स्कायमेटकडून मान्सूनचा चिंताजनक अंदाज

अवकाळी पावसामुळे धडकी भरलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा चिंतेत टाकणारी बातमी आली आहे. स्कायमेट या अमेरिकेतील खासगी संस्थेकडून यंदा मान्सूनचा चिंताजनक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्कायमेटकडून देशात यावर्षी अस्मानी संकटाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यासह देशात यंदा सरासरीपेक्षा कमी म्हणजे सुमारे 94 टक्के पाऊस पडेल, असा प्राथमिक अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

मोठी बातमी : अवकाळी पावसाचा पुन्हा तडाका : नाशिक भागातील द्राक्षबागा भुईसपाट

स्कायमेटने 4 जानेवारी 2023 रोजी यंदा पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी राहण्याचा प्राथमिक अंदाज दिला होता. त्या अंदाजावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. देशात यंदा जून ते सप्टेंबर या काळात सर्वसाधारण 868.8 मिमीच्या तुलनेत 816.5 मिमी पाऊस पडण्याची शक्यताही संस्थेने व्यक्त केली आहे.

या प्राथमिक अंदाजानंतर स्कायमेट पुन्हा मान्सूनचा अंदाज देणार आहे. मात्र हा प्राथमिक अंदाज देशभरातल्या शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. देशाच्या काही भागांमध्ये कमी पावसाची शक्यता आहे. हे भाग कुठले आहेत ? याबद्दल पुढच्या अंदाजात चित्र स्पष्ट होईल, असे स्कायमेटने म्हटले आहे.

चिंताजनक : मराठवाड्यात 9 ठिकाणी वीज कोसळून 5 जणांचा बळी : 31 जनावरे दगावली

एल निनोचा परिणाम मान्सूनवर होण्याचे भाकित अमेरिकेच्या हवामान संस्थेने केले होते. आता स्कायमेटने देखील पाऊस कमी पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अद्याप भारतीय हवामान विभागाचा अंदाज आलेला नाही. भारतीय हवामान विभाग आपला अंदाज 15 एप्रिलला वर्तवेल त्यावेळी एल निनो असेल तर त्याची माहिती समोर येईल. त्यानंतरच पावसाची स्थिती नेमकी काय राहील याबाबत थोडा अंदाज येईल. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी देखील भारतीय हवामान विभागाचा एक अंदाज येतो, त्यानंतर यावर्षीच्या पावसाची स्थिती नेमकी काय राहील हे समजेल.

स्कायमेटच्या अंदाजानुसार ‘एल निनो’मुळे देशाच्या उत्तर आणि मध्य भागातही पावसाच्या सरासरीवर परिणाम होऊ शकतो. राज्यासह गुजरात, मध्य प्रदेश येथे जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांत तुलनेने कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हंगामाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असे या अंदाजात म्हटले आहे.

आनंदाची बातमी : सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबास ‘जीआय’ मानांकनाचे मंगळवारी वितरण

स्कायमेटच्या अंदाजानुसार जूनमध्ये दीर्घकालिन सरासरीच्या 99 टक्के पाऊस होऊ शकतो (165.3 मिमी), जुलैमध्ये सरासरीच्या 95 टक्के (280.5 मिमी), ऑगस्टमध्ये 92 टक्के (254.9 मिमी) तर  सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 90 टक्के (167.9 मिमी) पाऊस होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.

देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पावसाची तूट बघायला मिळण्याचा अंदाज आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

यंदा सर्वसामान्य पावसाची केवळ 25 टक्के शक्यता आहे. दीर्घ कालावधीचा पाऊस सरासरीच्या (एलपीए) 94 टक्के अपेक्षित आहे. अनेक भागांत दुष्काळ पडण्याची शक्यता 20 टक्के आहे. ‘एल निनो’मुळे आगामी काळात मान्सून कमकुवत होण्याची शक्यता आहे, असे स्कायमेटने अधोरेखित केले आहे.

दरम्यान, आता यानंतर सर्वांच्या नजरा भारतीय हवामान खात्याच्या भाकिताकडे लागल्या आहेत. भारतीय हवामान खात्याकडून (IMD) दरवर्षी १५ एप्रिलच्या सुमारास मान्सूनच्या पावसाविषयी अंदाज जाहीर केले जातात. पावसाच्या अंदाजानुसार देशभरातील शेतकरी आपले नियोजन करत असतात. त्यामुळे मान्सूनच्या पावसाविषयीचे अंदाज अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात.

हे वाचा : हवामान बदलाचा काजू उत्पादनवर परिणाम

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇