कोरोनाच्या दुसर्या लाटेपासून बचाव करण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढविणारी फळे, भाज्या खाण्याकडे लोकांचा कल वाढला असून, त्यामुळे मल्टीव्हिटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध असलेल्या इतर भाज्या व फळांची बाजारातील मागणीही वाढली आहे. विशेष म्हणजे, या लॉकडाऊन काळात ३०० हून अधिक औषधी गुणधर्म असलेल्या ‘शेवगा’ खाण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.
सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव भारतात सुरू आहे. परिस्थिती अत्यंत भयावह होत आहे. संक्रमाण साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडारून जाहीर केला गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने लोकांना आपल्या घरात राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मल्टीव्हिटामिन्स आणि अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध असलेल्या इतर भाज्या व फळे खाण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे औषधी गुणधर्म असलेल्या भाज्या आणि फळे खाण्याकडे वाढता कल असून, अशा भाज्या आणि फळांना बाजारात मागणी वाढत आहे. फळांमध्ये संत्रा आणि शहाळ नारळाची मागणी वाढली असून, भाज्यांमध्ये ३०० हून अधिक औषधी गुणधर्म असलेल्या शेवग्याला एक नंबरची पसंती दिली जात आहे. यामुळे शेवगा उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
तज्ज्ञांच्या मते शेवग्यामध्ये ३०० हून अधिक औषधी गुणधर्म आहेत. यामुळे ९० प्रकारची मल्टीव्हिटामिन्स, ४५ प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट आणि १७ प्रकारची अमिनो अॅसिड असतात. हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्याची क्षमता यामध्ये आहे. शेवग्याच्या सेवनाने अतिरिक्त वजन कमी होते. तसेच शारिरीक दुर्बल्य, संधिवात, नेत्ररोग, स्नायुंची कमजोरी या व्याधीवर शेवगा गुणकारी आहे. शेवगा हा उष्ण असल्याने वात आणि कफ या विकारावर अतिशय गुणकारी आहे. शेवगा पाचक असल्याने पचनक्रिया व रक्तप्रवाह सुधारण्यास उपयुक्त आहे. शरीराच्या आतील सुज, डोकेदुखी, शारीरिक जडपणा, पोटातील कृमी, रक्तदोष, मुतखडा, उच्च रक्तदाब, मधुमेह या आरजांवर शेवगा अत्यंत गुणकारी आहे.
शेवग्याच्या लागवडीसाठी महत्वाच्या गोष्टी
जर तुम्हालाही शेवग्याची लागवड करायची असेल तर प्रथम शेत तयार करा. पेरणीच्या दोन दिवस आधी बियाणे भिजविणे आवश्यक आहे. आपण जमीन एक फूट रुंद आणि खोली करून पेरणी करू शकता. नर्सरीमधून रोपटे आणून किंवा थेट बियाणे लावून आपण शेवग्याची लागवड करू शकता. कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की १ एकर क्षेत्रात शेवग्याच्या २००० झाडे सहज वाढू शकतात.