कमी का येते ? सुरू उसाचे उत्पादन !

0
1395

ऊसाच्या भरघोस उत्पादनासाठी हवे तसे नियोजन केले जात नसल्याने सुरू उसाचे उत्पादन कामी येते. सुरू उसाच्या कमी उत्पादनाची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जमिनीची चुकीची निवड, पाण्याचा अवाजवी वापर, पिकाच्या फेरपालटाकडे दुर्लक्ष, सेंद्रिय सोडून रासायनिक खतांचा भरमसाठ वापर आणि लागवडीची वेळ न पाळणे या कारणांमुळे सुरू उसाचे उत्पादन कमी येते. 

अयोग्य जमिनीची निवड : लाभ क्षेत्रात पाट पाण्याची उपलब्धता झाल्याने सर्वच प्रकारच्या जमिनी ऊस लावगडीसाठी आणल्या गेल्या हलक्या जमिनीतही ऊस पिकाची लागवड दिसून येत आहे. अशा प्रकारच्या जमिनीस दोन पाणी पाळ्यांतील अंतर कमी दिवसांचे असल्याने व पाण्याचा ताण सहन न झाल्याने ऊस उत्पादकतेत घट येते.

जमिनीचे अयोग्य व्यवस्थापन : जमिनीच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे ऊस पिकाखालील जमिनीचा मगदूर व जमिनीचा पोत बिघडला आहे. जमिनी क्षारयुक्त व चोपण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होऊ लागलेली आहे. त्याची महत्त्वाची कारणे खालील प्रमाणे आढळून येतात.

पाण्याची अपूर्ण उपलब्धता : ऊस पिकाची लागवड करताना हंगामनिहाय लावगड केलेल्या ऊस पिकासाठी आवश्यक असलेल्या पाण्याची गरज व त्याचा स्त्रोत याचा विचार न करता शेतकरी ऊस पिकाची लागवड करताना आढळतात; परंतु उन्हाळात पाण्याची वाढलेली गरज व कमी होणारे पाण्याचा स्त्रोत म्हणजे पाटपाण्याचे आवर्तन न मिळणे, विहीरी व इंधन विहिरीतील पाणी पातळीत घट होणे किंवा एकदम संपणे, नदीच्या पाणी स्त्रोतात घट झाल्याने त्यावर आधारित अवलंबून असलेल्या सिंचनावर आधारित ऊस पिकाच्या उत्पादकतेमध्ये घट होते.

पाण्याचे अयोग्य नियोजन : काही ठिकाणी, विशेषत: लाभक्षेत्राच्या भागात पाटातून पाणी झिरपल्यामुळे, निचर्‍याची व्यवस्था नसल्याने किंवा नैसर्गिकरित्या पाणी वाहून नेणारे नाले, ओघळी तुंबल्याने आणि त्यावर अतिक्रमण झाल्याने त्याचप्रामणे जमिनीचय नैसर्गिक पाणी धारण करण्याच्या क्षमतेचा विचार न करता पाण्याचा अतिवापर केल्याने जमिनी पानथळ झाल्याचे आढळते. ज्यावेळी भूमिगत पाण्याची पातळी पिकांच्या कार्यक्षम मुळांच्या कक्षेत येते आणि त्यामुळे पिकास हवा, पाणी, अन्नद्रव्ये मिळेनाशी होतात, परिणामी पिकांची वाढ खुंटते व उत्पादनात मोठी घट येते.

ऊस पिकास पाणी जास्त लागते असा गैरसमज असल्याने ऊस लागवडीपासून ऊस तुटून जाईपर्यंत प्रत्येक पाण्याच्या पाळीत भरपूर पाणी दिले जाते. पाण्याच्या अतिवापरामुळे पाण्याचा अपव्यय होण्याबरोबर जमिनी क्षारयुक्त होवून उत्पादन क्षमता घटत असल्याचे आढळते. जमिनीची भौतिक सुपिकता जमिनीस दिल्या जाणार्‍या पाण्यावर अवलंबून असल्याने पाण्याच्या सतत व अवाजवी वापरामुळे त्या जमिनी नापिक झालेल्या आहेत. तसेच खोल काळ्या जमिनीमध्ये निचरा व्यवस्थित होत नसल्यास त्या जमिनी लवकर खराब होण्याची शक्यता असते. नको तेव्हा भरपूर पाणी आणि पाहिजे तेव्हा कमी पाणी अशा चक्रातून ऊस पीक जात असल्याने दोन्हीही परिस्थितीमध्ये ऊस पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होवून उत्पादन तर कमी होतेच तसेच त्याचा जमिनीच्या सुपिकतेवर अनिष्ट परिणाम होतो.

पिकांची योग्य फेरपालट न करणे : लाभक्षेत्रात त्याच-त्याच जमिनीत ऊस पीक घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल आहे. खोडव्या नंतर शक्यतो गहू पिकाची लागवड व नंतर भुईमूग हे पीक फेरपालट म्हणून न घेतले जाणे, फेरपालटीमध्ये कडधांन्य किंवा गळीत धान्याचा समावेश केला जात नाही. जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण त्याचप्रमाणे आवश्यक जिवाणूंची संख्या कमी होवून परिणामी उत्पादनात घट येते.

सेंद्रिय किंवा हिरवळीच्या खतांचा वापर न करणे : ऊस पीक हे शेतात 12 महिने राहत असल्याने जास्त प्रमाणात अन्नद्रव्य शोषण करते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण त्यामुळे क्रमश: कमी होत जाते. परंतु त्याची भर सेंद्रिय किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करून केली जात नाही. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण घटत गेल्याने त्याच बरोबर सुक्ष्म मूलद्रव्ये कमी झाल्याने मुळांची वाढ, जमिनीतील सच्छिद्रता, जमिनीची जलधारण क्षमता कमी होवून उत्पादकतेत घट येते.

ऊस लागवडीचे अयोग्य नियोजन : ऊस उत्पादन वाढीसाठी पोषक हवामान, उत्पादनाचा खर्च आणि उत्पादन क्षमता यांचा विचार करून सुरू ऊस लागवड 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी या काळात करणे आवश्यक असते. मात्र शेतकर्‍यांकडून लावगडीस उशीर होतो व त्यामुळे ऊसाच्या उत्पादकतेमध्ये घट येते.

प्रा. किरण पं. वायसे

Click to rate this post!
[Total: 2 Average: 3]