भारतीय हवामान विभागाने पावसाचा नवा अंदाज जाहीर केला असून, पुढील चार ते पाच दिवस राज्यात काही ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाचे वरिष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट करून पुन्हा राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.
राज्यात यंदा बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. जून महिन्यात मान्सूनने दिमाखात आगमन केल्यापासून पावसाचा जोर कायमच आहे. 25 सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने तीन चार दिवस जोरदार पाऊस पडला. दरम्यान त्याचा परिणाम म्हणून बंगालच्या उपसागारात चक्रीवादळ निर्माण होऊन पावसाने दमदार हजेरी लावली. यामध्ये मराठवाड्यात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले. राज्यातील काही भागात ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असताना पुन्हा हवामान विभागाने पुन्हा चार ते पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तविला असल्याने शेतकर्यांमध्ये धडकी भरली आहे. यंदा अतिरिक्त पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात यंदा अनेक जिल्ह्यात विक्रमी पाऊस झाला आहे. दरम्यान यंदा राज्यात परतीच्या पावसाला उशीर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून 7 ते 8 ऑक्टोंबरपासून राजस्थानातून परतीच्या पावसाला सुरूवात होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता परतीच्या पाऊस काय करतो असा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे.
हेही वाचा :
विमा कंपनीकडे पीक नुकसानीची तक्रार करण्यासाठी हे आहेत चार पर्याय
पावसाचा फटका : कापूस भुईसपाट, सोयाबीनला झाडवरच फुटले कोंब
बक्कळ उत्पादनासाठी, हे वापरा तूर लागवडीचे सुधारित तंत्र
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानंतर काही जिल्ह्यात अलो अलर्ट जारी केला असून, 5 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 6 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस पडेल तर 7 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा