अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी डाळिंब हे हुकमी फळपीक ठरले असले तरी गेल्या काही वर्षात डाळिंब फळबागेतील समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. डाळिंब उत्पादनासाठी महाराष्ट्रातील हवामान आणि जमीन पोषक आहे. शिवाय बाजारपेठेत डाळिंबाला वर्षभर चांगली मागणी आणि चांगला भाव मिळतो. शिवाय डाळिंब निर्यातीलाही चांगला वाव आहे. असे असताना मात्र डाळिंबामधील समस्या वाढत असल्याने डाळिंब उत्पादक अडचणीत आले आहेत.
सध्या डाळिंब पिकात तेलकट डाग, मर रोगाबरोबरच आता खोडकिड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे डाळिंबाची उत्पादकता गेल्या काही वर्षात घटताना दिसत आहे. डाळिंब शेतीत चांगला वाव असतानाही गेल्या दोन तीन वर्षात महाराष्ट्रातील डाळिंब क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. त्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी महात्वाचे कारण म्हणजे बदलते वातावरण, तेलकट डाग, मररोग आणि नव्याने असेली खोडकीड ही कारणे आहेत. या समस्येला प्रतिकारक्षम नव्या वाणाची गरज निर्माण झाल्याने सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने प्रयत्न करून सोलापूर लाल हा वाण विकसित केला आहे.
हे नक्की वाचा : डाळिंबाच्या फुलसमस्येवर हे आहेत सेंद्रिय उपाय
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राकडे प्रक्षेत्रावर 362 डाळिंबाच्या जाती (जिन कोष) आहेत. त्यातील 140 जाती या देशातील असून 222 जाती विदेशातील आहेत. तेलकट डाग (बॅक्टेरिअल ब्लाइट) या रोगाला सहनशील जातीचा शोध घेण्यासाठी आणि गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी उपलब्ध असलेल्या जाती तपासल्या व त्यातील काहीप्रमानात सहनशील असलेल्या जाती व भगवा ही व्यावसायिक जात संकरीकरणासाठी वापरुन सोलापूर लाल या संकरीत वाणाची उत्पत्ति करण्यात आली.
भारतीय कृषि संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रामध्ये भगवा, गणेश, नाना आणि दारू या वाणांच्या संकरातून सोलापूर लाल हे नवीन वाण 2017 मध्ये विकसित करून प्रसारित करण्यात आले. संकरीकरणसाठी भगवा हे वाण गुणवत्तेच्या दृष्टीने मादी पालक म्हणून वापरण्यात आले व सहनशील जंगली वाण दारू, नाना व गणेश हे नर म्हणून वापरण्यात आले आहे.
महत्त्वाच्या टिप्स : डाळिंबावरील कीड व्यवस्थापन
सोलापूर लाल हा देशातील पहिले बायोफोर्टीफाईड वाण आहे. सोलापूर लाल हा वाण प्रचलित भगवा वाणापेक्षा लवकर परिपक्व होणारा आणि अधिक उत्पादन देणारा आहे. भगवा वाणापेक्षा पौष्टिकदृष्ट्या समृद्ध व दर्जेदार फळे असल्यामुळे निर्यातीस मागणी आहे. भगवा वाणापेक्षा सोलापूर लाल वाणाच्या फळांचा टी.एस.एस. जास्त आहे. या वाणाची फळे मध्यम आकाराची असून फळे व दाणे आकर्षक गडद लाल रंगाची आहेत. बियांचा पोत मध्यम आहे. या वाणाच्या 100 दाण्याचे वजन भगवा पेक्षा अधिक आहे. फळांची साल जाड असल्यामुळे टिकवण क्षमता जास्त आहे. प्रचलित वाणांच्या तुलनेत फुलधारणा व फळधारणा अधिक होत असल्यामुळे उत्पादन वाढीच्या दृष्टीने हा वाण अतिशय महत्वाचा ठरणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मत असे आहे की सोलापूर लाल या वाणाची झाडे काटक असल्यामुळे हा वाण प्रचलित भगवा वाणापेक्षा रोगांना कमी बळी पडतो.
नक्की वाचा : बंपर उत्पादन देणार्या आवळ्याच्या जाती
या वाणांच्या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, जस्त, व्हीटॅमिन- सी आणि अॅन्थोसायनिन आहे. बायोफोर्टीफिकेशन ही निवडक प्रजनन, आनुवंशिक बदल किंवा परिपूर्ण खतांच्या वापराद्वारे पिकातील सूक्ष्म पोषक घटक वाढीवण्याची प्रक्रिया आहे. जगात 60 % लोकांमध्ये लोह आणि 30 % लोकांमध्ये जस्त या पोषक घटकांची कमतरता आहे. त्यामुळे मानवी शरीरातील पोषक घटकांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा वाण वरदान ठरणार आहे. आकर्षक गडद लाल रंगाची फळे व बिया असल्यामुळे या वाणाला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी राहणार आहे.
सोलापूर लाल हा संकरीत वाण असल्याने हा खतांना अधिक प्रतिसाद देतो. या वाणाची उत्पादन पद्धती आणखी प्रमाणित नसल्यामुळे सद्यस्थितील शेतकरी भगवा या वाणाच्या उत्पादन पद्धती नुसारच या वाणाचे उत्पादन घेत आहेत. हे वाण 150 % शिफारसित खत मात्रेस अधिक उत्पादन देते व फळांचा आकार मोठा आढळला आहे. या वाणाच्या बागा सध्या फळवस्थेत आहेत. फुलधारणा चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे शेतकरी वर्गात उत्साह आहे. शेतकऱ्यांच्या मते या वाणाची फळ विराळणी करणे महत्वाचे आहे. कारण या वाणाला पहिल्याच बहराला 100 ते 150 फळे लागतात. झाडाचे वय कमी असल्यामुळे गुणवत्ता पूर्ण उत्पादन घेण्यासाठी विरळणी करणे महत्वाचे आहे. या वाणाच्या फळांच्या आकारा बाबत बरेच शेतकरी संभ्रमवस्थेत आहेत परंतु ज्या शेतकाऱ्यानी या वाणाचे उत्पादन घेतलेले आहे; त्यांना झाडाच्या वयानुसार फळ विराळणी केल्यास दर्जेदार फळे आलेली आहेत. आकर्षक फळे असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून मागणीही चांगली आहे.
वाचनीय लेख : केळी उत्पादनाचे नवे तंत्र
1. एकाच वेळी भरपूर फळधारणा होऊन फळधारनेच्या (सेटिंग) खर्चात मोठी बचत होते.
2. कोणत्याही वातावरणात फळधारणा होत असल्यामुळे तिन्ही बहरामध्ये येणारी जात.
3. भगवा वाणापेक्षा कमी कालावधीत परिपक्व झाल्यामुळे पाणी, रासायनिक खते, विद्राव्य खते आणि औषधी यांच्या खर्चात बचत होते.
4. त्याचबरोबर इतर वाणांच्या तुलनेत फळे लवकर परिपक्व झाल्यामुळे जास्त बाजारभाव मिळतो.
5. आकर्षक लाल रंग, चकाकी असलेली दर्जेदार फळे व टिकवण क्षमता चांगली असल्याने बाजारात जास्त मागणी आहे.
6. प्रति झाड व प्रति हेक्टर उत्पादन जास्त असल्यामुळे इतर वाणाच्या तुलनेत दीड पट जास्त उत्पादन मिळते.
7. फळाच्या रसात लोह, जस्त आणि विटामीन- सी चे प्रमाण जास्त असल्यामुळे जागरूक ग्राहकांची फळाला जास्त मागणी आहे.
शरद जाधव आचार्य पदवी विद्यार्थी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
फायद्याची गोष्ट : काय आहे ? पपई उत्पादनाचा बोडके पॅटर्न !
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1