून टाकावी. अशा रितीने अंदाजे अर्धा किलोपर्यंत मातीचा नमुना घ्यावा. ही अर्धा किलो माती स्वच्छ कापडी पिशवीत भरावी. एका कागदावर पुढीलप्रमाणे माहिती लिहून तो कागद पिशवीत टाकावा. कागदावर जमिनीचा गट नं. क्षेत्र, शेतकर्यांचे संपूर्ण नाव, गाव, पूर्ण पत्ता, फोन नं., मागील वर्षाचे पीक, पुढे घ्यावयाचे पीक इत्यादीबाबत माहिती लिहावी.
सुक्ष्म अन्नद्रव्य तपासणीसाठी नमुना घ्यावयाची पद्धत : सुक्ष्म अन्नद्रव्यांसाठी नमुना घेताना वरीलप्रमाणे व पिकाच्या प्रकारानुसार खड्डा घ्यावा. नंतर खड्ड्याच्या एक इंच जाडीची कड लाकडी कामटीने (पट्टीने) किंवा प्लॅस्टिकच्या पट्टीने प्रथम खरवडून काढावी व जमा झालेली माती खड्ड्यातून काढून ती अर्धा किलो माती वरीलप्रमाणे स्वच्छ कापडी पिशवीत संपूर्ण माहितीसह प्रयोगशाळेत परिक्षणास पाठवावी.
फळबाग क्षेत्रातील मातीचा नमुना : फळबाग नव्यानेच केली असेल तर अशा क्षेत्राचे नमुने घेताना जमिनीचे भाग पाडून प्रत्येक भागातील वेगवेगळे नमुने घ्यावेत. नमुने घेताना 100 सें.मी. खोलीपर्यंत अथवा मुरूम लागेपर्यंत प्रत्येक 30 सें.मी. थराचे (म्हणजे 30 सें.मी. ते 60 सें.मी. आणि 60 सें.मी. ते 90 किंवा 100 सें.मी. थरातील खोलीचे) मातीचे नमुने घेणे अधिक चांगले असे मातीचे नमुने घेताना फळझाडांना अन्नपुरवठा होणार्या क्षेत्राचा विचार करणे आवश्यक आहे. साधारणपणे झाडाच्या बुंध्यापासून दोन ते चार फुट लांब दुपारी 12 वाजता झाडाची सावली ज्या भागात पडत असेल त्या भागाच्या बाहेरचा 1.5 ते दोन फुट एवढा भाग सोडून मधल्या भागातून झाडांना जास्तीत-जास्त अन्नपुरवठा होतो असे समजण्यात येते अशा भागातून 12 इंच (किंवा 30 सें.मी. ) खोलीचे मातीचे नमुने घ्यावेत. प्रतिनिधीक नमुन्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार विभाग करून प्रत्येक भागातील साधारणत: झाडाच्या भोवतालचे वरीलप्रमाणे नमुने घेऊन एकत्र करून साधारण एक किलोग्रॅम मातीचा नमुना स्वच्छ कापडी पिशवीत भरून प्रयोगशाळेत पाठवावा.
हेही वाचा :
पिकाच्या उत्पादन वाढीसाठी करा गांडुळ खताचा वापर
आता फळबागांवर बुरशीजन्य किटकाचा प्रादुर्भाव
बी-बियाणे घेताना लक्षात ठेवा या १० गोष्टी !
नमुना कोठे व कसा पाठवावा ? : मातीचा नमुना घेतल्यानंतर खालील माहिती-मातीचा नमुना असलेल्या पिशवीसोबत घ्यावी मातीचा नमुना लवकरावत लवकर जवळच्या कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विभागाच्या माती परिक्षण प्रयोगशाळेकडे पाठवावा.
शेतकर्यांनी द्यावयाची माहिती : एका कागदावर पुढीलप्रमाणे माहिती लिहून पिशवीत टाकावी. कागदावर जमिनीचा सर्व्हे नं., शेतकर्यांचे संपूर्ण नाव, गाव, पूर्ण पत्ता, फोन नं., मागील वर्षीचे पीक, पुढे घ्यावयाचे पीक इत्यादीबाबत माहिती लिहावी.
मातीचा नमुना घेताना घ्यावयाची काळजी : शेतातील जनावरे बसण्याची, गोठ्यांची जागा, खत व कचरा टाकण्याच्या जागा, विहीरीचे किंवा शेतीचे बांध, पालापाचोळा जाळण्याच्या जागा इत्यादी ठिकाणाहून मातीचे नमुने घेऊ नयेत. मातीचा नमुना पिकाची कापणी झाल्यावर, परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा. शेतात पीक असल्यास दोन ओळीमधील जागेतून नमुना घ्यावा. शेतात रासायनिक खते टाकलेली असल्यास दोन महिन्यांच्या आत मातीचे नमुने घेऊ नयेत. निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीचे किंवा निरनिराळ्या शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत. मातीचा नमुना घेण्यासाठी रासायनिक खताच्या रिकाम्या पिशव्या वापरू नयेत. अशा रितीने शेतकर्यांनी शास्त्रीय दृष्टीकोन ठेऊन पिकांचे अन्नद्रव्ये व्यवस्थापन केल्यास खतांच्या खर्चात बचत होऊन जमिनीची सूपिकता टिकण्यास मदत होईल व पिकांचे दर्जात्मक भरघोस उत्पादन मिळेल.
किरण अशोक जाधव, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा