गव्हाच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी गहू पिकाच्या पेरणीची वेळ, सुधारित वाणाची निवड, कीड-रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन याचा नियोजनबद्ध अवलंब करून गहू पीक लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थापन केल्यास जिरायत गव्हाचे प्रतिहेक्टरी 10 ते 15 क्विंटल बागायत वेळेवर गव्हाचे प्रतिहेक्टरी 45 ते 50 क्विंटल आणि बागायत उशिरा गव्हाचे प्रतिहेक्टरी 35 ते 40 क्विंटल उत्पादन निश्चित मिळू शकते.
महत्त्वाची माहिती : गव्हाच्या उत्पादन वाढीसाठी या बाबी लक्षात घ्या !
पेरणीची वेळ : जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. बागायत वेळेवर गव्हाची पेरणी शक्य तितक्या लवकर नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीस करावी. पश्चिम महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रातील काळ्या जमिनीत सोयाबीन-गहू या पीक पद्धतीमध्ये गव्हाची पेरणी 12 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत करावी. बागायत उशीरा गव्हाची पेरणी उशीरात-उशीरा म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत करावी. तथापि, उशीरा पेरणी केलेल्या गव्हास थंड हवामानाचा कालावधी कमी मिळत असल्यामुळे उत्पादनात बरीच घट येते.

सुधारित वाण : जिरायत पेरणीसाठी : पंचवटी (एनआयडीडब्ल्यू-15), एन-5439, शरद (एकेडीडब्ल्यू-2997-16).
बागायत वेळेवर पेरणीसाठी : तपोवन (एनआयएडब्ल्यू-917), गोदावरी (एनआयडीडब्ल्यू-295), त्र्यंबक (एनआयएडब्ल्यू-301), एमएसीएस-6222.
बागायत उशीरा पेरणीसाठी : एनआयएडब्ल्यू-34, एकेएडब्ल्यू-4627.
गव्हाचे सुधारित वाण विकसित करण्याचे संशोधन महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक येथे सन 1932 पासून सुरू आहे. या संशोधन केंद्रातून विकसित करण्यात आलेले, चांगल्या प्रतीचे गुणधर्म असणारे वाण आणि त्याविषयीची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे.
पंचवटी (एनआयडीडब्ल्यू-15) : जिरायत पेरणीसाठी उत्तम बन्सी वाण आहे. रवा, कुरड्या, शेवया इत्यादी बनविण्यासाठी उपयोगी वाण आहे. या वाणाचे प्रति हेक्टरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन मिळते.
त्र्यंबक (एनआयएडब्ल्यू-301) : बागायत वेळेवर पेरणीसाठी अधिक उत्पादन देणारा उत्तम सरबती वाण आहे. हा वाण चपातीसाठी उत्तम असून या वाणापासून हेक्टरी 45 ते 50 क्विंटल उत्पादन मिळते.
गोदावरी (एनआयडीडब्ल्यू-295) : बागायत वेळेवर पेरणीसाठी अधिक उत्पादन देणारा उत्पादन देणारा उत्तम वाण आहे. हा वाण निर्यातीसाठी योग्य आहे. हा वाण महाराष्ट्रात बागायत वेळेवर पेरणीसाठी प्रसारित करण्यात आलेला आहे. या वाणाची हेक्टरी उत्पादन क्षमता 45 ते 50 क्विंटल असून त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 12 टक्केपेक्षा अधिक आहे.
तपोवन (एनआयएडब्ल्यू-917) : बागायत वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण आहे. या वाणात प्रथिनांचे प्रमाण 12 टक्केपेक्षा अधिक असून चपाती आणि ब्रेडसाठी चांगला आहे. या वाणाचे प्रति हेक्टरी 45 ते 50 क्विंटल उत्पादन मिळते.
एनआयएडब्ल्यू-34 : बागायत उशीरा पेरणीसाठी उत्तम सरबती वाण आहे. हा वाण 100 ते 105 दिवसांत तयार होणारा असून प्रति हेक्टरी 35 ते 40 क्विंटल उत्पादन मिळते. हा वाण चपातीसाठी उत्तम आहे.
नेत्रावती (एनआयएडब्ल्यू-1415) : जिरायत आणि मर्यादित सिंचन (पेरणीनंतर 42 दिवसांनी एक पाणी) पेरणीसाठी उत्तम सरबती वाण आहे. हा वाण जिरायत परिस्थितीत 105 ते 110 दिवसांत आणि मर्यादित सिंचन परिस्थितीत 110 ते 115 दिवसांत काढणीस तयार होतो. हा वाण तांबेरा रोगास प्रतिकारक असून या वाणात प्रथिनांचे प्रमाण 12 टक्क्यापेक्षा जास्त आहे. या वाणाची उत्पादनक्षमता जिरायत परिस्थितीत 18 ते 20 क्विंटल व मर्यादित सिंचन परिस्थितीत 25 ते 27 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे.
फायद्याच्या टिप्स : गूह लागवडीचे सुधारित तंत्र
पेरणीच्या पद्धती : जिरायत गव्हाची पेरणी पाऊस बंद झाल्यावर परंतु वापसा आल्यानंतर करावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 75 ते 100 किलो बियाणे वापरावे. बी फोकून न देता पाभरीने पेरावे. बागायत वेळेवर पेरणीसाठी जमिनीत ओलावा नसल्यास जमीन ओलवून घ्यावी. वापसा आल्यानंतर जमीन कुळवावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे. रासायनिक खतांचा पहिला हप्ता आणि गहू बियाणे दोन चाड्यांच्या पाभरीने एकत्रित पेरावे पेरणी एकेरी करावी. त्यामुळे आंतरमशागत करणे सुलभ होते. बागायत उशीरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी 125 ते 150 किलो बियाणे रासायनिक खतांच्या पहिला हप्त्यासह दोन चाड्यांच्या पाभरीने एकेरी पद्धतीने पेरावे.
गव्हाच्या बियाण्यास पेरणीपूर्वी 10 ते 15 किलो बियाण्यासाठी 250 ग्रॅमचे एक पाकीट याप्रमाणे अॅझोटोबॅक्टर या जीवाणू खताची प्रक्रिया करावी. हे जीवाणू खत, औषधे आणि रासायनिक खतांबरोबर एकत्रित मिसळू नये. जीवाणू खतामुळे बियाण्याची उगवण लवकर व चांगली होते तसेच उत्पादनातही वाढ होते.
खते : जिरायत गव्हास पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 40 किलो नत्र (87 किलो युरीया) आणि 20 किलो स्फुरद (125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) द्यावे. बागायत वेळेवर पेरणीसाठी प्रति हेक्टरी 25 ते 30 गाड्या शेणखत वापरावे. तसेच प्रति हेक्टरी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद (375 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 40 किलो पालाश (65 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. निम्मे नत्र (130 किलो युरिया) आणि संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्यावेळी द्यावे. उरलेले निम्मे नत्र (130 किलो युरिया) पेरणीनंतर ती आठवड्यांनी खुरपणी करून द्यावे. बागायत उशीरा पेरणीच्यावेळी प्रति हेक्टरी 40 किलो नत्र (87 किलो युरिया), 40 किलो स्फुरद (250 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 40 किलो पालाश (65 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. पेरणीनंतर तीन आठवड्यांनी शेताची खुरपणी करून प्रति हेक्टरी 40 किलो नत्राची मात्रा (87 किलो युरिया) द्यावी.

पाणी व्यवस्थापन : जिरायत गहू पिकाची वाढ ही जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावरच होत असते. बागायत वेळेवर आणि बागायत उशीरा पेरणी केलेल्या गहू पिकासाठी जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी-जास्त होऊ शकतात. गहू पिकास देण्यासाठी एकच पाणी उपलब्ध असेल तर ते पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी दुसरे पाणी 42 ते 45 दिवसांनी आणि तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे.
आंतरमशागत : जिरायत गव्हासाठी सर्वसाधारणपणे 20 दिवसांच्या अंतराने हात कोळप्याने एक ते दोन वेळा कोळपणी करावी, त्यामुळे तणांचा नाश होण्यास मदत होवून जमिनीत ओलावा टिकून राहतो.
बागायत वेळेवर आणि बागायत उशिरा पेरलेल्या गव्हास तीन आठवड्यांनी खुरपणी करून नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी आठ ग्रॅम मेटसल्फेरान मिथाईल हे तणनाशक प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून दोन ओळीमध्ये फवारवे. त्यामुळे तणांचा बंदोबस्त करणे शक्य होईल. फायदेशीर ठरते. युरीयाची पहिली फवारणी पीक पोटरीवर आल्यावर आणि दुसरी फवारणी त्यानंतर 15 दिवसांनी करावी. 10 किलोग्रॅम युरीयाची 500 लिटर पाण्यातून एक हेक्टरवर फवारणी करावी. तथापि युरीया फवारणीमुळे उत्पादनात फारशी वाढ होत नाही.
पीक संरक्षण : जिरायत गहू पेरणीसाठी तांबेरा प्रतिबंधक वाणांची निवड केली तर पीक संरक्षणासाठी रोग प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्याची आवश्यकता भाकत नाही. बागायत वेळेवर आणि बागायत उशीरा पेरणीसाठीही तांबेरा प्रतिबंधक वाण उपलब्ध असून अशा वाणांचाच पेरणीसाठी वापर करावा. परंतु रोगासाठी पोषक हवामानात तांबेर्याची लागण दिसून आल्यास डायथेन एम- 45 हे बुरशीनाशक प्रतिहेक्टरी दीड किलो 500 लिटर पाण्यातून फवारवे. तसेच गव्हावरील करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी करपा रोगाची लक्षणे दिसू लागताच प्रत्येकी 0.2 टव्हे (10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम) कॉपर ऑक्सीक्लोराईड आणि मॅन्कोझेब या बुरशीनाशकांच्या मिश्रणाच्या एकूण दोन फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने कराव्यात. गहू पीक पक्व झाल्यानंतर कापणीपूर्वी जर पावसात भिजले किंवा वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढले तर गव्हाच्या काही दाण्यांची टोके काळी पडतात. अशावेळी कॉपर ऑक्झीक्लोराईड आणि डायथेन एम-45 प्रत्येकी 1250 ग्रॅम या बुरशीनाशकांचे मिश्रण 500 लिटर पाण्यातून प्रतिहेक्टरी फवारवे. पंधरा दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच एन्डोसल्फान 35 इसी 700 मि. ली. 500 लिटर पाण्यातून प्रती हेक्टरी फवारावे.
कापणी व मळणी : गव्हाची जिरायत आणि बागायत पेरणी करून पीक तयार झाल्यानंतर, दाण्यांमध्ये साधारणपणे 12 टक्के पाण्याचे प्रमाण असतांना पिकाची कापणी करावी. नंतर चांगल्या वाळलेल्या पिकाची मळणी यंत्राच्या मदतीने करावी. अशा प्रकारे सुधारीत पद्धतीने गहू पिकाचे व्यवस्थापन केल्यास जिरायत गव्हाचे प्रतिहेक्टरी 10 ते 15 क्विंटल बागायत वेळेवर गव्हाचे प्रतिहेक्टरी 45 ते 50 क्विंटल आणि बागायत उशिरा गव्हाचे प्रतिहेक्टरी 35 ते 40 क्विंटल उत्पादन निश्चित मिळू शकते.
डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. कल्याण देवळाणकर, कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक
लक्षात ठेवण्याजोगे : पीक संरक्षणात विविध अन्नद्रव्यांचे कार्य

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/
