कोणत्याही पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन काढावयाचे असेल तर प्रामुख्याने अधिक उत्पादन देणारे वाण, रोपांची योग्य संख्या पाण्याचे व रासायनिक खतांचे योग्य नियोजन आणि पीक संरक्षण या बाबींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाभरीने पेरणी करुन मिळालेल्या उत्पादनापेक्षा सरी वरंबा पद्धतीने हरभरा लागवड केल्यास अतिशय भरघोस उत्पादन मिळते असे दिसून आले आहे. हरभऱ्याच्या मूळभोवती सातत्याने खेळती हवा असल्यास मूळांची वाढ चांगली होऊन मूळे जमिनीत खोलवर जाऊ शकतात.
महत्त्वाच्या टिप्स : हरभरा लागवड केलीय ? मग; असे करा व्यवस्थापन
देशी व काबुली हरभरा : हरभऱ्यांचे मुख्य दोन प्रकार आहेत. पहिला देशी हरभरा आणि दुसरा काबुली हरभरा देशी हरभरा हा समशितोष्ण प्रदेशात चांगला येतो. महाराष्टामध्ये प्रामुख्याने देशी हरभराच पिकविला जातो. देशी हरभऱ्यांमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता चांगली असते. जमिनीतील ओलावा आणि तपमानामध्ये होणाऱ्या बदलाला देशी हरभरा कमी संवेदनशील आहे. पेरणीनंतर केलेल्या ओलितामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर तयार होणारा कडक पापुद्रा फोडून बाहेर येण्याची क्षमता देशी हरभऱ्याच्या अंकुरामध्ये असते. डाळ व बेसनपीठ उद्योगामध्ये प्रामुख्याने देशी हरभराच वापरला जातो.
जमीन : कोरडवाहू क्षेत्रामध्ये हरभरा हे रबी हंगामातील चांगले पीक आहे. या पिकासाठी कसदार आणि चांगल्या निचर्याची जमीन असावी. हलकी अथवा भरड जमीन किंवा पाणथळ, चोपण किंवा क्षारयुक्त जमीन हरभऱ्यासाठी निवडू नये. मध्यम ते भारी जमिनीमध्ये रबी हंमागात ओलावा चांगला टिकून राहतो व चांगले पीक येते.
पूर्व मशागत : हरभऱ्याची मुळे खोल जात असल्याने खोल नांगरट करणे महत्त्वाचे असते. पेरणीच्या वेळी जमीन भुसभुसीत असावी. खरीपाचे पीक निघाल्यानंतर खोल नांगरट करावी. कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. खरीपामध्ये शेणखत दिले असल्यास वेगळे खत देण्याची जरुरी नाही. पण ते दिले नसल्यास हेक्टरी पाच मे. टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये कुळवणीच्या अगोदर द्यावे. भारी काळ्या जमिनीसाठी 90 सें. मी. अंतरावर वापसा असताना सऱ्या पाडाव्यात.
दिग्विजय, विजय व विशाल हे हरभऱ्याचे सुधारीत वाण असून विराट, पीकेव्ही हे काबुली हे हरभऱ्याचे अधिक उत्पादन देणारे वाण आहेत.
पेरणीची वेळ : हरभरा हे रबी हंगामाचे पीक असल्याने कोरडी व थंड हवा त्याला चांगली मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये जेथे सिचनाची सोय अजिबात नसेल तेथे हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजे 25 सप्टेंबरनंतर जमीनीची ओल उडून जाण्यापूर्वी पेरणी करावी. यासाठी प्रामुख्याने विजय, दिग्विजय या वाणांची निवड करावी. बागायती हरभरा 25 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन येते. पेरणीची वेळ लांबल्यास किंवा डिसेंबरनंतर पेरणी केल्यास फार कमी उत्पादन मिळते.
पेरणीची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण : सामान्यत: देशी हरभऱ्याची पेरणी पाभरीने किंवा तिफराने करतात. दोन ओळीतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. या प्रकारची तिफण किंवा पाभर वापरावी. एका ओळींतील दोन रोपांतील अंतर 10 सें.मी. असावे. या प्रकारे पेरणी केल्यास विजय, हरभर्याचे हेक्टरी 65 ते 70 किलोग्राम व विशाल, दिग्विजय विराट व पी. के. व्ही. दोन हरभऱ्याचे सुमारे 100 किलोग्राम प्रति हेक्टर बियाणे लागते. हरभरा सरी वरंब्यावर चांगला येतो. त्याकरीता 90 सें.मी. रूंदीच्या सऱ्या सोडाव्यात आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूला 10 सें.मी. अंतरावर एक ते दोन बिया टोकाव्यात. सरी वरंबा पद्धतीमध्ये बियाणे नेहमीच्या पाभर पेणी पद्धतीपेक्षा कमी लागते. विजय वाणासाठी 45 ते 50 किलोग्राम तर दिग्विजय, विशाल विराट ई, टपोर्या वाणांसाठी 70 ते 75 किलोग्राम प्रति हेक्टर बियाणे सरी वरंब्याच्या दोन्ही बाजूस टोकण करण्याकरिता पुरेसे होते. बियाण्याची टोकण वरंब्याच्या मध्यावर करावी. सरीच्या तळामध्ये तसेच वरंब्याच्या मध्यावर टोकण केल्याने बियाण्यास अतिशय भुसभुशीत माती तसेच वापसा चांगला मिळतो. परिणामी बियाणाची उगवण अतिशय चांगली होऊन रोपांची वाढ जोमाने होते. या पद्धतीमध्ये पिकास प्रमाणशीर पाणी देणे सोईचे होते. पीक उभळण्याचा धोका टळतो आणि हमखास चांगले उत्पादन मिळते. सरी वरंबा पद्धतीमध्ये बियाणे टोकण करण्याकरिता फार खर्च करावा लागत नाही. साधारणत: आठ स्त्री मजूर दिवसभरामध्ये 40 आर हरभरा टोकण करतात. एकूणच सरी वरंबा पद्धत हरभरा पिकाचे हमखास उत्पादन मिळण्यासाठी अतिशय योग्य पद्धत आहे. मात्र या पद्धतीमध्ये एखादे दुसरे तरी पाणी हरभरा पिकास देणे व आवश्यक असते.
बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी प्रति किलोग्राम बियाण्यास पाच ग्राम ट्रायकोडर्मा किंवा दोन ग्राम थारयम अधिक दोन ग्राम कार्बेन्डेझीम या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. यानंतर 250 ग्राम रायझोबियम गुळाच्या थंड द्रावणातून 10 ते 15 किलोग्राम बियाण्यास चोळावे आणि बियाणे सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे बुरशीजन्य रोगांपासून रोपावस्थेत पिकाचे संरक्षण होते व मूळावरील ग्रंथीची वाढ होऊन पिकांची वाढ चांगली होते.
खत मात्रा : हरभऱ्याला हेक्टरी 25 किलोग्राम नत्र आणि 50 किलोग्राम स्फुरदाची आवश्यकता असते. यासाठी हेक्टरी 125 किलोग्राम डएपी पेरणीच्या वेळी बियाणालगत पडेल या पद्धतीने दुचाडी पाभरीने पेरून द्यावे. घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये दोन टक्के युरीयाची फवारणी करावी.
लक्षात ठेवण्याजोगे : असे करा हरभर्यावरील घाटेअळीचे नियंत्रण
आंतरमशागत : पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरूवातीपासून तण विरहित ठेवावे. पीक 20 दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वापशावर करावी. कोळपणीमुळे जमिनीत हवा चांगली होते. कोळपणीनंतर एक खुरपणी द्यावी. कोरडवाहू क्षेत्रामध्ये कोळपणीमुळे जमिनीत पडत असलेल्या भेगा बुजून जातात आणि ओल टिकून राहल्यास उपयोग होतो.
पाणी व्यवस्थापन : हरभरा पीक पाण्यास अतिशय संवेदनशील आहे. जरी सिंचनाची व्यवस्था असली तरी अतिशय हलके पाणी या पिकास द्यावे. हरभरा पिकाला साधारणपणे 25 सें.मी. पाणी लागते. मध्यम जमिनीमध्ये सुमारे 25 ते 30 दिवसांनी दुसरे पाणी आणि आवश्यकता वाटल्यास तिसरे पाणी 65 ते 70 दिवसांनी द्यावे. भारी जमिनीस पाण्याच्या दोन पाळ्या पुरेशा होतात. पहिले पाणी 30 ते 35 दिवसांनी तर दुसरे पाणी 65 ते 70 दिवसांनी द्यावे. जमिनीच्या मगदुरानुसार आणि परिस्थितीनुसार पाणी द्यावे. जमिनीत भेगा पडण्याला सुरु होण्याआधी पाणी द्यावे. मोठ्या भेगा पडल्यानंतर पाणी दिल्यास खूप पाणी उभळून जातो. पाणी साचून राहिले तर मूळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते. हरभऱ्याला एक जरी पाणी दिले तरी कोरडवाहूच्या तुलनेत उत्पादनात 50 टक्के वाढ होते. हरभरा पिकाला तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारीत वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आणि आवश्यक त्या वेळेला पाणी देता येते. जमिनीचा भुसभुशीतपणा तुषार सिंचनाने टिकून राहिल्यामुळे पिकाची अतिशय जोमदार वाढ होते. म्हणून ज्या ठिकाणी शक्य असेल तेथे अवश्य तुषार सिंचन पिकास पाणी द्यावे.
पीक संरक्षण : हरभरा पिकाचे घाटेअळीमुळे 30 ते 40 टक्के नुकसान होते. पीक तीन आठवड्यांचे झाले असता त्यावर बारीक अळ्या दिसू लागतात. पानांवर पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले आढळतात. याकरिता हरभरा पिकास फुलकळी येऊन लागताच पाच टक्के निंबोळी अर्क (म्हणजे 25 किलोग्राम) प्रति हेक्टर या प्रमाणे पहिली फवारणी करावी. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 10 ते 15 दिवसांनी न्युक्लिअर पॉलिहैड्रॉसीस व्हायरस (एच एन. छी. व्ही. म्हणजेच हेलिओकील) 500 मि.ली. 500लिटर पाण्यातून प्रति हेक्टर करावी. यानंतर फारच आवश्यक असेल तर 36 टक्के प्रवाही मोनोक्रोटोफॉन 550 मिली अथवा 20 टक्के प्रवाही क्लोरपायरीफॉस 1250 मिली 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टर फवारवे. हरभरा पिकात पक्षांना बसण्यासाठी दर 15 ते 20 मीटर अंतरावर मचान लावावीत. कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे ई. पक्षी पिकावरील अळ्या मोठ्या प्रमाणावर वेचतात. पेरणीच्या वेळी हेक्टरी 200 ग्राम ज्वारी, 100 ग्राम मोहरी आणि दोन किलोग्राम धने शेतामध्ये पेरावे. या पिकांचा मित्रकिडींचा आकर्षणासाठी उपयोग होतो. त्यामुळे घाटेअळीचे नियंत्रण होते.
डॉ. पी. एन. हरेर, प्रा. एल. बी. म्हसे, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्म फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर.