आज-कालच्या धकाधकीच्या जीवनात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत तसे पाहता फळे, फळभाज्या आणि भाजीपालाही आपल्या आरोग्याची कवचकुंडले आहेत. आरोग्य रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी निसर्गाने मानवाला दिलेले एक अनमोल वरदान आहे.
या वरदानाचा नियमित संतुलित वापर न केल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होत जाते व आपल्याला विविध आजार आणि व्याधींना तोंड द्यावे लागते. त्यासाठी फळे, फळभाज्या आणि भाजीपाला यांची नियमित सेवन करणे गरजेचे आहे. तज्ञांच्या मते माणसाच्या समतोल आहारात एक व्यक्तीसाठी दररोज ८५ ग्रॅम फळांचे व ३०० ग्रॅम भाजीपाल्याची शिफारस केली आहे.
परंतु दुर्दैवाने ते प्रमाण अनुक्रमे ४५ ग्रॅम १०० ग्रॅम इतकेच उपलब्ध आहे. त्यामुळे आपणास फळे, फळभाज्या आणि भाजीपाला उत्पादनास फार मोठा वाव आहे. मात्र फळे, फळभाज्या आणि भाजीपाला हे हंगामी असल्याने त्यांची बाजारपेठेत आवक एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणात झाल्याने या शेतमालाचा दर अचानकच घसरतो तसेच दुसरीकडेही फळे, फळभाज्या आणि भाजीपाला नाशवंत असल्याकारणाने शेतकऱ्याला तो शेतमाल मिळेल त्यादराने बाजारात विकावा लागतो. तर बहुतांशवेळेस तो विकला न गेल्यामुळे फेकून द्याव लागतो. अशा वेळी फळे, फळभाज्या आणि भाजीपाला यांच्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ बनविल्यास त्यामध्ये असलेल्या अन्नघटकांचा चांगल्या प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो. परिणामार्थ फळे, फळभाज्या व भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यास आपल्या शेतमालास योग्य बाजारभाव मिळून त्यास चांगला नफा मिळेल आणि त्याची आर्थिक परिसस्थिती सुधारण्यास चांगल्या प्रकारे मदत होतील.
भारतास विशिष्ट अशी भौगोलिक परिस्थिती आणि लाभलेल्या विविध प्रकारच्या हवामानामुळे पूर्णवर्षभर कुठल्या न कुठल्या फळांची आणि भाजीपाल्याची उत्पादन वेगवेगळ्या राज्यातून घेणे सहज शक्य होते. यामुळे भारताने फळांच्या उत्पादनाच्या बाबतीत ब्राझीलला मागे टाकून जगात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर दुसरीकडे भाजीपाल्याचे उत्पादनात भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. मागील काही वर्षापासूनच्या विविध माध्यमातून होणाऱ्या आहार साक्षरतेच्या प्रसारामुळे इतकी वर्षे दुर्लक्षित राहिलेले क्षेत्र आता पुढे येत असून, लोकांचा पण फळे, फळभाज्या आणि पालेभाज्या आहारात समावेश करण्याचा कल वाढत आहे. दुसरीकडे फळांची लागवड अधिक काळापर्यंत भरपूर पैसा मिळवून देते तर भाजीपाला लागवड पैशाची सदोदित गरज भागवते. जगात दरवर्षी जवळ जवळ ३०० दशलक्ष टनापेक्षा जास्त फलोत्पादन होते. सद्यस्थितीत फलोत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक आहे. वाढत्या लोकसंख्येची फळांची वाढती गरज भागविण्यासाठी आपल्याला फलोत्पादन वाढवणे अतिआवश्यक आहे. फळांच्या नैसर्गिक पद्धतीने काढणीनंतर खराब होण्याचे प्रमाण अधिक असते उदाहरणार्थ आंबा, सीताफळ, स्ट्रॉबेरी, जांभूळ, फालसा, इत्यादी हे प्रमाण थोडे कमी असणारी फळेदेखील आहेत कीजी थोडे जास्त दिवस टिकतात उदाहरणार्थ डाळिंब, कवट, लिंबूवर्गीयफळे इत्यादी.
महाराष्ट्राला राज्याला हवामानाच्या बाबतीत विविधता लाभलेली आहे. प्रमुखत: महाराष्ट्राचे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ असे चार विभाग पडतात. यामुळे महाराष्ट्रात नारळ, सुपारी, केळी, डाळींब, बोर, द्राक्षे, काजू, अंजीर, संत्री, चिकू, आंबा, पेरू, लिंबू इत्यादी फळांची लागवड पूर्णपणे यशस्वी करता येते. महाराष्ट्रातील द्राक्षे, डाळिंब व आंबे परदेशात खूप मोठ्या प्रमाणात निर्यात होत असतात. अलीकडे अवर्षणप्रवण क्षेत्रात चिंच, आवळा, सीताफळ, जांभूळ फळांची लागवड असून, त्यास महाराष्ट्र शासनाचे पाठबळपण लाभत आहे.
भारताचा लोकसंख्या वाढीचा दर लक्षात घेता भाजीपाला उत्पादनात भारतहा अजूनही स्वयंपूर्ण नाही त्यामुळे कृषी शास्त्रज्ञांना व शेतकऱ्यांना हे एक मोठे आव्हान आहे. इतर पिकांच्या लागवडीपेक्षा भाजीपाला पिकांची लागवड शेतकरी वर्गाला फायदेशीर ठरते कारण की, भाजीपाला हा कमी कालावधीमध्ये इतर पिकांपेक्षा अधिक फायदा मिळून देतो. महाराष्ट्रात भाजीपाल्याची शेती ही महत्त्वाची मानली जाते येथील भाजीपाला देशातंर्गत तसेच आंतरराष्टीय बाजार पेठेत पाठविला जाते. अनुकूल हवामानामुळे वर्षातील तीनही हंगामात काही भाजीपाल्याची पिके घेऊ शकतो. महाराष्ट्रातील हवामानाच्या विविधतेमुळे आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार विविध भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. यामध्ये मुख्यातः कांदा, लसूण, मिरची, ढोबळी मिरची, भेंडी, गवार, कोबी, फुलकोबी, नवलकोल, कारली, दोडका, दुधीभोपळा, तांबडा भोपळा, टरबूज, खरबूज तसेच वेगवेगळ्या शेंगवर्गीयभाज्या, पालक, मेथी, कोथिंबीर, मुळा, गाजर, बटाटा इत्यादी प्रमुख भाजीपाल्यांचा समावेश आहे. याच प्रमाणेच काही पालेभाज्यांमध्येही महत्वाचे औषधी गुणधर्म असल्याने तसेच त्यांच्या जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असल्याकारणाने व आपल्याकडील वैविध्यपूर्ण हवामानाच्या उपलब्धत्यामुळे त्यांच्या लागवडीस मोठा वाव आहे.
डॉ. संदीप मोरे, सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, आदित्य कृषी महाविद्यालय, बीड-४३११२२ (मोबा. ९२८४१९२१८८)
डॉ. बी. सी. वाळुंजकर, आर. आर. लिपने, सहाय्यक प्राध्यापक, कृषी वनस्पतीशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, सोनाई. (मोबा. ९७६७०८५६६३)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा