आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये बहुतांशी सर्वत्र तर अहमदनगर जिल्ह्याचा दक्षिण व पूर्वेकडील भाग तसेच कोकण व मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात खिल्लार हा गोवंश वापरला जातो. आपल्या महाराष्ट्राच्या लगतच्या कर्नाटकातील सीमा भागात या गोवंशाची मोठ्या प्रमाणावर पैदास केली जाते. या गोवंशाच्या भौगोलिक रचनेनुसार काही पोटजाती निर्माण झाल्या आहेत. उदा. माणदेशी खिल्लार, कर्नाटकी खिल्लार, पंढरपुरी खिल्लार, नकली खिल्लार अश्या या जाती आहेत.
आपल्या भारतीय गोवंशामध्ये अत्यंत चपळ, अत्यंत काटक व अत्यंत देखणा तसाच सर्वांत जास्त किमतीचा गोवंश म्हणजे खिल्लार गोवंश होय. या गोवंशाला पांढरे सोने संबोधले जाते. खिल्लार गाय दुग्धोत्पादनासाठी कमी असली तरी शेतीकामासाठी लागणार्या खिल्लर बैलाच्या पैदासीसाठी या गोवंशाची चांगलीच ओळख आहे.
शारीरिक ठेवण : शिंगाचा रंग सफेद गुलाबी किंवा काळसर, शिंगे कोचर किंवा सरळ, कर्नाटक खिल्लारमध्ये शिंगे कपाळमाश्या जवळ एकदम लगत व चिंचकुळी सरळ तर माणदेशी खिल्लारमध्ये जाडजूड व दोन शिंगामध्ये योग्य अंतर असते, नाकपुडी लालसर गुलाबी किंवा काळ्या रंगाची असते, डोळे काळे व लांबट आकाराचे असतात, कान चेहर्याने मानाने लहान व शेपटीला टोकदार असते, मान लांब व रूंद असते, पाठीपोटात आपरेपणा नसतो. मानेखाली पोळी (लोळी) मोठी नसते, गायींमध्ये बेंबीच्या जवळील जागा अत्यंत अस्पष्ट असते. माणदेशी खिल्लार बैलांचे वशिंड मोठे व घट्ट असते, कातडी शरीरालगत घट्ट असते. केस अत्यंत लहान असतात. कातडीचा स्पर्श मुलायम असतो. शेपूट लांबलचक सापासारखे असते. मध्यम आकाराचे व आटोपशीर असतात. गायींमध्ये निरपणी ठेवण आटोपशीर व लहानसर असते, गायींमध्ये छातीकडून कासेकडे येणार्या दुधाच्या शिरा या लहान व अस्पष्ट असतात. कास आटोपशीर व लहान असते चारही सड लगत व समान उंचीचे असतात, या गोवंशाचा रंग प्रामुख्याने चमकदार पांढरा असतो, म्हैसूरी खिल्लारी आणि नकली खिल्लार यांचे मध्ये रंग काहीवेळा कोसा किंवा जांभळट कोसा छटेचा येतो.
पूर्व वाढ झालेल्या गायीची लांबी 120 ते 130 सें.मी. उंची 125 ते 135 सें.मी. तर छातीजवळील घेर 150 ते 160 सें. मी. असते. तर बैलांची लांबी 140 ते 150 सें.मी. उंची 135 ते 145 सें.मी. व छातीजवळील घेर 200 ते 210 सें.मी असतो.
या गायींचे प्रथम वेताचे वय 40 ते 50 महिन्यांचे दरम्यान असते, दोन वेतांमधील अंतर 18 ते 24 महिन्यापर्यंत असते, एका वेतामध्ये सलग आठ ते दहा महिन्यापर्यंत दूध देतात. व्यायल्यानंतर दिवसाकाठी तीन ते चार लीटर दूध देतात. वासरू दिवसभर गायीबरोबर मोकळं असल्यास या गायी पाच ते सहा वेळा चांगल्या पान्हवतात व दूध पाजतात. या गायींचा माजाता कालावधी सहा ते आठ तासांचा असतो.
या गोवंशाचे बैल शेतीकामासाठी व ओढकामासाठी ताकदवान असल्याने प्रसिद्ध आहेत. तसेच शर्यतीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत. वयाच्या तीन ते सहा वर्षांपर्यंत शर्यतीसाठी व हलक्या कामासाठी धरतात. बैल दाती जुळता की लगेच खच्चीकरण करावे म्हणजे अंगात भरतो देखील चांगला, मारकेपणा कमी होतो व मोठ्या कामांना धरता येतो.
वळूसाठी आश्यक गुण : खुर काळे व सलग पाहिजेत. शिंगे कोचर किंवा सरळ, वळूपासून नर वासरांचे प्रमाण अधिक आवश्यक असते शांत व सुस्वभावी स्वभाव आवश्यक, लांब पौंडी असणे गरजेचे, कातडी पातळ व चमकदार तसेच रंग दुधासारखा पांढरा असायलाच हवा. या जातीचे बैल तापट स्वभाव व मारकेपणा बद्दल विशेष प्रसिद्ध आहेत तरी या बैलांजवळ कधीही बेसावधपणा व फाजील आत्मविश्वासाने वावरू नये कारण हे बैल माणसांचा व जनावरांचा डूख (राग) धरतात त्यामुळे कधी मारतील ह्याचा नेम नसतो. या तापटपणामुळेच काम रागारागाने झटपट करतात.
या गोवंशाच्या खरेदी विक्रीसाठी पुणे जिल्ह्यामधील चाकण, सांगली जिल्ह्यामधील खरसुंडी, कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव, सोलापूर जिल्ह्यातील सिद्देश्वराची यात्रा हे बाजार विशेष प्रसिद्ध आहेत. काहीही झाले तरी चालेल एखादी तरी दारात खिल्लारी जोडी असावी हे प्रत्येक शेतकर्यांचे एक स्वप्न असते.
मिलिंद कृष्णाजी देवल प्लॉट क्र.5 इमारत क्र.सी-11, सरीतानगरी क्र-2, पुणे, सिंहगड रस्ता, पुणे. मोबा. 9960200767